South Africa : ‘चोकर्स’ म्हणजे काय? दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट टीमला हा टॅग का मिळाला?

South Africa : ‘चोकर्स’ म्हणजे काय? दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट टीमला हा टॅग का मिळाला?

1992, 1996, 2007, 2011, 2015, 2022 अन् 2023. वर्ष बदलली, ठिकाणे बदलली, ICC च्या स्पर्धा बदलल्या पण बदलला नाही तो या वर्षांमधील दक्षिण आफ्रिकेच्या मॅचचा निकाल.

दक्षिण आफ्रिका. जगातील सर्वोत्तम क्रिकेट संघांपैकी एक हा संघ मानला जातो. या संघाच्या एबी डिव्हीलिअर्स, जॅक कॅलिस, डेल स्टेन अशा अनेक खेळाडूंना जगभरातून प्रेम मिळाले आहे. केवळ कागदावरच नाही तर मैदानावरही या टीमच्या खेळाने मने जिंकली आहेत. पण जेव्हा आयसीसीच्या मोठ्या स्पर्धा आणि विशेषत: वर्ल्डकपचा विचार केला जातो तेव्हा मात्र ऐनवेळी कच खात नांगी टाकण्याच्या स्वभावामुळे आफ्रिकेला चोकर्स हे नाव मिळाले. फुटबॉलमध्ये हाच टॅग नेदरलँड संघाला मिळाला आहे. (What are chokers? Why did South Africa get this tag?)

1992 पासून क्रिकेट वर्ल्डकपचा भाग असलेल्या या टीमने आतापर्यंत वनडे आणि टी-20 असे वेगवेगळे अनेक वर्ल्ड कप खेळले आहेत. पण ही टीम कधीही चॅम्पियन्स होऊ शकलेली नाही. बर ही टीम सुरुवातीलाच दुबळ्या संघासारखी सुरुवात करुन साखळी फेरीतच बाहेर पडली आहे, असे फार क्वचित झाले आहे. साऊथ आफ्रिका सुरुवात भारीच करते पण शेवटच्या क्षणी किंवा ऐनवेळी कच खाते आणि विजेतेपद हुकते. संपूर्ण स्पर्धेत अतिशय शानदार, दमदार अशी जी काही विशेषण असतील ती वापरली तरी चालतील, एवढी भारी कामगिरी करते. पण नॉक आऊट मॅचेसमध्ये मात्र अनेकदा मोठ्या आणि कधी कधी अगदी किरकोळ चुका होतात. त्यामुळे एकतर टशनवाली मॅच होतच नाही किंवा हातातील मॅच जाते.

चोकर्स म्हणजे काय?

चोकर्स हा शब्द ‘चोक’ या शब्दापासून बनला आहे. याचा अर्थ होतो, ऐनवेळी, मोक्याच्या क्षणी कच खाणे, अडखळणे किंवा चुका करुन हातातील गोष्ट गमावून बसणे असा होता. आयसीसी टूर्नामेंटच्या मोठ्या सामन्यांमध्ये किंवा बाद फेरीतील मॅचेसमध्ये कच खाण्याच्या वृत्तीमुळेच या धुरंधर टीमला चौकर्स म्हटले जाऊ लागले. वर्ल्डकपमधील नॉकआऊट मॅचेसमध्ये विरोधी टीमवर अॅटॅक करुन तुटून पडण्याऐवजी ही टीम मागे पडते आणि ट्रॉफीपासून दुरावते. दक्षिण आफ्रिकेवर चोकर्स म्हणून शिक्कामोर्तब झाला 1999 मध्ये झालेल्या पराभवानंतर. पण त्यांना चोकर्स म्हणायला सुरुवात झालेली ती 1992 आणि 1996 मध्ये झालेल्या लाजीरवाण्या पराभावनंतर.

World Cup 2023 : अटीतटीच्या सामन्यात आफ्रिका पराभूत; भारत-ऑस्ट्रेलिया वर्ल्डकपसाठी भिडणार !

1992 ची वर्ल्डकप सेमीफायनल :

1992 चा वर्ल्डकप पाकिस्तानने जिंकला होता. मात्र त्या वर्ल्डकपनंतर दक्षिण आफ्रिका संघाचीही पाकिस्तानइतकीच चर्चा झाली. त्या वर्ल्डकपमध्ये वर्णद्वेषाच्या धोरणांमुळे बंदी घालण्यात आल्याने दक्षिण आफ्रिकेची टीम प्रदीर्घ काळानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत होती. मात्र या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या टीमने आपल्या कामगिरीने सर्वांनाच चकित केले. संघाने साखळी फेरीत चमकदार कामगिरी करत उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. सेमी फायनलमध्ये त्यांचा सामना इंग्लंडशी झाला.

या मॅचमध्ये आयसीसीच्या नियमांमुळे एक विचित्र घटना घडली. दक्षिण आफ्रिकेचा संघ इंग्लंडने दिलेल्या 253 रन्सला चेस करत होता. टीमला जिंकण्यासाठी शेवटच्या 13 बॉलमध्ये 22 रन्स करायच्या होत्या. ही मॅच दक्षिण आफ्रिकेला टप्प्यात दिसत असतानाच पाऊस पडला. काही वेळाने पाऊस थांबला. पण खेळ बदलला. सामना पुन्हा सुरू होण्यापूर्वी त्यावेळच्या मोस्ट प्रोडक्टिव ओव्हर्स नियमानुसार, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 1 बॉलवर 21 धावांचे अशक्य लक्ष्य देण्यात आले. जे पाहून कोणाचाही विश्वास बसेना. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला.

