सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियावर थरारक विजय
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्याचा थरार रंगला. अखेर सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा चार धावांनी पराभव करत विजय मिळविला. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाने 1-1 ने बरोबरी साधलीय.
सुपर ओव्हरमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करत भारताने 20 धावा केल्या. 21 धावांचा पाठलाग करत असलेल्या ऑस्ट्रेलिया संघ 16 धावा काढू शकला. त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 188 धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु भारतीय संघ पाच फलंदाजाच्या बदल्यात 187 धावा करू शकल्याने सामना बरोबरीत संपला. भारताकडून स्मृती मानधनाने 49 चेंडूत सर्वाधिक 89 धावाची खेळी केली. तर शेफाली वर्माने 34 आणि रिचा घोषने 26 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. शेवटच्या षटकात भारतीय संघाला 14 धावांची गरज होती. रिचा घोष आणि देविका वैद्यने 13 धावा काढल्याने सामना बरोबरीत सुटला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने 1 विकेटच्या बदल्यात 187 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून बेथ मुनीने 54 चेंडूत 82 आणि ताहिला मेग्राथने 51 चेंडूत 70 धावा केल्या.
अशी झाली सुपर ओव्हर : सुपर ओव्हरमध्ये रिचा घोषने एक षटकार मारला. तर स्मृती मानधनाने एक षटकार आणि चौकार मारत 20 धावा केल्या. ऑस्ट्रेलियानेसमोर 21 धावांचे लक्ष्य होते. परंतु ऑस्ट्रेलियाने दोन चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 16 धावा केल्या. या मालिकेतील तिसरा सामना ब्रेबॉर्न मैदानावर होणार आहे.