मिंध्यांचा पुरता फियास्को झाला, रिकाम्या खुर्च्यांवरुन ठाकरे गटानं शिंदेंना डिवचलं
मुंबई : वरळीमधील स्पोर्ट्स क्लबच्या मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांची सभा झाली. मात्र, तेथील आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)यांच्या मतदारसंघातील नागरिकांनी या कार्यक्रमाकडं पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालंय. त्यामुळं मैदान रिकामे राहिलं आणि मिंध्यांचा पुरता फियास्को झाल्याचा दावा शिवसेनेच्या ठाकरे (Shivsena Thackeray Group)गटाकडून करण्यात आलाय. ठाकरे गटानं या सभेतील रिकाम्या खुर्चांचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर (Social Media)व्हायरल केल्याचं पाहायला मिळतंय.
ठाकरे गटाचं मुखपत्र सामनामध्ये याबद्दल म्हटलंय की, शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या मिंध्यांचे स्वागत आज वरळीकरांनी रिकाम्या खुर्च्यांनी केलं. कोळी बांधवांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्काराचा कार्यक्रम वरळी स्पोर्टस् क्लबच्या मैदानात आयोजित केला होता. तसे होर्डिंग्ज मिंधे गटाकडून लावण्यात आले होते. मात्र, सभेला काही मोजकेच लोक व्यासपीठाजवळच्या खुर्च्यांवर बसलेले दिसले. पाठीमागच्या हजारोंच्या खुर्च्या रिकाम्या होत्या.
यावेळी उपस्थितांना कोळी बांधवांच्या पारंपारिक टोप्या देऊन मिंध्यांनी वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला होता. अगदी पत्रकार आणि साध्या वेशातील पोलिसांनाही टोप्या वाटल्या, पण सभा फ्लॉप ठरली. नागरी सत्काराचं निमित्त करुन जाहीर सभा घेतली. वरळीत शक्तिप्रदर्शन करण्याच्या मनसुब्यानंच हा सगळा घाट घातल्याची टीका केली आहे. या सभेचा मोठा गाजावाजा केला गेला. मात्र, प्रत्यक्षात मिंधे तोंडावर आपटल्याचा दावा सामनामधून करण्यात आलाय.
वरळीत सभेची तयारी करण्यात आली होती. खूप मोठ्या प्रमाणात खुर्च्या मांडल्या होत्या. सायंकाळी सहा वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार होती. मात्र, सात वाजल्यानंतरही मैदानात अपेक्षित गर्दी दिसत नव्हती. त्यामुळं मिंध्यांची पंचाईत झाली. सभेला गर्दी नसल्याचं कळल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीही उशिरानं सभास्थळी पोहचले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे भाषण सुरू असतानाही अनेक लोक निघून गेले. त्यानंतर रिकाम्या खुर्च्या व्हिडीओमध्ये झळकू नयेत म्हणून कंत्राटदाराला कामाला लावण्यात आलं. यावेळी रिकाम्या खुर्च्या घाईघाईत हटवण्यात आल्या. तरीही रिकामी खुर्च्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचंही शिवसेनेनं म्हटलंय.