शिंदे गटाला निधीसाठी पुन्हा अजित पवारांच्या टोलनाक्यावर यावं लागलं; यशोमती ठाकुरांनी डिवचलं
Yashomati Thakur : अजित पवारांसह (Ajit Pawar) राष्ट्र्वादीच्या नऊ मंत्र्यांचा समावेश शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारमध्ये झाल्यानंतर अखेर आज दोन आठवड्यांनी रखडलेसे खातेवाटप झाले आहे. या खातेवाटपात भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील काही खाती राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना देण्यात आली आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटातील खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), अब्दुल सत्तार, दादा भुसे आणि संजय राठोड यांचे प्रत्येकी एकेक खाते कमी करून ते खाते राष्ट्रवादीला देण्यात आले. यावरून आता माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur)यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे. (Yashomati Thakur critisize shinde group over finance ministry ajit pawar)
आज राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटप झालं. उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सर्व ९ मंत्र्यांना अनेक चांगली खाती मिळाली आहेत. सर्वात महत्वाचं असलेलं अर्थखाते हे अजित पवारांकडे सोपवण्यात आलं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजिच पवार अर्थमंत्री असतांना निधी देत नसल्याची तक्रार करणाऱ्यांना आता पुन्हा अजित पवारांच्या टोलनाक्यावर येऊन थांबावं लागलं आहे, अशी घणाघाती टीका यशोमती ठाकूर यांनी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली.
अजित पवारांच्या कॅबिनवर असणार शरद पवारांचा वॉच; पाहा काय आहे प्रकरण?
यशोमती ठाकूर यांनी ट्विट करत लिहिलं की, अजित पवार आर्थिक नाकेबंदी करतात म्हणून महाराष्ट्राची हद्द ओलांडून सुरतमार्गे गुवाहाटी-गोवा करत राज्यात पोहोचलेल्या शिंदे गटाला अखेर अजित पवारांच्याच टोलनाक्यावर येऊन थांबावं लागलं. ही एकनाथ शिंदे यांच्या राजकीय कारकीर्दीची शोकांतिका आहे. शिंदे यांचे राजकीय अस्तित्व फार दिवसांचं नाही हेच आज सिध्द झालं. हिवाळी अधिवेशनात एकनाथ शिंदे नसतील हे आज स्पष्ट झालं, असं ट्विट ठाकूर यांनी केलं.
अजित पवार आर्थिक नाकेबंदी करतात म्हणून महाराष्ट्राची हद्द ओलांडून सुरत मार्गे गुवाहाटी-गोवा करत राज्यात पोहोचलेल्या शिंदेगटाला शेवटी अजित पवारांच्याच टोलनाक्यावर येऊन थांबावं लागलं ही एकनाथ शिंदे यांच्या राजकीय कारकीर्दीची शोकांतिका आहे. शिंदे यांचे राजकीय अस्तित्व फार दिवसाचं…
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) July 14, 2023
खातेवाटपामध्ये शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे कृषी खातं होतं. मात्र, यावरून आरोप-प्रत्यारोप झाले होते. यानंतर सत्तार यांच्याकडील कृषी खाते जाणार अशी चर्चा होती. दरम्यान, सत्तार यांच्याकडील कृषी खाते हे राष्ट्रवादीचे फायरब्रॅंड नेते धनंजय मुंडेंकडे देण्यात आलं. तर सीएम शिंदेंकडील मदत आणि पुनर्वसन हे खाते अनिल पाटील यांनी मिळालं आहे. आणि शिंदे गटाच्या संजय राठोड यांच्याकडे असलेलं अन्न आणि औषध प्रशासन हे खातं धर्मरावबाबा आत्राम यांना मिळालं आहे. शिवसेनेतील तीन खाती कमी करून राष्ट्रवादीला मिळाली आहेत. महत्वाचं खातं असलेलं अर्थ खाते अजित पवारांना मिळालं. त्यामुळं आता निधीसाठी शिंदे गटाच्या आमदारांना अजितदादांकडेच धाव घ्यावी लागणार असल्याचं दिसतं.
दरम्यान, अजित पवारांना अर्थ खातं मिळालं यावर आणि यशोमती ठाकूर यांनी केलेल्या टीकेवर शिंदे गट काय प्रतिक्रिया देणार, हेच पाहणं महत्वांचं आहे.