शरद पवारांचा फोन ते अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी; देवेंद्र फडणवीसांची बारामतीकरांना ग्वाही
Devendra Fadanvis -. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून वहिनींचे कार्य मी बघितले आहे. दादांची स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता वहिनींमध्ये आहे.
Devendra Fadanvis : बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी (Baramati By Election) महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यासाठी बारामतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जोरदार सभा झाली आहे. अजितदादांच्या विमान अपघाताबाबत बारामतीकरांमध्ये जशी शंका माझ्याही मनात आहे, असा उल्लेख उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या भाषणात केला. त्यावर फडणवीस यांनी आपली भूमिका जाहीर केली. जोपर्यंत अजितदादांच्या विमान अपघाताचे सत्य बाहेर येत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही. सत्यबाहेर आणल्याशिवाय राहणार नाही, असे फडणवीस म्हणाले.
ज्येष्ठ नेते शरद पवार व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे आभार मानताना फडणवीस म्हणाले, मी विविध पक्षाचे आभार मानतो, त्यांनी उमेदवार दिलेला नाही. ज्येष्ठ नेत्यांच्या निधनानंतर आपण पोटनिवडणूक बिनविरोध करतो. मी शरद पवार यांचे आभार मानतो. कालही त्यांनी मला फोन केला. तुम्ही बारामतीमध्ये जात आहात. माझाही सुनेत्रा वहिनींना पूर्ण पाठिंबा असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उमेदवार दिला नाही, त्यांचे मी आभार मानतो.
दादांची स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता वहिनींमध्ये-देवेंद्र फडणवीस
खासदार झाल्यापासून त्या सक्रीय राजकारणात आल्या आहेत. परंतु त्यांनी इतके वर्षे, सामाजिक, अर्थ, शिक्षण क्षेत्रात योगदान दिले आहे. बारामती सांभाळण्याचे काम वहिनींनी केले आहे. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून वहिनींचे कार्य मी बघितले आहे. दादांची स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता वहिनींमध्ये आहे.
वहिनींच्या रुपाने या महाराष्ट्राला केवळ पहिल्या महिला उपमुख्यमंत्री नाहीत, तर सक्षम नेतृत्व मिळाले असल्याचे फडणवीस म्हणाले. अजितदादांचे निघून जाणं, हे केवळ सुनेत्रा पवार, जय-पार्थ व बारामतीचे नुकसान नाही. तर अखिल महाराष्ट्राचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे रेकॉर्ड ब्रेक मतांनी सुनेत्रावहिनींना निवडून द्यावे. बारामतीचे प्रलंबित रेल्वे, पूल, पाण्याचे प्रश्न सुनेत्रावहिनी सोडवतील.