काँग्रेसचा माजी आमदार राहुल बोंद्रे रडारवर का?
प्रफुल्ल साळुंखे
मुंबईः बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मतदारसंघाचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या सूतगिरणीवर जिल्हा बँकेने जप्तीची कारवाई सुरू केली आहे. राज्यातील अनेक साखर कारखाने आणि सूतगिरणीवर शेकडो कोटी रुपयांचे कर्ज असताना बोंद्रे यांच्या सूतगिरणीवर जप्तीची कारवाई सुरू झाली आहे. खरंतर २६ कोटी रुपयांची ही थकबाकी आहे. ती भरण्याची तयारी बोंद्रे यांनी दाखवली आहे.
खरंतर या कारवाई मागे कोण? याच उत्तर तालुक्याला नव्हे तर जिल्ह्याला माहीत आहे. बोंद्रे ज्या मतदारसंघाचे आमदार होते, त्या चिखली मतदारसंघात सध्या भाजपाच्या श्वेता महाले या विद्यमान आमदार आहेत. श्वेता महाले या उपमुख्यमंत्री कार्यालयात स्वीय सहायक विद्याधर महाले यांच्या पत्नी आहेत. ही देखील पार्श्वभूमी महत्वाची आहे.
राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडपैकी एक राहुल बोंद्रे आहेत. २०१९ च्या निवडणुकीत राहुल बोंद्रे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी अनेकांना अपेक्षा होती. पण राहुल बोंद्रे यांनी काँग्रेसचा हात सोडला नाही. बोंद्रे अतिशय कमी मताने या मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. बुलढाणा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आहे. जर महाआघाडी एकसंघ लढली तर शिवसेना शिंदे गटाला निवडणूक अवघड आहे. कारण या मतदारसंघात बुलढाणा, चिखली या दोन मतदारसंघात बोंद्रे यांचं वलय आहे.
तेच बाजूला पडले तर लोकसभा आणि चिखली विधानसभा या दोन्हींचा मार्ग देखील सुकर होईल हे बुलढाण्यात चित्र आहे.
ही सर्व पार्श्वभूमी पाहता राहुल बोंद्रे यांच्या सूतगिरणी रडारवर आली आहे का? अशी चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.