Pune News : शाळेची घंटा वाजवली अन् वर्ग भरले आजोबांचे

  • Written By: Published:
Pune News : शाळेची घंटा वाजवली अन् वर्ग भरले आजोबांचे

पुणे : नेहमीच्या वेळी शाळेची घंटा वाजली… प्रशस्त गेटमधून मुलांचे लोंढे आत आले आणि वेगवेगळ्या क्षेत्रात स्थिरावलेल्या माजी विद्यार्थ्यांना पाहून नूमवि शाळेच्या दगडी भिंती अक्षरशः गहिवरून गेल्या. राष्ट्रगीताच्या सूरांबरोबर माजी विद्यार्थ्यांसह शाळेचा संपूर्ण परिसर गतकाळातील आठवणींच्या बरसातीत रोमांचित झाला.  निमित्त होते  “आम्ही नूमवीय”  आणि नूमवि शाळेच्या १९९७ च्या रौप्य महोत्सवी बॅचतर्फे आज आयोजित माजी विद्यार्थ्यांची “एक दिवसाची शाळा” या अभिनव कार्यक्रमाचे. आम्ही नूमवीय समितीचे अध्यक्ष अजय रावेतकर, सचिव मिलिंद शालगर आणि सदस्य अभिषेक पापळ यांच्यासह नूमवि शाळेच्या १९९७ च्या रौप्य महोत्सवी बॅचमधील माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला.
दुपारी  १२ ते ३ या वेळेत भरलेल्या या शाळेत  नूमविच्या १९५० ते २०१३ पर्यंतच्या बॅचचे सुमारे ८५० ते ९०० माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देखील देण्यात आले. शाळेच्या माजी आणि आजी शिक्षकांनी  या विद्यार्थ्यांचे  तास घेतले. राष्ट्रगीत, प्रार्थना, मधली सुट्टी आणि अभ्यासाच्या दोन तासांसह ही एक दिवसाची शाळा माजी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा त्यांच्या बालपणीच्या विश्वात घेऊन गेली.

गोष्टी सांगणारे शिक्षक अशी ओळख असलेले ज्येष्ठ बालसाहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. न.म जोशी यांनी आज माजी विद्यार्थ्यांना गोष्ट सांगितली. तर माजी शिक्षक असलेले पं.वसंतराव गाडगीळ यांनी शिक्षक म्हणून काम करतानाच्या त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

या आठवणी अधिक संस्मरणीय करण्यासाठी मधल्या सुट्टीत वडापाव, चन्यामन्या,  बोरं, गोळ्या, चिक्या, चहा, यांचा आस्वाद देखील सगळ्या विद्यार्थ्यांनी घेतला. सेल्फी पॉईंट बरोबरच शाळेतल्या आपल्या आवडत्या जागांवर मित्रांसोबत सेल्फी घेतांना सगळ्यांच्याच अंगावर शहारे उमटत होते. जुन्या आठवणींच्या प्रदर्शनाने सगळ्यांचेच डोळे पाणावत होते.

नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील कलावंत, शिक्षण क्षेत्रातील गुरूतुल्य व्यक्तीमत्व, प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, वकील, बांधकाम व्यावसायिक, व्यापारी असे विविध क्षेत्रातील दिग्गज माजी विद्यार्थी या कार्यक्रमात ‘केवळ विद्यार्थी’ म्हणूनच सहभागी झाल्याने प्रत्येकाच्या मनात जुन्या मैत्रीच्या आठवणींना पाझर फुटत होता. शाळा सुटल्याची घंटा वाजल्यावर पुन्हा पुन्हा असेच भेटायचे असे ठरवून माजी विद्यार्थ्यांनी ”शाळा सुटली, पाटी फुटली” असं म्हणत एकमेकांना निरोप दिला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube