मुनंगटीवार-जोरगेवार वादासमोर प्रदेशाध्यक्षांनी हात टेकले; आता थेट अमित शाह फैसला करणार
Sudhir Mungantiwar vs Kishor Jorgewar-भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी हा वाद माझ्या आटोक्याबाहेर गेल्याचे म्हटलंय.
Sudhir Mungantiwar vs Kishor Jorgewar: भाजपमधील अनुभवी नेते असूनही सुधीर मुनगंटीवार (
Sudhir Mungantiwar) यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. तेव्हापासून सुधीरभाऊ हे पक्ष नेतृत्वावर खप्पा मर्जी आहेत. ते जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त करतात. सभागृहातही सरकारला धारेवर धरण्यासारखे प्रश्न विचारतात. तर चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार (Kishor Jorgewar) यांच्यामध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे. दोघांमधील वाद अनेकदा विकोपाला गेलेला आहे. आता तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी हा वाद माझ्या आटोक्याबाहेर गेल्याचे म्हटलंय. त्यातून मुनगंटीवार आणि जोरगेवार वाद किती विकोपाला गेलाय हे दिसून येत आहे. त्यामुळे आता थेट दिल्लीतून या वादावर तोडगा निघण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
वादाचा महानगरपालिकेतही फटका ?
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या झोन समिती आणि महिला बालकल्याण समितीची निवडणूक पार पडली. त्यात संख्याबळ अनुकूल असतानाही भाजपला जोरदार धक्का बसला. मुनगंटीवार-जोरगेवार यांच्या वादामुळे भाजपच्या उमेदवार पराभव झाला. त्यामुळे चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार हेही मुनंगटीवार यांच्यावर चिडले. त्यांनी 17 समर्थक नगरसेवकांसह नागपूर गाठले. तेथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. दोघांमधील वादात रविंद्र चव्हाण हेही हतबल दिसले आहेत. चंद्रपुरातील वाद माझ्या आटोक्याबाहेर असून, आता याचा निर्णय थेट दिल्लीतूनच घेतला जाईल, असे संकेत चव्हाणांनी दिले आहेत.
निरीक्षक म्हणून जायला कोणी तयार नाही ?
मुनगंटीवार आणि जोरगेवारमध्ये राजकीय संघर्ष आहे. त्यात मुनगंटीवर हे तब्बल सातवेळा आमदार झालेले आहेत. ते भाजपमधील ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे पक्षातील इतर कोणीही दोघांमधील वाद सोडविण्यासाठी पुढे येत नाहीत. तसेच चंद्रपूरात कोणताही नेता निरीक्षक म्हणून जाण्यास धजावत नाहीत. काही दिवसांपूर्वीच माजी राज्यमंत्री मदन येरावार यांची चंद्रपूर भाजपच्या निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु त्यांनी निरीक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. मुनगंटीवार हे पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनीही मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहेत. त्यामुळे तेही वादात तोडगा काढू शकत नाही. त्यामुळे हा वाद थेट दिल्लीत जाणार आहे.
किशोर जोरगेवार यांच्या भाजप प्रवेशाला विरोध
किशोर जोरगेवार हे 2019 ला चंद्रपूर मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेले आहेत. त्यानंतर 2024 ला ते भाजपमध्ये आले. तेव्हाही सुधीर मुनगंटीवार यांनी जोरगेवार यांच्या प्रवेशाला जाहीर विरोध केला होता. त्यानंतरही जोरगेवार यांचा भाजप प्रवेश झाला आणि ते चंद्रपूरमधून निवडून आले. तेव्हापासून सुधीर मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यामध्ये वाद झाला.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार हे लोकसभेचे उमेदवार होते. त्यांची इच्छा नसतानाही भाजपने त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले होते. परंतु त्यांचा मोठा पराभव झाला. परंतु विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. परंतु मंत्रिमंडळातून मात्र त्यांना डावलण्यात आलेले आहेत. तेव्हापासून सुधीर मुनंगटीवार हे पक्षातील लोकांशी संघर्ष करत आहेत. आता तर मुनगंटीवार-जोरगेवार वाद थेट दिल्लीत जाणार आहे म्हणजेच अमित शाह हेच यावर निर्णय घेणार आहे. मुनंगटीवारांना पक्षाकडून साइडलाइन केले जात आहे. त्यामुळे दिल्लीचा निर्णय काय होतो, त्यावर मुनगंटीवार यांचे पुढील राजकीय भवितव्य अंवलबून राहणार आहे.