मोठी बातमी! राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 जाहीर;17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार, वाचा संपूर्ण यादी

विविध क्रीडा प्रकारांतील १७ खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून, तीन प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात येणार आहे.

News Photo   2026 08 18T140324.942

केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाने मंगळवारी (Sports) राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५ जाहीर केले. विविध क्रीडा प्रकारांतील १७ खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून, तीन प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती (निवृत्त) अरुण कुमार मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच्या शिफारशींच्या आधारे विविध श्रेणींतील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

अर्जुन पुरस्कारासाठी तेजस्विन शंकर, मुहम्मद अजमल व्ही., प्रियंका गोस्वामी, ट्रीसा जॉली, पुलेला गायत्री गोपीचंद, नरेंद्र, विदित संतोष गुजराती, दिव्या जितेंद्र देशमुख, धनुष श्रीकांत, लालरेमसियामी, राजकुमार पाल, सुरजीत, पूजा, रुद्रांश खंडेलवाल, एकता भ्यान, अरविंद सिंह आणि अखिल श्योराण यांची निवड झाली आहे. या खेळाडूंनी मागील चार वर्षांत उल्लेखनीय कामगिरी करण्यासोबतच नेतृत्वगुण, क्रीडाभावना आणि शिस्तीचे दर्शन घडविल्याबद्दल त्यांची निवड करण्यात आली आहे.

IND vs SL 1st Test: श्रीलंकेचा डाव 284 धावांत गडगडला; भारताला 178 धावांची आघाडी

अर्जुन पुरस्कार (जीवनगौरव) २०२५ हा फुटबॉलपटू आय. अरुमनायगम यांना प्रदान करण्यात येणार आहे. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आणि निवृत्तीनंतरही विविध माध्यमांतून क्रीडा क्षेत्राशी जोडलेले राहून त्याच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या खेळाडूंचा या पुरस्काराद्वारे गौरव केला जातो.

द्रोणाचार्य पुरस्कार २०२५ साठी परवीर सिंह (अॅथलेटिक्स), छोटे लाल यादव (बॉक्सिंग) आणि नेहा नंदकुमार चव्हाण (नेमबाजी) यांची निवड झाली आहे. द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव) २०२५ साठी धर्मेंद्र सिंह यादव (बॉक्सिंग) आणि वीरेंद्र कुमार (कुस्ती) यांची निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सातत्याने मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षकांचा या पुरस्काराने गौरव केला जातो.

राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार २०२५ हा आर्मी पॅरालिम्पिक नोड, पुणे यांना देण्यात येणार आहे. क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहनासाठी आणि विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या संस्था, उद्योगसमूह आणि स्वयंसेवी संस्थांना हा पुरस्कार दिला जातो. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांद्वारे दरवर्षी क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू आणि प्रशिक्षक यांचा सन्मान केला जातो.

 

follow us