पुण्याच्या लोकसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा डोळा?
NCP Prashant Jagtap : पुण्यात भावी खासदारच्या फ्लेक्सवरुन राजकारण आता चांगलेच तापू लागले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचेही भावी खासदार म्हणून शहरात फ्लेक्स लावण्यात आल्याने पुन्हा एकदा वातावरण चांगलेच तापले आहे. वस्तूत: महाविकास आघाडीत पुणे लोकसभेची जागा काँग्रेस पक्षाकडे आहे. परंतु, प्रशांत जगताप यांचे निमित्त करुन राष्ट्रवादी काँग्रेसचा पुण्याच्या लोकसभेच्या जागेवर दावा टाकत असल्याचे बोलले जात आहे.
पुणे शहराचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने अद्याप निवडणूक घेण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारची घोषणा केलेली नाही. दोन आठवड्यांचा कालावधी होत नाही तोच आता पुण्याच्या खासदारकीवरून राजकारण सुरु झाले आहे. परंतु, गिरीश बापट यांचे निधन होऊन तीन दिवस झाले नव्हते. तोच भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचे वाढदिवसानिमित्त लागलेल्या फ्लेक्सवर त्यांची भावी खासदार म्हणून उल्लेख करण्यात आला. त्यामुळे जगदीश मुळीक यांच्यावर सर्व स्तरातून प्रचंड टीका करण्यात आली होती.
मुळीकांना अजितदादांनी सुनावलं; पण आता राष्ट्रवादीकडूनच ‘भावी खासदाराची’ बॅनरबाजी – Letsupp
या मतदारसंघात पोटनिवडणुकीची शक्यता व्यक्त होत असतानाच गिरीश बापट यांच्या जागेवर भाजप कुणाला उमेदवारी देणार अशी चर्चा सुरू असताना आता यात राष्ट्रवादी काँग्रेसने उडी घेतली आहे. पुण्याच्या खासदारकीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा डोळा असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा भावी खासदारचा लागलेल्या फ्लेक्सवरुन सोमवारी दिवसभर चर्चा सुरु होती.
पुणे शहरात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे हडपसर आणि वडगावशेरी मतदार संघात असे दोन आमदार आहेत. तर २०१७ ते २०२२ या पंचवार्षिकमध्ये ३७ नगरसेवक निवडून आले होते. तर काँग्रेसचे पुणे महापालिकेतील संख्याबळ १० च्या आसपास आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पुणे लोकसभेच्या जागेवर दावा टाकत असल्याचे बोलले जात आहे.