Anand Dighe : आनंद दिघे यांच्या सुटकेसाठी ठाण्यातील लहान मुलांनी मोर्चा काढला होता
एकनाथ शिंदे यांच्यामुळे ठाणे मोठं चर्चेत आहे. पण एकनाथ शिंदे यांच्याआधीही ठाणे प्रचंड चर्चेत असायचं ते आनंद दिघे यांच्यामुळे. ठाण्यामध्ये आनंद दिघे (Anand Dighe) आणि टेंभी नाका हे समीकरण होत. आज आनंद दिघे यांची जयंती, त्यानिमित्ताने आनंद दिघे आणि त्यांच्या याच टेंभी नाक्याविषयी
आनंद दिघेंचा जन्म 27 जानेवारी 1952चा. ठाण्यातल्या टेंभी नाका (Tembhi Naka) परिसरात त्यांचं घर होत. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी शिवसेना स्थापन केल्यानंतर या परिसरात शिवसेनेच्या सभा व्हायच्या. तरुण आनंद दिघेही बाळासाहेबांच्या सभांना उपस्थित राहायचे. बाळासाहेबांचं वक्तृत्व ऐकून ८०च्या दशकात आनंद दिघे शिवसेनेत सक्रिय झाले आणि शिवसेनेला आनंद दिघे यांच्या रूपानं धडाडीचा कार्यकर्ता मिळाला. दिघेंच्या कामाची धडाडी पाहून शिवसेनेनं त्यांच्या खांद्यावर ठाणे जिल्हाप्रमुखाची जबाबदारी दिली.
टेंभी नाक्यावरचा जनता दरबार
शिवसेनेत सक्रिय झाल्यानंतर दिघे यांनी टेंभी नाका परिसरात ‘आनंद आश्रमा’ची स्थापना केली. दररोज सकाळी या आश्रमात ‘जनता दरबार’ भरायचा. परिसरातील लोक त्यांच्या समस्या दिघेंना सांगायचे आणि ते त्या तत्काळ सोडवायचे. असं म्हणतात आनंद दिघे यांची कामाची पद्धत एकदम झटपट होती, कोणताही प्रश्न ते जागच्या जागी सोडवायचे. त्यामुळे त्यांच्या जनता दरबारातील गर्दी वाढत चालली.
ठाणे परिसरात त्यांची प्रसिद्धी इतकी वाढली कि लोक त्यांना प्रतिबाळासाहेब म्हणू लागले. “दिघेंनी कोणतीही निवडणूक लढवली नसली किंवा कोणत्याही पदाची अभिलाषा बाळगली नसली तर ते ‘ठाण्याचे बाळ ठाकरे’ झाले होते, असं त्याकाळी फ्रंटलाईन या मासिकात छापून आलं होतं.
टेंभी नाक्यावरचा नवरात्र उत्सव
टेंभी नाक्यावर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या जनता दरबारासोबत त्यांनी सुरु केलेले उत्सवही मोठे चर्चेत होते. आनंद दिघे यांनी सुरू केलेला नवरात्र उत्सव म्हणजेच टेंभी नाका इथला नवरात्र उत्सव. त्यासाठी ठाण्याची दुर्गेश्वरी असे नाव असलेल्या टेंभी नाका इथल्या देवीचा इतिहासही जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
1978 साली आनंद दिघे यांनी याची सुरुवात केली. या देवीच्या मूर्तीचे देखील एक वैशिष्ट्य आहे. आनंद दिघे यांना झालेल्या देवीच्या साक्षात्काराची त्यांनी तशीच्या तशी मूर्ती बनवून घेतली. तीच आणि तशीच मूर्ती आजतागायत घडवली जात आहे. स्वतः आनंद दिघे हे देवीची नऊ दिवस श्रद्धेने उपासना करायचे. हळूहळू टेंभी नाक्यावरील हा नवरात्र उत्सव ठाण्यात आणि ठाण्याच्या बाहेर देखील ख्याती मिळू लागला.
अगदी बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते, मुख्यमंत्री, आमदार, खासदार, महापौर, हे अनेक वेळा या देवीच्या दर्शनाला येऊन गेले आहेत. फक्त शिवसेनेचेच नाही तर सर्वपक्षीय महत्त्वाचे नेते सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या देवीच्या दर्शनाला दरवर्षी येतात.
2002 यावर्षी आनंद दिघे यांचे निधन झाले. त्यानंतर ठाण्यातील शिवसेनेच्या नेत्यांनी हा उत्सव सुरू ठेवला. महत्त्वाचे म्हणजे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाका येथील नवरात्र उत्सवाची परंपरा बंद पडू दिली नाही. त्यामुळे देवीच्या आगमनाला अष्टमीला आणि विसर्जनाला देखील एकनाथ शिंदे स्वतः हजेरी लावतात.
लहान मुलांनी काढला होता मोर्चा
आनंद दिघे यांचा वचक असा होता की लोक समोर जायलाही घाबरायचे पण आनंद दिघे ठाण्यातला लहान मुलामध्ये मिसळून जायचे. लहान मुलांचं शिक्षणासाठी ते विशेष प्रयत्नही करायचे.
ठाण्यातील शिवसेनेचे नगरसेवक श्रीधर खोपकर यांची हत्या झाल्यांनतर त्या प्ररकणात आनंद दिघे यांना अटक झाली. त्यांना अटक झाल्यानंतर ठाण्यातील लहान मुलांनी दिघे काकांना सोडा म्हणून ठाणे आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला होता. लहान मुलांनी एखाद्या नेत्यासाठी काढलेला हा एकमेव मोर्चा असेल.
आनंद दिघे यांचा मृत्यू आणि ठाण्यातला संग्राम
आनंद दिघे यांनी टेंभी नाक्यावरच्या नवरात्र उत्सवासोबत गणेशोत्सव, दहीहंडी असे उत्सव सुरु केले. त्याला प्रसिद्धीही मोठी मिळाली. 24 ऑगस्ट 2001च्या दिवशी गणेशोत्सवात आनंद दिघे कार्यकर्त्यांच्या घरी भेटी देत होते. अशातच त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं आणि डोक्याला मार लागला. अपघातानंतर त्यांना ठाण्यातील सिंघानिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथं त्यांच्यावर सर्जरी करण्यात आली.
दोन दिवसांनी 26 तारखेला दुपारी त्यांच्या पायाचं ऑपरेशन करण्यात आलं. पण संध्याकाळी त्यांची तब्येत खालावू लागली. संध्याकाळी 7.15 वाजता त्यांना पहिला हार्ट अटॅक आला. 7.25 मिनिटांनी त्यांना दुसरा मोठा हार्ट अटॅक आला. अखेर रात्री 10.30 वाजता हॉस्पिटलमध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यावेळी त्यांचं वय होत अवघं 50 वर्ष
आनंद दिघे यांची प्रसिद्धी आणि त्यांना मानणारा वर्ग मोठा होता. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला हे सांगण्यास कुणीच तयार नव्हतं. शेवटी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं की, “आनंद दिघे आपल्यातून गेले.” हे ऐकताच हॉस्पिलबाहेर जमलेल्या गर्दीने संपूर्ण हॉस्पिटल जाळून खाक केलं. ठाणे बंद ठेवण्यात आलं. यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आणि नंतर 34 जणांना अटकही करण्यात आली.
आनंद दिघे यांच्यानंतर ठाण्याची शिवसेना एकनाथ शिंदे यांनी सांभाळली. आनंद दिघे यांनी सुरु केलेला जनता दरबार, टेंभी नाक्यावरचा नवरात्र महोत्सवही त्यांनी आजवर चालू ठेवला आहे.