Pune Loksabha : प्रशांत जगताप यांना उमेदवारी मिळावी; जयंत पाटलांकडून पुणे लोकसभेवर दावा
गिरीश बापट यांच्या निधनानंतर लगेच त्यांच्या जागी निवडणुकीची चर्चा नको आहे, पण भाजपकडून तशी मागणी होत आहे. त्यामुळे आम्ही देखील प्रशांत जगताप यांना उमेदवारी मिळावी, अशी आमच्या पक्षाची मागणी आहे. असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज केलं आहे.
जयंत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे पुणे लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून देखील तयारी सुरु केली असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे परंपरागत काँग्रेसचा मतदारसंघ असलेल्या पुणे लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीने दावेदारी केल्याने पुणे लोकसभेच्या उमेदवारीहून महाविकास आघाडीमध्येच संघर्ष उभे राहण्याची शक्यता आहे.
पुण्याच्या लोकसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा डोळा?
काही दिवसांपूर्वी भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांचे बॅनर लागले होते. यावरुन त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. गिरीश बापट यांना जाऊन काहीच दिवस झाले असताना हे बॅनर लागले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप यांचे पुण्यनगरीचे भावी खासदार म्हणून होर्डिंग लागले आहेत. त्यावरून आज जयंत पाटील यांनी भूमिका मांडली.
यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, प्रशांत जगताप हे चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांना लोकसभेची निवडणूक उमेदवारी मिळावी अशी आमच्या पक्षातील अनेकांची इच्छा आहे. त्यामुळे जर निवडणूक होणार असेल तर प्रशांत जगताप यांना उमेदवारी मिळावी अशी आमच्या पक्षाची मागणी आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत याबाबत आम्ही तशी चर्चा करु, असं मत जयंत पाटील यांनी मांडलं आहे.
‘राष्ट्रवादी’ला मोठा धक्का! राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द
पण यावरुन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्येच वाद होण्याची शक्यता आहे. याचे कारण पुणे लोकसभेची जागा ही परंपरागत काँग्रेसकडे आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते व माजी मंत्र विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस पुणे लोकसभेची पोटनिवडणुक लढवणार असे म्हटले होते. त्यामुळे यावरुन आता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्येच संघर्ष होण्याची शक्यता दिसत आहे.
दरम्यान, भाजपकडून या जागेसाठी दिवंगत खासदार गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि माजी खासदार संजय काकडे यांचं नाव आघाडीवर आहे, तर दुसरीकडे काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर आणि मोहन जोशी यांची नावं चर्चेत आहेत.