शरद पवारांकडून नाना काटेंसह राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांना सूचना, म्हणाले…
पिंपरी : चिंचवड (Chinchwad)विधानसभेच्या पोटनिवडणुकीत (By Election)मतदारांनी आपल्याला चांगला कौल दिलाय. आपल्यासाठी संधी असतानाही त्याचं विजयात रुपांतर झालं नसलं तरी खचून न जाता या निवडणुकीपेक्षाही अधिक जोमानं पुढील निवडणुकीच्या तयारी लागा, अशा सूचना राष्ट्रवादीचे (NCP)सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)यांनी नाना काटे यांच्यासह पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad)शहरातील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना दिल्या आहेत.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्यासह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, राष्ट्रवादीचे प्रदेश समन्वयक सुहास उभे, राष्ट्रवादी विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, माजी नगरसेवक प्रभाकर वाघेरे, माजी आमदार उल्हास पवार यांनी शरद पवार यांची भेट घेऊन निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. यावेळी शरद पवार यांनी चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत प्रभागनिहाय माहिती घेतली.
हा तर ‘चुना लगाव आयोग’ आहे, उद्धव ठाकरेंचा घणाघात
कोणत्या प्रभागात किती मते पडली, कोणी-कोणी काम केलं, आपल्यासाठी परिस्थिती सकारात्मक असतानाही आपण कोठे कमी पडलो, यासह निवडणुकीतील प्रत्येक बारकाव्यांबाबत माहिती घेतली. यावेळी नाना काटे यांच्यासह उपस्थित प्रमुख मान्यवरांनी संपूर्ण माहिती दिली. भाजपच्या नेत्यांनी शेवटच्या टप्प्यात प्रशासकीय यंत्रणेचा केलेला गैरवापर, पैशांचा वापर, कार्यकर्त्यांना पोलिसांनी दिलेला त्रास यासह सर्व माहिती दिली.
सर्व बाबींची माहिती घेतल्यानंतर शरद पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. ते म्हणाले, महाविकास आघाडीसाठी सध्या अत्यंत सकारात्मक स्थिती आहे. येणार्या प्रत्येक निवडणुकीत आपण योग्य पद्धतीनं नियोजन करून काम केल्यास विजय आपलाच असणार आहे. लोकांनाही आता बदल हवा असल्यानं आपल्याला अत्यंत जबाबदारीनं काम करावं लागणार आहे.
चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये झालेल्या चुकांमध्ये दुरुस्ती करून अधिक जोमानं येणार्या महापालिका निवडणुकींच्या तयारीला आत्तापासून लागा. येत्या काही दिवसांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत एक आढावा बैठक घेऊयात, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.