अजितदादांच्या डोक्यात नाशिक लोकसभेसाठी माणिकराव कोकाटे? गोडसे, भुजबळांना टेन्शन
नाशिक (३० मार्च) : काल नाशिकमधील (Nashik loksabha) सिन्नर येथे शेतकरी मेळावा पार पडला. कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) प्रमुख वक्ते असल्यामुळे राष्ट्रवादीचे सारे नेते उपस्थित होते. पण यामध्ये चर्चा झाली अजित पवार यांच्या एका वाक्याची. आपल्या भाषणात बोलताना अजित पवार माणिकराव कोकाटे यांना उद्देशून म्हणाले की “मी तर तुम्हाला खासदार करण्याच्या विचारात होतो.” त्यांच्या या वाक्याची मोठी चर्चा झाली, त्याला कारणही तसेच होते. त्या व्यासपीठावर राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळही व्यासपीठावर होते.
अजित पवार मुखमंत्री आणि…
या शेतकरी मेळाव्याच्या ठिकाणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यात आले होते. अजित पवार स्वतः व्यासपीठावर असताना भावी मुखमंत्री असे बॅनर पाहून अनेकांच्या मनात बरंच काही येऊन गेलं.
पण याच कार्यक्रमात सिन्नरचे आमदार माणिकराव कोकटे यांनी एक वर्षासाठी ऊर्जा किंवा वित्त मंत्री करा, अशी मागणी अजित पवार यांच्याकडे केली. ते म्हणाले की “सध्या शेतकऱ्यांच्या वीजेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मला तुम्ही उर्जामंत्री करा, मी शेतकऱ्यांना पुरेसा वीजपुरवठा होईल अशी व्यवस्था करील. अगदी दिवसा वीजपुरवठा देखील करणे शक्य आहे. तुम्ही मला तुम्ही उर्जामंत्री करा.”
डाव उलटा पडला तर आम्ही सत्तेत येऊ, तेव्हा…राऊतांनी दिला इशारा
तुम्हाला खासदार करायचा विचार
या कार्यक्रमात शेवटी अजित पवार भाषण करण्यासाठी उभे राहिले. ते बोलतांना म्हणाले, “अरे आपले सरकार नाही. मग तुम्हाला मंत्री कसे करू? मी तर तुम्हाला खासदार करण्याच्या विचारात होतो.” अजित पवार असं म्हणल्यामुळे एकप्रकारे अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना लोकसभेच्या तयारीला लागा, असा संदेश दिला तर नाही ना. याची चर्चा सुरु झाली.
पण याच कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ उपस्थित होते. समीर भुजबळ नाशिक लोकसभा मतदारसंघातून २००९ साली खासदार होते. त्यानंतर २०१४ साली छगन भुजबळ यांनी लोकसभा लढवली होती. पण त्यावेळी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. २०१९ साली पुन्हा समीर भुजबळ पुन्हा लोकसभेच्या रिंगणात होते. पण याही वेळी त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
त्यामुळे या वेळी नाशिक मधून कोण लोकसभा असा प्रश्न असतानाच अजित पवार यांच्या या वाक्यामुळे पुन्हा याची चर्चा सुरु झाली. स्थानिक पत्रकारांच्या मते यावेळी भुजबळ परिवारातून कोणीही लोकसभेच्या मैदानात उतरायला तयार नाही. २०२४ च्या लोकसभेऐवजी भूजबळ परिवारातून दोन्ही नेते विधानसभा लढतील.
मोदींनीच चोरांची यादी जाहीर केलीय ना ? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
महाविकास आघाडीचे समीकरण?
सध्याचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत. पण महाविकास आघाडी म्हणून जागावाटप केल्यास नाशिक लोकसभा उद्धव ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जर जागा शिवसेना (ठाकरे गट) गेल्यास राष्ट्रवादीकडून अशा प्रकारची उमेदवारीची घोषणा केल्यास महाविकास आघाडीची भूमिका काय असेल ? असा प्रश्नही आहे.
याच पार्श्वभूमीवर कदाचित माणिकराव कोकाटे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली तर ते शिवसेनेचे उमेदवार म्हणूनही लोकसभा लढतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे, बाकी लोकसभेला अजून एक वर्ष बाकी आहे, त्यामुळे येत्या काळात कोण काय भूमिका घेत हे पाहावं लागणार आहे.