विनायकी’ विनायक निम्हण शिष्यवृत्ती म्हणजे समाज घडवणारी योजना : पद्मविभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार
Vinayaki Vinayak Nimhan Scholarship ‘विनायकी’ विनायक निम्हण शिष्यवृत्ती ही केवळ आर्थिक मदत नसून समाज घडवणारी योजना आहे.
पुणे : शिक्षणामुळे केवळ एका विद्यार्थ्याचा नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाचा आणि पर्यायाने समाजाचा विकास होतो. आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणारी ‘विनायकी’ विनायक निम्हण शिष्यवृत्ती ही केवळ आर्थिक मदत नसून समाज घडवणारी योजना आहे, असे प्रतिपादन सिम्बॉयसिस विद्यापीठाचे कुलगुरू पद्मविभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी केले. स्वर्गीय आमदार विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त सोमेश्वर फाउंडेशनतर्फे आयोजित ‘विनायकी’ विनायक निम्हण शिष्यवृत्ती प्रदान सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रमुख डॉ. विद्याधर अनासकर, महापालिकेचे विरोधी पक्षनेते निलेश निकम, माजी मंत्री प्रा. सुरेश नवले, नगरसेविका सपना छाजेड,नगरसेविका अंजली ओरसे, नगरसेविका पूजा जागडे, नगरसेविका निशा मानवतकर, नगरसेवक अमित गावडे, नगरसेवक अपूर्व खाडे,नगरसेवक रविंद्र साळेगांवकर,जिल्हा परिषद सदस्य मिलिंद वाळंज, सोमेश्वर फाउंडेशनच्या माजी नरसेविका स्वातीताई निम्हण,माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, माजी नगरसेवक आदित्य माळवे आणि कार्यक्रमाचे आयोजक नगरसेवक सनी विनायक निम्हण आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सोमेश्वर फाउंडेशन तर्फे 647 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
डॉ. मुजुमदार म्हणाले, शिक्षणावर जीडीपीच्या किमान सहा टक्के खर्च करणारे देश विकसित होतात. भारतातही शिक्षणावर अधिक गुंतवणूक होण्याची गरज असून, सनी निम्हण हे आपल्या वडिलांचा सामाजिक वारसा समर्थपणे पुढे नेत विद्यार्थ्यांबरोबरच सक्षम समाज घडविण्याचे कार्य करत आहेत. डॉ. विद्याधर आनासकर म्हणाले, ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांवरील विश्वासाचे प्रतीक आहे. या मदतीच्या बळावर यश मिळवून विद्यार्थ्यांनी समाजाचे ऋण फेडण्याची भावना जपली पाहिजे. मंजुषा नागपुरे यांनी सनी निम्हण यांच्या शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक करत ही समाजाला दिशा देणारी कृती असल्याचे सांगितले.
सनी निम्हण म्हणाले, तरुणांनी मोबाईलच्या आहारी न जाता संस्कृती जपावी. शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रातील स्वर्गीय विनायक निम्हण यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ही शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली असून, येत्या काळात सोमेश्वर फाउंडेशनतर्फे शिक्षण व आरोग्य क्षेत्रात आणखी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
परशुराम वाडेकर यांनी विनायक निम्हण यांच्या विकासदृष्टीचा उल्लेख करत सनी निम्हण यांचे कार्य विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी मोलाचे असल्याचे सांगितले. निलेश निकम यांनी ही शिष्यवृत्ती इतरांसाठी आदर्श ठरेल, असे मत व्यक्त केले. प्रा. सुरेश नवले यांनी शिक्षण व आरोग्य सुविधा सर्वांसाठी मोफत झाल्यास देशात मोठी सामाजिक क्रांती घडेल, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले, तर प्रास्ताविक सनी निम्हण यांनी केले. शिष्यवृत्ती वितरणापूर्वी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे दत्ता श्रीखंडे, रुरल रिलेशन्सचे प्रदीप लोखंडे आणि जीएस ग्लोबल अकॅडमीच्या सुयोगा जोशी यांनी विद्यार्थ्यांना करिअरविषयक मार्गदर्शन केले.उमेश वाघ यांनी आभार व्यक्त केले.