Shirdi loksabha: आठवलेंना विखे-पवार वाद नडला, अपप्रचाराचा फटका !

  • Written By: Published:
Shirdi loksabha: आठवलेंना विखे-पवार वाद नडला, अपप्रचाराचा फटका !

अहमदनगरः केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून लढण्याचा मनसुबा बोलून दाखविला आहे. या मतदारसंघातून मी पुन्हा लढणार आहे हे त्यांनी आतापर्यंत तीन ते चार वेळा माध्यमांसमोर बोलून दाखविले आहे. आठवले यांनी ही इच्छा बोलून दाखविल्यानंतर पुन्हा त्यांच्या पराभवाच्या कारणांची चर्चा सुरू झाली आहे.

आठवले आता भाजपकडून राज्यसभा सदस्य असून, सामाजिक न्याय राज्यमंत्री आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ते शिर्डी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा बोलून दाखवत आहेत. 2009 मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघ राखीव झाला. अनेकदा खासदार झालेले बाळासाहेब विखे यांचा मतदारसंघ गेला होता. त्यामुळे राखीव जागेवर अनेक जण इच्छूक होते. या मतदारसंघात राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीकडून रामदास आठवले इच्छूक होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीतील वजन वापरून हा मतदारसंघ आठवले यांना मिळवून दिला होता.

या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीतील बलाढ्य नेते असल्याने आठवले यांना विजयाची खात्री होती. आठवले आणि शिवसेनेकडून भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात लढत झाली. त्यात आठवले यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला.

आठवले पुन्हा शिर्डीतून उभे राहणार? शिंदे गटाचं टेन्शन वाढलं

माझ्या पराभवाला विखेही जबाबदार असल्याचा आरोप आठवले यांनी केला होता. 2009 मध्ये शिर्डी मतदारसंघ राखीव झाल्याने विखे हे अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढविण्यास इच्छूक होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा विखेंसाठी काँग्रेसला सोडण्यास नकार दिला. त्या वादामुळे आठवले यांचा पराभव झाल्याची राजकीय चर्चा होती.

तसेच अॅट्रासिटीच्या मुद्द्याचा मतदारसंघात अपप्रचार झाला होता. आठवले यांनी ही सलही अनेकदा बोलवून दाखविली आहे. या मतदारसंघात बाहेरून उमेदवार दिला गेला आहे. त्याची नाराजी होती. त्यामुळे आठवलेंना मतदारांनी नाकारल्याचे एक कारण आहे.

आता पुन्हा आठवले शिर्डीतून निवडणूक लढवू इच्छित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शब्द टाकल्यास पालकमंत्री राधाकृष्ण विखे आपल्याला निवडून आणतील असा विश्वास त्यांना आहे. पुन्हा जनतेतून खासदार होण्याचे स्वप्न ते पाहत असले तरी जुन्या पराभवाच्या जखमांच्या वेदना त्यांच्या मनातून अजूनही गेलेल्या नाहीत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube