पुण्यात राष्ट्रवादीचे दोन शहराध्यक्ष ! पूर्वला सुनील टिंगरे तर पश्चिमला सुभाष जगताप यांची नियुक्ती

  • Written By: Published:
पुण्यात राष्ट्रवादीचे दोन शहराध्यक्ष ! पूर्वला सुनील टिंगरे तर पश्चिमला सुभाष जगताप यांची नियुक्ती

Two NCP city presidents appointed in Pune city : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर (Deepak Mankar) यांच्यावर काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. यानंतर त्यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. या नंतर अजितदादा (Ajit Pawar) शहराध्यक्षपदी कुणाला संधी देणार याची उत्सुकता होती. या पदासाठी काही जणांची नावे चर्चेत होती. अखेर या नावातील सस्पेन्स आज संपुष्टात आला. राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) पक्षाने पुणे शहराध्यक्ष (Pune) पदासाठी नावांची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे पुण्यासाठी दोन शहराध्यक्ष दिले आहे. पुणे शहर पूर्वासाठी सुनील टिंगरे (Sunil Tingre) आणि पुणे पश्चिम शहराध्यक्ष म्हणून सुभाष जगताप (Subhash Jagtap) यांना संधी देण्यात आली आहे.

दीपक मानकर यांनी एका प्रकरणात नुकताच राजीनामा दिला होता. पोलिसात बनावट कागदपत्र सादर केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला होता. या नंतर त्यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाचाही राजीनामा दिला होता. या घडामोडी घडल्यानंतर पक्षाला ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहराध्यक्ष शोधण्याची वेळ आली होती. या संदर्भात मागील पंधरवड्यात मुंबईत एक बैठक झाली होती. या बैठकीला हडपसर मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे, माजी आमदार सुनील टिंगरे उपस्थित होते. या बैठकीत काही नावांवर चर्चा झाली होती.

पुणे महापालिका निवडणुकीत नगरसेवक निवडून आणण्याचे आव्हान राष्ट्रवादीसमोर आहे. त्यामुळे दांडगा जनसंपर्क आणि संघटन कौशल्य असणारा नेताच शहराध्यक्ष पदी असावा असा नेते मंडळींचा सूर होता. त्यामुळे या पदासाठी आमदार चेतन तुपे, माजी आमदार सुनील टिंगरे, माजी महापौर दत्ता धनकवडे, माजी सभागृह नेते सुभाष जगताप, प्रदीप देशमुख यांची नावे आघाडीवर होती. या नावातूनच दोघा जणांची निवड करण्यात आली.

माजी आमदार सुनील टिंगरे यांना पूर्व तर सुभाष जगताप यांना पश्चिम शहराची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यंदा दोन शहराध्यक्ष देण्यात आले आहेत. राजकीय दृष्ट्या पुणे शहराची पूर्व आणि पश्चिम अशी विभागणी करण्यात आली आहे. यामागे वरिष्ठ नेते मंडळींचा नेमका काय विचार आहे याचा खुलासा अद्याप झालेला नाही. मात्र या निमित्ताने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुण्यात आता एक नाही तर दोन शहराध्यक्ष मिळाले आहेत.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दोघांनाही नियुक्ती पत्रे दिली आहेत. सुनील टिंगरे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की आपली महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर (कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट, हडपसर आणि वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ) जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात येत आहे असे या नियुक्तीपत्रात म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube