FIFA World Cup Final : इतिहासात पहिल्यांदाच फिफा देणार खेळाडूंना ‘चॅम्पियनशिप रिंग्ज’
FIFA World Cup 2026 Championship Rings : न्यूयॉर्क-न्यू जर्सी स्टेडियमवर फिफा विश्वचषक 2026 चा अंतिम सामना होणार आहे.
FIFA World Cup 2026 Championship Rings : न्यूयॉर्क-न्यू जर्सी स्टेडियमवर फिफा विश्वचषक 2026 चा अंतिम सामना होणार आहे. या सामन्यात स्पेन आणि अर्जेंटिना भिडणार असल्याने कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे फिफाने देखील या सामन्यासाठी विशेष तयारी केली आहे. फिफाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, फिफा विश्वचषक 2026 मधील विजेत्या खेळाडूंना ट्रॉफी आणि सुवर्णपदकांव्यतिरिक्त एक विशेष सन्मान मिळणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच फिफा चॅम्पियनशिप रिंग्ज’ खेळाडूंना देणार आहे.
19 जुलै रोजी न्यूयॉर्क-न्यू जर्सी स्टेडियमवर होणाऱ्या स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यातील अंतिम सामन्यानंतर विजेत्या संघाला या विशेष चॅम्पियनशिप रिंग्ज (FIFA World Cup 2026 Championship Rings) प्रदान केल्या जातील. फिफा एकूण 2,026 चॅम्पियनशिप रिंग्ज तयार करणार आहे. यापैकी 30 रिंग्ज विजेत्या संघातील खेळाडू आणि कर्मचाऱ्यांसाठी असतील, तर उर्वरित 1,996 रिंग्ज अधिकृत परवानाकृत उत्पादने म्हणून जगभरातील चाहत्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जातील.
प्रत्येक रिंग्जच्या एका बाजूला फिफा विश्वचषक ट्रॉफीचे चित्र असेल, तर दुसऱ्या बाजूला विजेत्या संघाची ओळख दर्शवणारी एक डिझाइन असेल. प्रत्येक रिंग्जला स्वतंत्र क्रमांक असेल, ती खेळाडूंच्या बोटांच्या मापाप्रमाणे खास तयार केली जाईल आणि त्यासोबत सर्टिफिकेट ऑफ ऑथेंटिसिटी दिले जाईल.
रिंग्ज कधी आणि कुठे दिल्या जातील?
अंतिम सामन्यानंतर लगेचच, विजेत्या संघाचा कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक यांना एक प्रतिकात्मक, तात्पुरती रिंग दिली जाईल. त्यानंतर, खेळाडूंच्या बोटांच्या मापाप्रमाणे तयार केलेल्या रिंग्ज बनवल्या जातील आणि एका अधिकृत समारंभात त्या सुपूर्द केल्या जातील.
BCCI अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न पण प्रतिसाद नाही; रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त?
दोन्ही संघांची आतापर्यंतची कामगिरी
गतविजेता अर्जेंटिना संघ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्पेनचा सामना करेल. उपांत्य फेरीत इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून अर्जेंटिनाने अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. दुसरीकडे, स्पेनने फ्रान्सचा 2-0 असा पराभव करून 2010 नंतर पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.