मुलगा गेलाय म्हणत डीजे लावण्यास रोखलं; टोळक्याची कुटुंबाला बेदम मारहाण

मुलगा गेलाय म्हणत डीजे लावण्यास रोखलं; टोळक्याची कुटुंबाला बेदम मारहाण

Pune News : राज्यात काल अगदी उत्साहात ढोल ताशाच्या गजरात अन् गुलालाची मुक्त उधळण करत गणरायाला निरोप (Ganpati Visarjan 2023) देण्यात आला. मात्र, या उत्सवाला गालबोट लागेल अशी घटना मावळ तालुक्यातीस सोमाटणे फाटा परिसरात घडली. मुलाचे निधन झाल्याने घरासमोर डीजे लावू नका असे म्हणणाऱ्या शोकाकुल कुटुंबाला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी 21 जणांना अटक केली आहे. ही घटना सोमवारी (25 सप्टेंबर) मावळ तालुक्यातीस सोमाटणे फाटा परिसरात घडली.

मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव सुनील शिंदे आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलाचे निधन झाले आहे. अशा वेळी घरासमोरून मिरवणूक नेत असताना तुम्ही डीजे लावू नका असे सुनील शिंदे यांनी सांगितले. मात्र, त्यांच्या बोलण्याचा मिरवणुकीतील काही जणांना राग आला. त्यानंतर तब्बल 21 जणांनी सुनील शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केली. काठ्या, कोयता, लोखंडी सळईने बेदम मारहाण केली.  या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. या मारहाण करणाऱ्या लोकांविरुद्ध सुनील प्रभाकर शिंदे यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांत फिर्याद दाखल केली.

धक्कादायक! सांस्कृतिक पुण्यात सर्रासपणे बेकायदेशीर विदेशी तरूणींच्या ‘अरेबियन नाईट्स’ चं आयोजन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 सप्टेंबर रोजी ही घटना घडली. मिरवणुकीत डीजे लावला जात असल्याचे पाहून आम्ही दुःखात आहोत इथे डीजे लावू नका अशी विनंती त्यांना केली. आरोपींनी त्यांचे म्हणणे ऐकले डीजे लावला नाही मात्र, विसर्जन झाल्यानंतर 21 जणांनी शिंदे कुटुंबाला मारहाण केली.  आई, वडील, भाऊ आणि मध्यस्थी करणाऱ्या मित्रावरही आरोपींनी लाकडी दांडके, चाकू आणि इतर हत्यारांचा वापर करत मारहाण केली. या मारहाणीत ते सर्वजण जखमी झाले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी 21 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, अटक केलेल्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube