Asim Sarode : ‘किरण रिजिजू हा माणूस मंत्री आहे, म्हणून काहीही बोललेले चालेल का?’
पुणे : काल एका कार्यक्रमात बोलतांना केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू (Union Law Minister Kiran Rijiju) यांनी मोठं वक्तव्य केलं. काही निवृत्त न्यायाधीश भारत विरोधी गॅंगचे भाग झाले आहेत आणि ते न्यायव्यवस्थेवर दबाब आणऊन न्यायालयांना विरोधी पक्षाची भूमिका करायला लावत आहे. त्याची त्यांनी किंमत मोजावी लागेल, असं वक्तव्य त्यांनी केलं. रिजिजू यांच्या वक्तव्यानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही रिजिजू यांच्यावर निशाणा साधला. राऊत यांनी न्यायव्यवस्था धोक्यात असल्याचं सांगत रिजिजू न्यायसंस्थेवर दबाव टाकून न्यायव्यस्थेला खिशात घालण्याचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान, आता सामाजिक कार्यकर्ते आणि वकील असीम सरोदे (Advocate Asim Sarode) यांनीही रिजिजू यांच्यावर हल्लाबोल केला.
सरोदे यांनी आपल्या फेसबुकवर व्यक्त होत रिजिजू यांच्या वक्तव्याचा चांगला समाचार घेतला. सरोदे यांनी आपल्या फेसबुकपोस्टवर लिहिलं की, किरण रिजिजू हा माणूस मंत्री आहे. म्हणून काहीही बोललेले चालेल का? हा माणूस देशाचा कायदा मंत्री आहे की, एका राजकीय पक्षाचा फायदा मंत्री आहे? असा थेट सवाल सरोदे यांनी केला.
त्यांनी पुढं लिहिलं की, काही निवृत्त न्यायाधीश भारत विरोधी गॅंगचे भाग झाले आहेत आणि ते न्यायव्यस्थेवर दबाव आणऊन न्यायालयांना विरोधी पक्षाची भूमिका करायला लावत आहेत, असं वक्तव्य किरण रिजिजू यांनी केलं. मग आता प्रश्न विचारला पाहिजे की, काही निवृत्त न्यायाधीश भाजप या पक्षात सहभागी झाले, कही निवृत्त न्यायाधीश राज्यसभा सदस्य, काही राज्यपाल झाले तर ते चालेल, पण काही न्यायाधीश निवृत्त झाल्यावरही कायदा, कायद्याच्या योग्य प्रक्रिय, लोकशाहीची परिस्थिती, न्यायाचा दर्जा, न्यायिकता याबद्दल बोलत असतील तर ते भारत विरोधी गॅंगचा भाग? वा!!, अशा थेट सवाल रिजिजू यांना केला.
दरम्यान, सरोदेंनी लिहिलं की, त्यांना जर हे भारत विरोधी गॅंगचे काही निवृत्त न्यायाधीश माहिती असतील तर त्यांनी थेट त्यांची नावे घ्यावीत. भारत विरोधी लोकांच्या बाबत लपवाछपवी व काहीही तमा बाळगण्याची गरज नाही, जर असे भारत विरोधी गॅंगेच काही निवृत्त न्यायाधीश न्यायालयांवर दबाव आणत असतील व किरण रिजिजू यांनी ते माहिती आहेच तर त्यांनी त्याबाबत न्यायालयात थेट तक्रार करावी, असं सांगत ट्रोल आर्मी प्रमाणे अनेक उच्च व सर्वोच्च न्यायालयात भाजपची याचिका आर्मी सुध्दा आहेच, असा खोचक टोलाही लगावला.
Dilip Walse Patil : आमदारांच्या हालचाली जाणवतात… लवकरच सरकार कोसळणार ?
बरं न्यायालयांवर काही निवृत्त न्यायाधीश दबाव आणत असतील तर त्याबाबत तेथे कार्यरत अनेक नि:पक्षपाती न्यायाधीश दखल घेऊन कारवाई करू शकतात. नाहीतर भाजप प्रेरित काही न्यायाधिशांचे जाळए अनेक उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयात आहेच ना ते वापरावे. भारताच्या न्यायालयांची सरसकट बदनामी का करता? येथील न्यायालय, तपास यंत्रणा, निवडणूक आयोग हे सगळे तुमच्यासाठी ‘भारत’ नाही व केवळ मोदी, भाजप म्हणजे देश आहे का? असा सवाल केला.
दरम्यान रिजिजू आणि त्यांच्या सारख्या प्रवृत्ती एक अत्यंत धोकादायक दृष्टीकोण प्रस्थापित करीत आहेत, जो लोकशाही संकल्पनेला घातक आहे. त्यांची ही वक्तव्ये जगभर प्रसारित होत आहेत व त्यातून भारताची बदनामी होते, असं सरोदे यांनी सांगितलं.