1996 वर्ल्डकप :

1992 ची आठवण विसरुन पुन्हा मैदानावर उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेने 1996 मध्ये पुन्हा दमदार सुरुवात केली. साखळी फेरीतील पाच मॅचेस जिंकून संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पण तिथे वेस्ट इंडिजकडून 19 धावांनी पराभूत होऊन संघाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.

1999 चा वर्ल्डकप :

1999 च्या वर्ल्डकपमध्ये आफ्रिका कटू आठवणी विसरत पुन्हा मैदानावर उतरली. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने होते. त्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हॅन्सी क्रोनिएने टॉस जिंकून बॉलिंग घेतली. त्याचा हा निर्णय सुरुवातीला योग्य ठरला. आफ्रिकन संघाने ऑस्ट्रेलियाच्या टॉप ऑर्डरला उद्ध्वस्त केले. 68 रन्सवर ऑस्ट्रेलियाचे मार्क वॉ, अॅडम गिलख्रिस्ट, रिकी पाँटिंग आणि डॅरेन लेहमन असे 4 प्लेअर्स पेव्हेलिअनमध्ये होते.यानंतर मायकेल बेवनने इतर खेळाडूंसोबत छोट्या पार्टनरशीप रचल्या. यामुळे ऑस्ट्रेलियन टीमने 213 मजल मारली. शॉन पोलॉकने पाच आणि अॅलन डोनाल्डने 4 विकेट्स घेतल्या.

214 रन्सला चेस करताना गॅरी कर्स्टन आणि हर्शल गिब्स यांनी टीमला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी 48 धावा फलकावर लावल्या. पण यानंतर शेन वॉर्नची जादू सुरू झाली. वॉर्नने लागोपाठच्या ओव्हर्समध्ये दोन्ही खेळाडूंना बाद केले. कॅप्टनच्या विकेटसह 61 धावांत चार विकेट गमावल्याने दक्षिण आफ्रिकेचा संघ अडचणीत आला. त्यानंतर जॅक कॅलिसने जॉन्टी रोड्ससह पाचव्या विकेटसाठी 84 धावांची पार्टनशीप रचली आणि स्कोअरबोर्ड 150 च्या पुढे नेला. यानंतर टीमने पुन्हा ठराविक अंतराने विकेट गमावल्या आणि नऊ विकेट्स 198 रन्स अशी स्थिती झाली.

न्यूझीलंडवर हल्ला; शामीवर गुन्हा दाखल? दिल्ली पोलिसांच्या प्रश्नावर मुंबईच्या खाकीचे ‘भन्नाट’ उत्तर

टीम अडचणीत होती. पण दक्षिण आफ्रिकेसाठी दिलासा देणारी गोष्ट होती त्यांचा स्टार प्लेअर लान्स क्लुजनर अजूनही क्रीजवर होता. अॅलन डोनाल्ड सोबत होता. शेवटच्या आठ बॉलमध्ये 16 रन्स पाहिजे होत्या. क्लुसनरने मॅकग्राच्या ओव्हरला पाचव्या बॉलवर सिक्स मारला आणि पुन्हा एक रन घेत स्ट्राईक स्वतःकडे ठेवला. आता शेवटच्या ओव्हरला 9 रन्सची गरज होती. सामना पूर्णपणे दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने गेला. यानंतर क्लुजनरने आश्चर्यकारक कामगिरी करत डॅनियल फ्लेमिंगच्या पहिल्या दोन बॉलवर दोन फोर मारून मॅच बरोबरीत आणली.

दक्षिण आफ्रिका पहिल्या फायनलच्या अगदी जवळ आली होती. संघाला विजयासाठी फक्त एका धावेची गरज होती. यातही क्लुसनर स्ट्राईकवर होते. क्लुसनरने ओव्हरचा तिसरा बॉल मिड-ऑनच्या दिशेने खेळला. ज्याला डॅरेन लेहमनने कॅच केला नॉन स्ट्राइक एंडला थ्रो केला. डोनाल्ड क्रीजच्या बाहेर होते पण थोडक्यात बचावले. दक्षिण आफ्रिकेसाठी हा इशारा होता. ओव्हरच्या चौथ्या बॉलवर क्लुसनरने बॉल मिड-ऑनच्या दिशेने ढकलला आणि रन घेतली. पण नॉन स्ट्राईकवर उभ्या असलेल्या अॅलन डोनाल्डची नजर बॉलकडे होती. तो सावरण्याआधीच फ्लेमिंगने गिलख्रिस्टकडे बॉल थ्रो केला आणि त्याने विकेट्स उडवत दक्षिण आफ्रिकेच्या आशाही धुळीला मिळवल्या.

मॅच टाय झाल्यानंतरही ऑस्ट्रेलियाने फायनल गाठली. कारण सुपर सिक्स फेरीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. शिवाय ऑस्ट्रेलियाचा रनरेटही चांगला होता. याच सामन्यातील पराभवाने दक्षिण आफ्रिकेवर चोकर्सचा टॅग लावला. जो कायम राहिला. अगदी आतापर्यंत. नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये नेदरलँड सारख्या टीमकडून 13 रन्सनी हारल्यामुळे बाहेरचा रस्ता पकडावा लागला होता. तेच आजच्या मॅचमध्येही संपूर्ण स्पर्धेत चांगली बॅटिंग करणारी टीम आज मात्र ढेपळली, बॉलर्स आणि टीम लढली पण हारल्याने चौकर्सचा टॅग कायम राहिला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube