पाषाण–बाणेर लिंक रोडवरील पासपोर्ट सेवा केंद्रासाठी वाहतूक व्यवस्थापनासाठी बुधवारी संयुक्त बैठक

Passport Seva Kendra -

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Sunny Nihaman

पुणे : पाषाण–बाणेर लिंक रोड येथे नुकत्याच सुरू झालेल्या पासपोर्ट सेवा केंद्राच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व परिसर व्यवस्थापनाबाबत संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही संयुक्त बैठक येत्या 8 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता औंध रोड क्षेत्रिय कार्यालयात होणार असल्याची माहिती नगरसेववक चंद्रशेखर उर्फ सनी निम्हण यांनी दिली.  

नगरसेवक सनी निम्हण यांनी संबंधित विभागांना पाठवलेल्या पत्रव्यवहार व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही बैठक आयोजित करण्यात आली असून, संभाव्य वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या, अतिक्रमण तसेच परिसर व्यवस्थापनाच्या अडचणी टाळण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा होणार आहे.

या बैठकीस महापालिका, वाहतूक पोलिस आणि सर्व संबंधित विभागांचे अधिकारी सहभागी होणार आहेत. या  परिसरातील नागरिकांनी या बैठकीस उपस्थित राहून सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन निम्हण यांनी केले आहे.

पासपोर्ट सेवा केंद्रामुळे परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा वाढणार असल्याने संभाव्य वाहतूक कोंडी व व्यवस्थापनाच्या समस्यांचा विचार करून स्थानिक नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी पुढाकार घेत संबंधित प्रशासनाला लेखी निवेदन दिले होते. या संदर्भात त्यांनी प्रभाग अधिकारी, पुणे महानगरपालिका तसेच वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर करून परिस्थितीचा सखोल आढावा घेत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

वाहतूक नियंत्रणासाठी पूर्वनियोजन करून प्रभावी अंमलबजावणी करणे, नो पार्किंग झोन व ड्रॉप-ऑफ पॉईंट निश्चित करणे, स्वतंत्र व सुयोग्य पार्किंग व्यवस्था उभारणे, अनधिकृत फेरीवाल्यांवर नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबवणे, वाहतूक पोलीस व स्वयंसेवकांची नियुक्ती करणे, महापालिका व वाहतूक विभागाची संयुक्त बैठक तातडीने आयोजित करण्याची मागणी निम्हण यांनी केली होती. त्यानुसार ही बैठक होत आहे.

follow us