खाकीचा दरारा वापरून डॉक्टरांची वेळ मिळवण्याचा प्रयत्न; पुण्यात बनावट महिला पोलीस अधिकाऱ्याला अटक
डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याचे सोंग घेणाऱ्या एका 25 वर्षीय तरुणीला लष्कर पोलिसांनी अटक केली आहे.
Fake female police officer arrested : अंगावर पोलीस उपनिरीक्षकाची खाकी वर्दी, खांद्यावर स्टार आणि वागणुकीत पॉलिसी रुबाब, मात्र ही लेडी सिंघम प्रत्यक्षात पोलीस अधिकारी नव्हतीच. डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याचे सोंग घेणाऱ्या एका 25 वर्षीय तरुणीला लष्कर पोलिसांनी अटक केली आहे. समिना आसिफ इनामदार उर्फ समिना अयुब पठाण असे अटक करण्यात आलेल्या तरुणीचे नाव असून कॅम्प परिसरात ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीनाचे पोलीस अधिकरी बनण्याचे स्वप्न होते. मात्र काही कारणांमुळे ते पूर्ण होऊ शकले नाही. सध्या ती एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. दरम्यान, तिने पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा गणवेश परिधान करून स्वतःची ओळख पोलीस अधिकारी म्हणून निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला होता.
6 जून रोजी लष्कर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे कॅम्प परिसरात गस्तीवर होते. त्यावेळी एका खासगी क्लिनिकबाहेर पोलीस गणवेशातील महिला उभी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मात्र तिच्या हालचाली आणि वागणुकीवरून त्यांना संशय आला. त्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने तिची चौकशी करण्यात आली. कोणत्या पोलीस ठाण्यात कार्यरत आहात, ओळखपत्र आहे का, वरिष्ठ अधिकारी कोण आहेत, अशा पोलीस प्रश्नांची उत्तरे देताना संबंधित तरुणीची चांगलीच भंभेरी उडाली. समाधानकारक उत्तरे देता न आल्याने पोलिसांचा संशय आणखी बळावला.
राज्यात मान्सूनची धडक, 25 जिल्ह्यांवर यलो अलर्टचे सावट; हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा
अधिक चौकशी केल्यानंतर धक्कादायक वास्तव समोर आले. अंगावर पोलीस वर्दी असली तरी ती कोणत्याही पोलीस दलात कार्यरत नसल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्यानंतर या संपूर्ण प्रकाराचा उलगडा झाला. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, समिना हिला पुण्यातील एका नामांकित खासगी क्लिनिकमध्ये उपचारासाठी डॉक्टरांची वेळ हवी होती. मात्र वारंवार प्रयत्न करून देखील तिला अपॉइंटमेंट मिळत नव्हती. त्यामुळे तिने थेट पोलीस गणवेशाचा आधार घेतला. आपण पोलीस अधिकारी असल्याचा प्रभाव निर्माण करून क्लिनिकमधील रिसेप्शन कर्मचारी आणि इतरांवर दबाव टाकत लवकर अपॉइंटमेंट मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याआधीच पोलिसांच्या सतर्क नजरेत हा प्रकार आला आणि तिचा डाव फसला.
पोलीस गणवेशाचा गैरवापर करून सरकारी कर्मचाऱ्याचे खोटे सोंग घेणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. त्यामुळे पोलिसांनी संबंधित तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला असून तिच्याकडून यापूर्वी देखील अशाच प्रकारे पोलीस वर्दीचा वापर करण्यात आला होता का, याचा तपास सुरू आहे. एका अपॉईनमेंटसाठी पोलीस अधिकाऱ्याचा आव आणणाऱ्या या तोतया लेडी सिंघमची सध्या पुणे शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे.