पुण्यातल्या भाऊंची कुंडली आता एका क्लिकवर; दादा-भाऊ सगळ्यांचा हिशेब होणार

PMC On Illegal Flex दादा, भाऊ, मामा... आता सगळ्यांचा हिशेब होणार! पुण्यातल्या भाऊंची कुंडली आता एका क्लिकवर...

  • Ninad K
  • Written By: Published:
PMC Run Campaign For Illegal Flex

PMC Run Campaign For Illegal Flex : पुण्यातल्या भाऊंनो… तुम्ही पण, कुणाचा वाढदिवस, कुणाचा पदभार, कुणाचं स्वागत…तर कुणाच्या शुभेच्छांसाठी संपूर्ण शहर फ्लेक्सने भरून टाकत चौकाचौकात तुमचे फोटो लावून घेतं असाल तर, जरा सांभाळून कारण, तुमची हीच चमकोगिरी आता तुम्हालाच महागात पडू शकते… तुम्ही शहरात किती अनधिकृत फ्लेक्स लावलेत, कुठे लावलेत आणि कोणाच्या नावाने लावलेत… याचा सगळा हिशेब आता पुणे महापालिका ठेवणार आहे आणि विशेष म्हणजे, तुमची ही कुंडली दुसरं तिसरं कुणी नाही, तर संपूर्ण पुणेकरच उघड करू शकणार आहेत…नेमका दादा, भाऊ, मामा… आता सगळ्यांचा हिशेब करणारी पालिकेची ‘भाऊ फ्लेक्स काढा’ योजना काय आहे नेमकं यात काय होणार त्याबद्दल जाणून घेऊया…

पुणे महापालिकेने अनधिकृत फ्लेक्सविरोधात थेट डिजिटल मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी महापालिकेने खास ‘भाऊ फ्लेक्स काढा’ bhauflexkadha.pmc.gov.in नावाचं संकेतस्थळ तयार केलं आहे.  या वेबसाईटवर जाऊन नागरिकांना शहरातील अनधिकृत फ्लेक्सचे फोटो अपलोड करता येणार आहेत. त्यानंतर संबंधित फ्लेक्सची माहिती महापालिकेच्या विभागाला आणि क्षेत्रीय कार्यालयाला दिली जाणार आहे. त्यानुसार संबंधित फ्लेक्सवर कारवाई केली जाणार आहे.

पण या मोहिमेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे…आता केवळ अनधिकृत फ्लेक्सच हटवले जाणार नाहीत, तर ते फ्लेक्स नेमके कोणी लावले, कोणाच्या नावाने लावले आणि एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती फ्लेक्स आहेत, याची माहितीही संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. म्हणजेच शहरात सर्वाधिक फ्लेक्स लावून स्वतःची जाहिरात करणारा नेता किंवा कार्यकर्ता कोण, हेही समोर येऊ शकणार आहे.

आतापर्यंत पुण्याच्या चौकाचौकात दादा, भाऊ, मामा, अण्णा आणि साहेबांचे फोटो झळकत होते. आता मात्र या भाऊंच्या नावावर किती अनधिकृत फ्लेक्स आहेत, याची आकडेवारीही झळकणार आहे… वाढदिवसाच्या शुभेच्छा असोत किंवा नेत्यांचं स्वागत…
पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम असो किंवा सण-उत्सव… प्रत्येक निमित्ताला फ्लेक्स लावून स्वतःची प्रसिद्धी करणाऱ्यांना आता पुणेकरच आरसा दाखवणार आहेत.

शहरातील अनधिकृत फ्लेक्सची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचावी आणि त्यावर तातडीने कारवाई करता यावी, यासाठी ही व्यवस्था तयार करण्यात आली आहे. नागरिकांच्या सहभागातून अनधिकृत फ्लेक्सवर नियंत्रण मिळवण्याचा महापालिकेचा प्रयत्न असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी सांगितलं आहे.

पण आता खरा प्रश्न हा आहे… पुण्यात फ्लेक्स लावून स्वतःला मोठं समजणारे भाऊ, महापालिकेच्या या डिजिटल कारवाईनंतर खरंच सुधारणार का? की पुन्हा दुसऱ्याच दिवशी त्याच चौकात नव्या फ्लेक्ससह दर्शन देणार? कारण आता पुण्यात तुमचा फ्लेक्स किती मोठा आहे, यापेक्षा तुमच्या नावावर किती अनधिकृत फ्लेक्स आहेत, हे महत्त्वाचं ठरणार आहे.

तर पुणेकरांनो, तुमच्या परिसरात कुठे अनधिकृत फ्लेक्स दिसला, तर त्याचा फोटो अपलोड करा… वेबसाईट आहे… bhauflexkadha.pmc.gov.in आता सांगा… पुण्यातला सर्वात मोठा फ्लेक्सबाज भाऊ कोण?….

follow us