महिला पत्रकाराला अपक्ष उमेदवाराच्या नातेवाईकांकडून जीवे मारण्याची धमकी, किशोर भेगडे यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा

  • Written By: Published:
महिला पत्रकाराला अपक्ष उमेदवाराच्या नातेवाईकांकडून जीवे मारण्याची धमकी, किशोर भेगडे यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा

Maval Assembly Constituency : विरोधात वार्तांकन का करतेस, असा जाब विचारत विकास नामवंत वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मावळ विधानसभा मतदारसंघातील (Maval Assembly Constituency) महाविकास आघाडी (MVA) पुरस्कृत अपक्ष उमेदवाराच्या दोन नातेवाईकांसह चौघांविरुद्ध लोणावळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी राज्य महिला आयोगाकडे देखील दाद मागण्यात आली आहे. लोणावळा येथे 11 नोव्हेंबरला महाविकास आघाडीचे नेते व शिवसेना (Shivsena) उद्धव ठाकरे गटाचे आमदार सचिन आहेर यांची पत्रकार परिषद होती. त्यानंतर आरोपींनी संबंधित महिला पत्रकाराला आडवून धमकावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

त्यानुसार किशोर भेगडे, संदीप भेगडे व अन्य दोन अनोळखी व्यक्तीविरुद्ध लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर भेगडे हे तळेगाव चे माजी उपनगराध्यक्ष आहेत.

लोणावळ्यात नऊ नोव्हेंबरला संध्याकाळी महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे व महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांचे समर्थक आमने-सामने आल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याप्रकरणाची चुकीची बातमी दिल्याचा आरोप करीत भेगडे यांच्या समर्थकांनी संबंधित महिला पत्रकाराला जाब विचारला व निवडणुकीनंतर बघून घेण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी संबंधित पत्रकार महिलेने पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन लेखी तक्रार अर्ज दिला. त्याची तातडीने दखल घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश लोणावळा शहर पोलिसांना दिले. त्यानुसार 12 नोव्हेंबरला पत्रकार महिलेची तक्रार नोंदवून घेण्यात आली. राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून निषेध अपक्ष उमेदवाराच्या समर्थकांकडून महिला पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिली जाण्याच्या प्रकाराचा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष दिपाली दराडे यांनी तीव्र शब्दात निषेध केला. विरोधी उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या प्रचारात वारंवार महिलांचा अवमानकारक उल्लेख होत असल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

तालुक्यातील ‘लाडक्या बहिणीं’ वर बापूसाहेब व त्यांच्या समर्थकांचा एवढा राग का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. काही महिन्यांपूर्वी तळेगाव नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी बापूसाहेब भेगडे यांनी अर्वाच्य भाषेत महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केली होती. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात देखील वारंवार साड्यांचा उल्लेख करून तालुक्यातील समस्त भगिनींना हिणवण्याचा किळसवाणा प्रकार  उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे.

शरद पवारांचा शब्द, उद्धव ठाकरेही पक्के; कलाटेंनी नेमकं काय सांगितलं?

जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर हे देखील ‌ त्यांच्या बहुतेक भाषणांमध्ये वारंवार महिलांविषयी आक्षेपार्ह उल्लेख करीत आहेत. यातून विरोधकांची महिलांविषयीची मानसिकता दिसून येत आहे. तालुक्यातील महिलांचे पालकत्व स्वीकारण्याच्या बाता करणाऱ्या उमेदवाराचा खरा चेहरा जनतेच्या समोर आला आहे, असेही त्या म्हणाल्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube