पुणे शहरात जुन्या गाड्यांवर बंदी येणार ? मुख्य भागात लो एमिशन झोन लागू करण्याच्या हालचाली
Low Emission Zone in Pune-शनिवार पेठ, सदाशिव पेठ, रविवार पेठ, कसबा पेठ अशा भागात ‘लो एमिशन झोन’ (LEZ) लागू करण्याबाबत प्रशासन विचार करत आहे.
Low Emission Zone in Pune : पुण्यातील वाढते वायू प्रदूषण कमी करण्यासाठी 2026 पर्यंत शहरातील काही भागात ‘लो एमिशन झोन’ (Low Emission Zone) लागू करण्याची योजना प्रशासन आखात आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडलीय. वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरातील शिवाजीनगरसह शनिवार पेठ, सदाशिव पेठ, रविवार पेठ, कसबा पेठ अशा भागात ‘लो एमिशन झोन’ (LEZ) लागू करण्याबाबत प्रशासन विचार करत आहे. याचा थेट अर्थ असा की आता जुन्या आणि जास्त प्रदूषण करणाऱ्या गाड्यांना या वर्दळीच्या भागात प्रवेश बंदी केली जाऊ शकते किंवा दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते.
लो एमिशन झोन म्हणजे काय ?
लो एमिशन झोन म्हणजे शहराचा असा एक भौगोलिक भाग, जिथे प्रदूषणाची पातळी कमी राखण्यासाठी प्रशासनाने कडक नियम लावले आहेत. प्रशासनाचा प्रस्ताव असा आहे की भारत स्टेज-३ (BS-III) किंवा त्यापेक्षा जुन्या इंजिन तंत्रज्ञानाच्या गाड्यांनी शिवाजीनगर आणि पेठांच्या भागात प्रवेश केल्यास त्यांना दररोज ‘प्रदूषण शुल्क’ (Entry Fee) भरावे लागेल. जर हे शुल्क आगाऊ भरलं नाही, तर या भागात बसवलेल्या हाय-टेक कॅमेऱ्यांच्या मदतीने तुमच्या गाडीचा नंबर स्कॅन केला जाईल आणि थेट दंडात्मक कारवाई केली जाईल. थोडक्यात सांगायचं तर, जुन्या गाड्यांना मध्यवर्ती भागात येण्यापासून रोखणं किंवा त्यांच्या वापरावर मर्यादा आणणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
तुमची गाडी कोणत्या BS मानकात आहे हे कसं ओळखायचं?
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, तुमची गाडी नक्की कोणत्या कॅटेगरीत येते? हे ओळखण्याचे तीन सोपे मार्ग आहेत:
1) गाडीचे आरसी बुक
तुमच्या गाडीच्या आरसी स्मार्ट कार्डवर ‘Fuel Norms’ किंवा ‘Class’ च्या रकान्यात BS-III, BS-IV किंवा BS-VI असं स्पष्ट लिहिलेलं असतं.
2) नोंदणी वर्ष: साधारणपणे एप्रिल २०१० पूर्वीच्या गाड्या या BS-II किंवा BS-III मानकातील असू शकतात. एप्रिल 2010 ते मार्च 2017 दरम्यानच्या गाड्या बहुधा BS-IV आहेत, तर एप्रिल 2020 नंतरच्या सर्व गाड्या या BS-VI मानकातील आहेत.
3) परिवहन ॲप: तुम्ही ‘Parivahan’ ॲपवर गाडीचा नंबर टाकूनही तुमची गाडी कोणत्या उत्सर्जनाचे नियम पाळते, हे घरबसल्या तपासू शकता.
जगातील आणि भारतातील इतर शहरांमध्ये बंधणे लागू ?
अशी योजना राबवणारे पुणे हे पहिलेच शहर नाही. लंडनमध्ये ‘Ultra Low Emission Zone’ यशस्वी ठरला आहे, ज्यामुळे तिथलं प्रदूषण ३० टक्क्यांनी कमी झालं. पॅरिस आणि बर्लिनसारख्या युरोपातील अनेक शहरांमध्ये जुन्या डिझेल गाड्यांना शहरात येण्यास पूर्णपणे मज्जाव आहे. भारतातही दिल्लीमध्ये आधीच 10 वर्षांवरील डिझेल आणि 15 वर्षांवरील पेट्रोल गाड्यांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. आता पुणे देखील त्याच दिशेने पाऊल टाकत आहे.
वाहन चालकांवर होणारा परिणाम
2020 च्या अभ्यासानुसार, पुण्यातील प्रदूषणापैकी 46 टक्के प्रदूषण हे केवळ वाहनांमुळे होतंय. 2000 पूर्वीची एक जुनी कार ही आजच्या 11 आधुनिक BS-VI गाड्यांइतका धूर सोडते. म्हणूनच जर तुमची गाडी जुनी असेल आणि तुम्ही पेठ भागात राहत असाल किंवा तिथे कामानिमित्त जात असाल, तर तुम्हाला भविष्यात तुमची गाडी अपग्रेड करावी लागेल किंवा प्रशासनाने सूचवल्याप्रमाणे सार्वजनिक वाहतूक, मेट्रो किंवा सायकलचा वापर करावा लागेल. प्रशासनाचा भर केवळ दंडावर नाही, तर शिवाजीनगर आणि पेठ भागातील पदपथ अधिक चालण्यायोग्य करणे आणि बससेवा अधिक सक्षम करण्यावरही आहे.शहराच्या आरोग्यासाठी हा निर्णय कडू असला तरी तो काळाची गरज आहे का? की यामुळे सर्वसामान्यांची अडवणूक होणार हे नक्की.
