Sharad Pawar Retirement : राजीनामा देण्यापूर्वीच शरद पवारांचं संपूर्ण भाषण, जसच्या तसं

  • Written By: Published:
Sharad Pawar Retirement : राजीनामा देण्यापूर्वीच शरद पवारांचं संपूर्ण भाषण, जसच्या तसं

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कार्यकर्ते जसे स्तब्ध झाले आहेत तसेच पक्षातील नेतेही स्तब्ध झाले आहेत.

राजीनाम्या देण्यापूर्वी शरद पवार यांनी आपल्या राजकीय जीवनाचा आढावा घेणार भाषण केलं, शरद पवार यांचं ते भाषण जसच्या तसं

1 मे 1960 रोजी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्याच दिवशी म्हणजे १ मे १९६० रोजी मी पुणे शहर युवक काँग्रेसचा सभासद झालो. मी काँग्रेसच्या सर्व कार्यक्रमांना हजर राहत असल्याने माझी पुण्याच्या काँग्रेस भवनात जाण्यास सुरूवात झाली. साधारणत: तीनेक वर्षांनंतर माझ्या कामाची पद्धत बघून मला युवकांच्या राज्य संघटनेत काम करण्याची संधी मिळाली आणि माझा मुक्काम पुण्यातून हलून मुंबईमधील दादर भागात असलेल्या टिळकभवन मध्ये झाला.

तिथून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांच्या संघटनेमधील युवक कॉंग्रेस मित्रांशी माझा संपर्क सुरू झाला. राज्यपातळीवरील वरिष्ठ नेत्यांशीही माझा संपर्क होऊ लागला. ह्याच कालावधीत राष्ट्रीय युवक कॉंग्रेसने ‘अन्य देशांमध्ये नव्या पिढीतील नेतृत्व कसे तयार केले जाते, त्यासाठी कोणता कृती कार्यक्रम आखला जातो’ याचा अभ्यास करण्यासाठी माझी ‘वर्ल्ड असेम्ब्ली ऑफ युथ शिष्यवृत्तीतून निवड झाली. त्याद्वारे मला जापान, अमेरिका, कॅनडा, डेन्मार्क या देशांत जाता आले व तेथील वरिष्ठ नेते व संघटनेच्या कामकाजाची पद्धत पाहता आली.

दरम्यान १९६६च्या वर्षात भारतामध्ये सार्वत्रिक निवडणूकीची हालचाल सुरू झाली व मला परदेश दौरा अर्धवट सोडून भारतात परतावे लागले. या काळात कॉंग्रेस पक्षामध्ये लोकसभा व विधान उमेदवारांच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली. ह्या सार्वत्रिक निवडणूकींमध्ये काही जागा युवकांना देण्यात याव्यात असा वरिष्ठ नेतृत्वाचा आग्रह होता. ह्याच आग्रहामुळे बारामती विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून माझी निवड झाली.

या निवडणूकीत माझ्या समोरचा उमेदवार सहकारी चळवळीतील शक्तीशाली व्यक्ती होता. परंतू युवक कॉंग्रेसच्या चळवळीमध्ये कार्यरत असताना हजारो तरुणांशी आलेल्या माझ्या संपर्कामुळे तमाम युवा शक्तीने माझी निवडणूक हाती घेतली आणि मोठया मतांनी मी विधानसभेत निवडून आलो. विधानसभेवर निवडणून गेलो तेव्हा मी २७ वर्षांचा तरूण होतो. महाराष्ट्राच्या विधानसभेत काँग्रेस पक्षातून माझ्यासह अनेक नवीन चेहरे आले. मी उमेदीने विधीमंडळाच्या कामात रस घेऊ लागलो. याचीच दखल घेतली जाऊन विधीमंडळ कॉंग्रेस पक्षाचा सेक्रेटरी म्हणून माझी निवड झाली.

या पदामुळे विधानसभेच्या कामाकाजात मला अधिक लक्ष देण्याची संधी मिळाली, त्याच काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री वसंतराव नाईक होते. नव्या सदस्यांना त्यांच्याकडून फार प्रोत्साहन मिळत असे. माझा विधानसभा सदस्यपदाचा हा ५ वर्षांचा काळ कधी व कसा संपला हे लक्षातही आले नाही. मी पुन्हा १९७२ साली दूसऱ्या विधानसभा निवडणूकीला सामोरा गेलो. पहिल्या निवडणूकीपेक्षा दूसऱ्या निवडणूकीत मी अधिक मतांनी निवडून आलो. यावेळी वसंतराव नाईकांच्या मंत्रीमंडळात सामान्य प्रशासन आणि गृह खात्याचा राज्यमंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. १९६७ साली संसदीय कामकाजाची मला संधी मिळाली तेव्हापासून सार्वजनीक जीवनात मी अनेक चढउतार पाहिले.

परंतु १९६७ ते आजपर्यंत सतत कुठल्या ना कुठल्या पदावर – मग ते विधानसभा सदस्य, विधान • परिषद सदस्य असो अथवा त्यानंतर संसदेमधील लोकसभा सदस्य अथवा राज्यसभा सदस्य पद असो, मी अखंडीतपणे लोकप्रतिनिधित्व केले. ह्या प्रदीर्घ कार्यकाळात मी राज्य सरकार मध्ये विविध विभागांची मंत्रीपदे, विधीमंडळातील विरोधी पक्षनेतेपद राज्याचे ४ वेळा मुख्यमंत्रीपद, केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्री, लोकसभेतील विरोधी पक्षनेते पद व युपीए सरकारच्या काळात पुन्हा कृषिखात्याचे मंत्रीपद अशा महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. अशा रितीने मी एकूण ५६ वर्षे सार्वजनिक जीवनात लोकप्रतिनिधी म्हणून सतत कार्यरत आहे.

