‘तू माझ्या मैत्रिणीसोबत का बोलतोस?’ कारमध्ये कोंबून पुण्यात MPSC विद्यार्थ्याचं अपहरण
MPSC Student Kidnap In Pune मैत्रिणीशी फोनवर बोलत असल्याच्या कारणावरून तिच्या बॉयफ्रेंडने तरुणाचं अपहरण केलं.
MPSC Student Kidnap In Pune : पुण्यात MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचं मध्यरात्री अपहरण झाल्याने खळबळ उडाली. मैत्रिणीशी फोनवर बोलत असल्याच्या कारणावरून तिच्या बॉयफ्रेंडने आपल्या साथीदारांच्या मदतीने तरुणाचं अपहरण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चिमण्या मारुती चौकातून तरुणाला जबरदस्तीने चारचाकीमध्ये बसवून नेण्यात आलं. मात्र, विश्रामबाग पोलिसांनी अवघ्या काही तासांत तपासाची चक्रं फिरवत तरुणाची सुखरूप सुटका केली. सुटका करण्यात आलेल्या तरुणाचं नाव प्रसाद सूर्यवंशी असून तो पुण्यात राहून MPSC परीक्षेची तयारी करत आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास तो चिमण्या मारुती चौक परिसरात उभा होता. त्याचवेळी चारचाकीतून आलेल्या आरोपींनी त्याला गाठलं.
माझ्या मैत्रिणीसोबत का बोलतोस? म्हणत मारहाण
आरोपींनी प्रसादला अडवत “तू माझ्या मैत्रिणीसोबत का बोलतोस?” असा जाब विचारला. त्यानंतर त्याच्यासोबत वाद घालत मारहाण करण्यास सुरुवात केली. प्रसादला काही समजण्याच्या आतच आरोपींनी त्याला जबरदस्तीने चारचाकीत बसवलं आणि तेथून पसार झाले. प्रसाद एका तरुणीच्या संपर्कात होता. विशेष म्हणजे ही तरुणी MPSC परीक्षेची तयारी करत असून तिचा मुख्य आरोपीसोबतही फोनवरून संपर्क होता. प्रसाद आणि तरुणी यांच्यातील फोनवरील संवादाची माहिती आरोपीला मिळाल्यानंतर त्याचा संशय आणि राग वाढला. त्यातूनच त्याने साथीदारांच्या मदतीने प्रसादच्या अपहरणाचा कट रचल्याची माहिती तपासात समोर आली.
पोलिसांनी CCTV आणि तांत्रिक तपासाने माग काढला
तरुणाचं अपहरण झाल्याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज तपासण्यास सुरुवात केली. त्यासोबतच तांत्रिक तपासाच्या माध्यमातून आरोपींच्या वाहनाचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान आरोपींची गाडी सिंहगड रोडच्या दिशेने गेल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर पोलिसांनी सिंहगड रोड परिसरात सापळा रचला.
काही तासांतच तरुणाची सुखरूप सुटका
पोलिसांनी संशयित चारचाकी अडवून त्यातील आरोपींना ताब्यात घेतलं. यावेळी अपहरण करण्यात आलेला प्रसाद सूर्यवंशीही पोलिसांना सुखरूप मिळून आला. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, या प्रकरणातील आणखी दोन साथीदारांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे पुण्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र, अपहरणाची माहिती मिळताच CCTV आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने काही तासांतच विद्यार्थ्याची सुटका करण्यात विश्रामबाग पोलिसांना यश आलं आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांचं अपहरण अन् मारहाणीचा व्हिडीओ व्यायरल… #Pune #punenews #MPSC #Student #PunePolice pic.twitter.com/ltvKsSZ5It
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) September 10, 2026