Mahadev Jankar : भाजपकडे मंत्रिपद मागणार नाही… त्यांना वाटलं तर देतील किंवा नाही देणार!
पुणे : मी भाजपकडे (BJP) मंत्रीपद मागणार नाही, मी मागणारा नाही. त्यांना वाटलं तर देतील. नाही वाटलं देणार नाही. आमचा मार्ग ठरलेला आहे. त्या मार्गांवरून आमचा प्रवास सुरु आहे. भाजपला गरज वाटली तर मला मंत्री करतील. परंतु, मी मात्र युतीचा धर्म पाळणार आहे, अशी भावना राष्ट्रीय समाज पक्षाचे (RSP) अध्यक्ष (President) महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी व्यक्त केली. तसेच गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हा कार्यकर्ता आहे आणि मी नेता आहे. त्यामुळे तुम्ही आधी नेता आणि कार्यकर्त्यामधील फरक ओळखा, असे देखील जानकर यावेळी म्हणाले.
कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे बोलत होते. यावेळी भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर उपस्थित होते.
‘आपल्या चौकात आपली औकात’ या न्यायाने राष्ट्रीय समाज पक्ष काम करत आहे. आमच्या पक्षाची भाजपसोबत महाराष्ट्रात युती आहे. आमचे चारच आमदार आहेत. भाजपची ताकद मोठी आहे. महादेव जानकर तुझे आमदार जास्त वाढव. एकनाथ शिंदे यांचे ४० आमदार आहेत म्हणून शिंदे आज भाजप सोबत आहेत. म्हणून आम्ही आधी आमचा पक्ष वाढवत आहे. एक लक्षात ठेवा गोपीचंद पडळकर हा भाजपचा कार्यकर्ता आहे. मी राष्ट्रीय समाज पक्षाचा राष्ट्रीय नेता आहे. युतीचा धर्म पाळण्यासाठी म्हणूनच मी हेमंत रासने यांच्या प्रचार सभेसाठी आलो आहे, असे महादेव जानकर यावेळी म्हणाले.