लोकायुक्त कायदा संमत होताना राष्ट्रवादीचे नेते मात्र… भाजप आमदाराची टीका
नागपूर : ‘भ्रष्टाचारावर कठोर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार लोकायुक्त कायद्याचा मसुदा विधिमंडळात संमत करून घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगवास भोगणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनमुक्तीचा सोहळा साजरा करत होते. भ्रष्टाचाऱ्यांचे उदात्तीकरण करणाऱ्या या संस्कृतीमुळे महाराष्ट्राची मान लाजेने खाली गेली आहे. अशी कठोर टीका भाजपाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी आज केली.
देशमुख यांना प्रकृतीच्या कारणावरून याचना केल्यामुळे न्यायालयाने जामीनावर सोडले असताना, तुरुंगाबाहेर येणाऱ्या देशमुखांना स्वातंत्र्ययोद्ध्यासारखा सन्मान देत त्यांची मिरवणूक काढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचा भ्रष्टाचाराने बरबटलेला चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे, असेही आमदार माधुरी मिसाळ यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
याआधी छगन भुजबळ हेदेखील जामिनावरच मुक्त झालेले असून त्यांनाही आरोपमुक्त करण्यात आलेले नाही. आरोपांचे डाग ढळढळीतपणे कपाळावर मिरविणाऱ्या या नेत्यांचे उदात्तीकरण करून त्यांच्या मिरवणुका काढण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संस्कृतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणास काळीमा लागला आहे, असेही त्या म्हणाल्या.
जामिनावर मुक्त झालेल्या आरोपीच्या स्वागतास व मिरवणुकीस हजर राहण्यासाठी सरकारची दिशाभूल करून सरकारी विमानाचा गैरवापर केल्याप्रकरणी अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अशी मागणीही श्रीमती मिसाळ यांनी केली. अनिल देशमुख, संजय राऊत आदी नेते आरोपी आहेत. त्यांची निर्दोष मुक्तता झालेली नाही. त्यामुळे पुन्हा त्यांना तुरुंगात जायची वेळ येईल, तेव्हा पुन्हा मिरवणुकीने त्यांची पाठवणी करणार का, असा खोचक सवालही त्यांनी केला.