१९९९ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना झाली, तेव्हापासून गेली २४ वर्षे राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. सार्वजनीक जीवनातील १ मे १९६० पासून सुरू झालेला हा संपुर्ण प्रवास गेली ६३ वर्षे अविरत चालू आहे. त्यापैकी ५६ वर्षे मी कुठल्या ना कुठल्या सभागृहाचा सदस्य किंवा मंत्री म्हणून सातत्याने काम करत आहे. संसदेतील राज्यसभा सदस्यपदाची पुढील ३ वर्षे शिल्लक आहेत. या काळात राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नांमध्ये अधिकाधीक लक्ष घालण्यावर माझा भर असेल, याशिवाय मी कोणतीही अन्य जबाबदारी घेणार नाही. सार्वजनिक जीवनातील 1 मे, 1960 ते 1 मे 2023 इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि शिक्षण, शेती, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अधिक काम करण्याचा माझा मानस आहे. तसेच युवक, युवती व विद्यार्थी यांच्या संघटनांकडे आणि कामगार, दलित, आदिवासी व समाजातील इतर कमकूवत घटकांच्या प्रश्नांकडे माझे लक्ष राहिल. आपणास माहित आहे कि माझा अनेक स्वयंसेवी संस्थाच्या कामकाजामध्ये सहभाग आहे.

रयत शिक्षण संस्था (सातारा), विद्या प्रतिष्ठान (बारामती), मराठा मंदीर (मुंबई), महात्मा गांधी सर्वोदय संघ (उरळी कांचन, पुणे), शिवनगर विद्या प्रसारक मंडळ (बारामती), अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद (पुणे) ह्या संस्थांमधून साडेचार लाखाहून अधिक विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेतात. तसेच मुंबई शहरामध्ये वैज्ञानिक क्षेत्राला प्रोत्साहित करणारे नेहरू सेंटर, महाराष्ट्राच्या विविध प्रश्नासंबंधी अभ्यास करणारे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान वाचन संस्कृतीला प्रोत्साहित करणारी काही लाख ग्रंथांचे संवर्धन करणारी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय संस्था, पुणे जिल्ह्यातील मांजरी बु. येथील ऊस व साखरकारखानदारी क्षेत्रात संशोधन विस्तार कार्य करणारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यासारख्या अनेक संस्थांची मी जबाबदारी सांभाळत आहे व माझे योगदान देत आहे. ह्या कार्यावर यापुढे मी अधिक लक्ष देणार आहे.

गेल्या 60 वर्षांत महाराष्ट्राने आपण सर्वांनी मला खंबीर साथ व प्रेम दिले, हे मी विसरू शकत नाही. परंतू यापुढे पक्ष संघटनेच्या संदर्भात पुढील दिशा ठरवणे आवश्यक वाटते. रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सदस्यांची एक समिती गठीत करावी असे मी सुचवू इच्छितो.

सदर समितीत खालीलप्रमाणे सदस्य असावेत.

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे,. के. के. शर्मा, पी. सी. पाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, . छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनील देशमुख, श्री. राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, . हसन मुश्रीफ, . धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड तसेच इतर सदस्य : श्रीमती फौजिया खान, अध्यक्षा, राष्ट्रवादी महिला काँग्रेस, श्री. धीरज शर्मा, अध्यक्ष

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, कु. सोनिया दूहन, अध्यक्षा, राष्ट्रवादी युवती काँग्रेस आणि अध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस. हि समिती अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेईल आणि पक्ष संघटना वाढीसाठी, पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोचवण्यासाठी, जनसेवेसाठी सातत्याने झटत राहिल असा मी विश्वास व्यक्त करतो.

माझ्या सहकाऱ्यांनो, मी अध्यक्षपदावरून जरी निवृत्त होत असलो तरी माझी सार्वजनिक कार्यातून निवृत्ती नाही. मी साठ दशकांहून अधिक काळ जनमाणसांत काम करीत आलो आहे, त्या सेवेत कुठलाही खंड पडणार नाही. उलट सार्वजनिक कार्यात मला अधिक वेळ देता येईल. मी पुणे, बारामती, मुंबई, दिल्ली अथवा कुठेही असू आपणा सर्वांसाठी नेहमीप्रमाणे भल्या सकाळपासून उपलब्ध राहिल. जनतेच्या अडीअडचणी प्रश्न यांच्या सोडवणूकीसाठी अहोरात्र कष्ट घेत राहिल.

सततचा प्रवास हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. मी आपल्या भेटीसाठी सार्वजनिक कार्यक्रम, सभा समारंभाना येत राहिल. आपणाशी संवाद साधण्यासाठी, आपल्या समस्या जाणून घेण्यासाठी, आपली गान्हाणी ऐकण्यासाठी आणि सरकारकडे मांडण्यासाठी माझी पायपीट अविरतपणे चालू राहिल.

जनतेचे प्रेम आणि विश्वास हाच माझा श्वास आहे. त्यामुळे आपणापासून कोणतीही फारकत नाही. मी आपणासोबत होतो आहे व शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहणार त्यामुळे भेटत राहू, धन्यवाद ! जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी !

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube