’12 न घेता 7 का घेतले हे कळायला मार्ग नाही’; राज्यपाल नियुक्त आमदारांवरून अजित पवारांचा प्रश्न
MLA appointed by Governor : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या राज्यपाल नामनिर्देशित जागा गेल्या साडे चार वर्षांपासून रिकाम्या होत्या. अखेर राज्यपाल रमेश बैस यांनी 7 जणांच्या नावांना मंजुरी देत असल्याचं राजपत्र प्रसिद्ध केलं. (Ajit Pwar) त्यानुसार विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये 7 सदस्यांचा शपथविधी पार पडला. मात्र, 5 जागांचं काय होणार यासंदर्भातील प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.
अजित पवार काय म्हणाले?
राज्यपालांनी विधानपरिषदेवर 7 जणांची नियुक्ती केली आहे. हा विषय अनेक दिवस प्रलंबित होता. या राज्यपालांनी ते मनावर घेतलं. तो त्यांचा अधिकार असतो. परंतु, 12 न घेता 7 का घेतले हे कळायला मार्ग नाही. राहिलेले 5 घ्या याबाबत राज्यपालांना भेटल्यावर विनंती करु, असं अजित पवार म्हणाले आहेत.
विधानपरिषदेवर राज्यपालांनी कुणाला संधी दिली?
विधानपरिषदेवरील राज्यपाल नामनिर्देशित 12 जागांपैकी 7 जागांवर रमेश बैस यांनी नियुक्ती केली आहे. भाजपच्या चित्रा वाघ, विक्रांत पाटील आणि धर्मगुरु बाबुसिंग महाराज राठोड यांना संधी देण्यात आली आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी खासदार हेमंत पाटील आणि माजी आमदार मनीषा कायंदे यांना संधी दिली आहे. अजित पवारांच्या कोट्यातून पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांना संधी देण्यात आली आहे.