भोंडल्याच्या गाण्यांनी आजीबाईंच्या आठवणींना उजाळा; वृद्धाश्रमात रंगला बालपणीचा उत्सव
पुण्यातील चतु:शृंगी मंदिर परिसरात निवारा वृद्धाश्रमातील आजीबाईंसाठी आयोजित भोंडल्यात पारंपरिक गाणी जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
Bhondla Celebration : ‘ऐलमा पैलमा गणेश देवा’ आणि ‘एक लिंबू झेलू बाई, दोन लिंबू झेलू’ अशा पारंपरिक भोंडल्याच्या गाण्यांनी चतु:शृंगी मंदिर (Pune) परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. निवारा वृद्धाश्रमातील आजीबाईंनी गाण्यांच्या तालावर फेर धरत झिम्मा आणि फुगड्यांचा आनंद लुटला. अनेक वर्षांनंतर बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने काहींच्या चेहऱ्यावर हास्य फुललं, तर काही जणी आनंदाश्रूंनी भावूक झाल्या. नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित या कार्यक्रमात आजीबाईंनी वयाचं भान विसरून बालपण पुन्हा अनुभवलं.
सुयोग मित्र मंडळ (ट्रस्ट), गोखलेनगर आणि चतु:शृंगी देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या भोंडल्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिलांनी भोंडल्याची गाणी म्हणत फेर धरला. झिम्मा-फुगड्यांसह जुन्या सणांची आणि माहेरच्या आठवणींची उजळणी झाली. अनेक वर्षांनंतर अशा पद्धतीने एकत्र येण्याची संधी मिळाल्याने आजीबाईंचा उत्साह पाहण्यासारखा होता. कार्यक्रम संपल्यानंतरही त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद कायम होता.
माधुरीने रेणुका आणि प्रिया सोबतच्या सेटवरील धम्माल आठवणींना कोण होणार करोडपतीच्या मंचावर दिला उजाळा!
वृद्धाश्रमातील महिलांना आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, त्यांच्यातील एकटेपणाची भावना कमी व्हावी आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. भोंडला हा महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतील महिलांचा पारंपरिक उत्सव असून हस्त नक्षत्राच्या काळात हत्तीच्या प्रतिमेभोवती फेर धरून गाणी म्हणण्याची प्रथा आहे. महिलांमधील स्नेह वाढवणाऱ्या आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या या परंपरेमुळे आजीबाईंना पुन्हा एकदा जुन्या दिवसांचा आनंद अनुभवता आला.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रंजना कानिटकर, कमल कनगुटकर, सुनीता मांडवकर, नंदा मोहिते आणि प्रमिला मयेकर यांनी संयोजन केलं. गाणी, फेर आणि फुगड्यांच्या माध्यमातून आजीबाईंना एकत्र येण्याची आणि मनसोक्त आनंद लुटण्याची संधी मिळाली. रोजच्या दिनक्रमापेक्षा वेगळा अनुभव देणाऱ्या या उपक्रमाने वृद्धाश्रमातील महिलांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद फुलवला. भोंडल्याच्या निमित्ताने जपली गेलेली ही परंपरा त्यांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहणाऱ्या आठवणी निर्माण करून गेली.