फक्त दोन मिनिटांचा उशीर अन् संधी हुकली; माजी मंत्र्याची धडपड व्यर्थ, अर्ज राहिला हातातच…
Nagpur News : वेळ फार महत्वाची आहे असं म्हटलं जातं. राजकारणात तर वेळ पाहून घेतलेल्या निर्णयाला खूप महत्व असतं. वेळ किती महत्वाची असते एक एक मिनिटांचं महत्व काय असतं याची अनुभूती तेव्हाच होते ज्यावेळी एखादं अत्यंत महत्वाचं फक्त काही सेकंद किंवा मिनिटांमुळे राहून जातं. अशीच एक घटना महाराष्ट्राच्या निवडणुकीत (Maharashtra Elections 2024) घडली आहे.
नागपूर मध्य विधासभा (Nagpur News) मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने अनीस अहमद यांना तिकीट दिले होते. परंतु, फक्त दोन मिनिटांचा उशीर झाला अन् अहमद यांना उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही. माजी आमदार आणि मंत्री राहिलेल्या अनीस अहमद काँग्रेसकडून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. परंतु, काँग्रेसकडून त्यांना तिकीट मिळालं नाही. तरीदेखील कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच असा निर्धार त्यांनी केला होता.
CM शिंदेंच्या मतदारसंघात ट्विस्ट! काँग्रेसच्या बंडखोरीने केदार दिघेंची डोकेदुखी वाढणार
यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. आघाडीने त्यांना नागपूर मध्यमधून उमेदवारी जाहीर केली. काल मंगळवार उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. अर्ज दाखल करण्यासाठी अनीस अहमद पोहोचले सुद्धा होते. अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण करून अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांना देईपर्यंत तीन वाजून दोन मिनिटे झाली होता.
अर्ज दाखल करण्याची वेळ दुपारी तीन वाजेपर्यंतच होती. दोन मिनीट उशीर झाल्याचे सांगत निवडणूक अधिकाऱ्यांनी नामांकन कक्षाचा दरवाजा बंद केला. त्यामुळे अनीस अहमद यांना उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही. त्यामुळे यंदा निवडणूक लढण्याचे त्यांचे स्वप्न पूर्णत्वास येऊ शकले नाही. या प्रकारानंतर अनीस अहमद यांनी प्रशासनाला जबाबदार धरलं आहे.
मी तीन वाजण्याच्या आधीच कक्षात हजर झालो होतो असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. माझी काही माणसे आधीच येथे हजर होती. त्यांच्याकडून आठ नंबरचे टोकनही घेण्यात आले होते. जर माझा माणूस आतमध्ये हजर होता तर मग मला आत का जाऊ दिले नाही असा सवाल त्यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला. तीन वाजण्याच्या आधी मुख्य प्रवेशद्वार, सेमी गेट आणि आणखी सर्व दरवाजे पार करून मी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कक्षात पोहोचलो होतो. परंतु, अधिकाऱ्यांनी मला पुढे जाऊ दिले नाही असा आरोप अनीस अहमद यांनी केला.
Nagpur : स्वतःची झोळी रिकामी अन् शिंदेंच्या शिलेदारांची ठाकरेंच्या आमदाराला मंत्रिपदाची ऑफर