पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित ‘फ्रेंडशिप करंडक’ 2025 क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा, 4 संघानी गाजवला उद्घाटनाचा दिवस

Friendship Trophy 2025 : पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या संघांचा समावेश असलेल्या चौथ्या ‘फ्रेंडशिप करंडक’ (Friendship Trophy 2025) क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत रंगारी रॉयल्स् (Rangari Royals) , तुळशीबाग टस्कर्स (Tulshibagh Tuskers), सुर्योदय रायझर्स (Suryodaya Risers) आणि रमणबाग फायटर्स (Ramanbagh Fighters) या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उद्घाटनाचा दिवस गाजवला.
सहकारनगर येथील ल.रा. शिंदे हायस्कूल येथील मैदानावर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन पुण्याचे पोलिस उपायुक्त (झोन 1 चे) संदीपसिंग गिल आणि पुनित बालन ग्रुपचे संचालक आणि ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे मुख्य आयोजक पुनित बालन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अखिल मंडई मंडळाचे अण्णा थोरात, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे संजीव जावळे, तुळशीबाग गणपती मंडळाचे नितीन पंडीत यांच्यासह पुण्यातील गणपती उत्सव मंडळ, नवरात्र उत्सव मंडळांचे अध्यक्ष, मंडळाचे सदस्य, कार्यकर्ते, ढोल-ताशा पथकातील सदस्य, मीडिया क्षेत्रातील मान्यवर सदस्य व सहभागी संघ आणि संघातील खेळाडू आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना करताना पुनित बालन ग्रुपचे संचालक पुनित बालन म्हणाले की, पुण्यातील गणेशोत्सवामध्ये किंवा नवरात्रोत्सवामध्ये मंडळामध्ये झोकून देऊन काम करणार्या अध्यक्ष, पदाधिकार्यांपासून कार्यकर्त्यांना एकमेकांशी निवांत बोलण्यासाठी दोन मिनिटेसुद्धा नसतात. त्यांच्या अथक परिश्रमातून पुण्यातील उत्सव निर्विघ्नपणे पार पडत असतात. अशा या माझ्या मित्रांसाठी या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेव्दारे या सर्व लोकांनी एकत्र येवून मैत्रीचे दोन क्षण अनुभवावे, हा आमचा मुख्य हेतू आहे. स्पर्धेत अधिक संघांना खेळण्याची संधी मिळावी, अशी मागणी गतवर्षी झाली होती. त्यामुळे स्पर्धेच्या चौथ्या वर्षी आम्ही 8 नवीन संघांना स्पर्धेत सहभागी केले आहे.
विविध मंडळे आणि ढोल-ताशा पथकांमध्ये महिला आणि मुलींचा सहभाग असतो. त्यामुळे पुढील वर्षी महिलांचीसुद्धा क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यास आम्हाला निश्चितच आनंद होईल, असे पुनित बालन यांनी स्पष्ट केले.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी संदीपसिंग गील म्हणाले की,पुनित बालन यांच्या तर्फे आयोजित ही ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट स्पर्धा ही केवळ स्पर्धा नसुन एक क्रिकेट महोत्सवच आहे. या महोत्सवामध्ये पुण्यातील विविध गणेश मंडळ, नवरात्र मंडळ तसेच ढोल-ताशा पथक अशा सर्वच क्षेत्रातील कार्यकर्ते व नागरिक एकत्र येत आहेत आणि मैत्रीचे नवे नाते निर्माण करत आहेत. या वेगवेगळ्या मंडळांच्या कार्यकर्ते आणि सभासदांच्यावतीने वर्षभर सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. अशाप्रकारे आपले सामाजिक कर्तव्य पार पाडून नागरिकांचे जीवन समृद्ध करत आहेत. त्यांच्या या कामगिरीसाठी मी मनापासून शुभेच्छा देतो.
अभिजीत वाडेकर यांनी केलेल्या फलंदाजीच्या जोरावर तुळशीबाग टस्कर्स संघाने कसबा सुपरकिंग्ज् संघाचा 7 गडी राखून पराभव करून विजयी सलामी दिली. विशाल मुधोळकर याने केलेल्या अष्टपैलु खेळीच्या जोरावर रंगारी रॉयल्स् संघाने एचएमटी टायगर्स संघाचा 48 धावांनी सहज पराभव केला. मयुर साखरे याने केलेल्या नाबाद पन्नास धावांच्या खेळीमुळे सुर्योदय रायझर्स संघाने गुरूजी तालिम टायटन्स् संघाचा 8 गडी राखून पराभव केला. सत्यजीत पाले याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर रमणबाग फायटर्स संघाने नुमवी स्टॅलियन्स् संघाचा 45 धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली.
स्पर्धेचा सविस्तर निकालः गटसाखळी फेरीः
कसबा सुपरकिंग्ज्ः 8 षटकात 2 गडी बाद 66 धावा (नचिकेत देशपांडे 51 (27, 6 चौकार, 2 षटकार), भुषण ढेरे 10, उमेश तांबडे 1-8) पराभूत वि. तुळशीबाग टस्कर्सः 5.2 षटकात 3 गडी बाद 67 धावा (अभिजीत वाडेकर 26, अमित सावळे नाबाद 16, नितीन पंडीत नाबाद 12, सचिन पै 1-7); सामनावीरः अभिजीत वाडेकर.
रंगारी रॉयल्स्ः 5 षटकात 6 गडी बाद 126 धावा (विशाल मुधोळकर 54 (15, 3 चौकार, 6 षटकार), निलेश एस. 31, समीर भट 20, अजिंक्य मारटकर 2-26) वि.वि. एचएमटी टायगर्सः 8 षटकात 9 गडी बाद 78 धावा (अर्थव ए. 34, रूग्वेद शिंदे 23, विशाल मुधोळकर 4-20, निलेश एस. 3-10); सामनावीरः विशाल मुधोळकर.
गुरूजी तालिम टायटन्स्ः 8 षटकात 4 गडी बाद 86 धावा (भावेश एस. 29, रोहन शेडगे 29, गंगाधर कांगणे 2-11) पराभूत वि. सुर्योदय रायझर्सः 5.2 षटकात 2 गडी बाद 87 धावा (मयुर साखरे नाबाद 50 (13, 1 चौकार, 7 षटकार), वैभव अव्हाळे नाबाद 25, सुशील फाले 1-28); सामनावीरः मयुर साखरे.
सोनम ए कपूर आणि आनंद एस अहूजा यांचा भाने ग्रुप भारतात घेऊन आला लक्झरी कार केअर ब्रँड टोपाझ डिटेलिंग
रमणबाग फायटर्सः 8 षटकात 6 गडी बाद 100 धावा (समीर पंचपोर 34, प्रज्योत शिरोडकर 17, सत्यजीत पाले 16, प्रणव लोखंडे 2-9) वि.वि. नुमवी स्टॅलियन्स्ः 5.4 षटकात 10 गडी बाद 55 धावा (सोमा खांडेकर 23, ओम भिसे 18, सत्यजीत पाले 5-17, प्रज्योत शिरोडकर 1-3); सामनावीरः सत्यजीत पाले.