India vs New Zealand : ‘सुंदर’ खेळला, पण पहिल्या टी-20 सामन्यात भारत हरला…
न्यूझीलंड विरूद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा दारूण पराभव झाला. यामुळे तीन सामन्याच्या टी-20 मालिकेत भारतीय संघ 1-0 ने पिछाडीवर पडला आहे. निर्णायक अर्धशतकी खेळी करणाऱ्या डॅरिल मिचेलला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
न्यूझीलंडने दिलेले 177 धावांचे आव्हान भारताला पेलवले नाही. भारताला 155 धावांपर्यंतच मजल मारता आल्याने 21 धावांनी संघाचा पराभव झाला. अष्टपैलू वॉशिंगटन सुंदरने झुंजार अर्धशतकी खेळी केली पण ती व्यर्थच गेली. विशेब बाब म्हणजे सुंदरने अर्धशतकासोबत दोन विकेट देखील घेतल्या होत्या. मात्र इतर फंलदाजांनी लैकिकास साजेशी कामगिरी न केल्यामुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडकडून गोलंदाजीत कर्णधार मिचेल सेंटनरने दोन विकेट घेतल्या.
तत्पूर्वी न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 176 धावांचे आव्हान उभे केले. न्यूझीलंडची सुरुवात अत्यंत वादळी झाली होती. फिन अॅलन आणि कॉन्वे यांनी अवघ्या 4 षटकांत 43 धावा चोपल्या होत्या. त्यानंतर वॉशिंगटन सुंदरने ही जोडी फोडत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. त्यानंतर मार्क चॅम्पन यालाही सुंदरने स्वस्तात माघारी झाडले. तर कुलदीप यादवने ग्लेन फिलीप्सला बाद केले.
दरम्यान लागोपाठ विकेट पडल्यामुळे न्यूझीलंडचा संघ अडचणीत सापडला होता. पण अखेरीस डॅरिल मिचेलने 30 चेंडूत 59 धावांची खेळी करत न्यूझीलंडला सन्माजनक धावसंख्या उभारून दिली. डॅरिल मिचेल आणि कॉन्वे यांनी अर्धशतकी खेळी केली. तर फिन अॅलनेने 35 धावांचे योगदान दिले. अखेरच्या षटकांत अर्शदीपच्या स्वैर गोलंदाजीचा भारताला चांगलाच फटका बसला. त्यामुळे न्यूझीलंडला 176 धावांचे आव्हान उभारणे शक्य झाले. दरम्यान गोलंदाजीत भारताकडून वॉशिंगटन सुंदरने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर अर्शदीप सिंह, कुलदीप यादव आणि शिवम मावी यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.
न्यूझीलंडने दिलेल्या 177 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. दोन्ही सलामीवीर गिल आणि इशान किशन स्वस्तात माघारी परतले. राहुल त्रिपाठी भोपळाही फोडता आला नाही. 30 धावांच्या आत भारताच्या तीन विकेट पडल्या होत्या. दरम्यान उपकर्णधार सूर्यकुमार यादव आणि कर्णधार हार्दिक पांड्याने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्यांच्याही विकेट एकापाठोपाठ एक काढण्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांना यश आल्याने भारताचा आशा संपुष्टातच आल्या होत्या. दीपक हुड्डालाही विशेष काही करता आले नाही. त्यामुळे भारताचा मोठ्या धावसंख्येनं पराभव होणार की काय? अशी स्थिती निर्माण झाली होती. मग सुंदरने मोक्याच्या क्षणी अर्धशतकी खेळी करत भारताचा डाव 155 धावांपर्यंत पोहोचवला.