R. Madhavan : FTII ला मिळाला नवीन अध्यक्ष, अभिनेता आर माधवन यांची नियुक्ती; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती

  • Written By: Published:
R. Madhavan : FTII ला मिळाला नवीन अध्यक्ष, अभिनेता आर माधवन यांची नियुक्ती; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती

R. Madhavan : सुपरस्टार आर. माधवन (R. Madhavan) यांच्यावर आता मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गेल्या काही वर्षापासून अनेक कारणांनी वारंवार चर्चेत राहिलेल्या पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (Film and Television Institute of India) अध्यक्षपदी माधवन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली. अनुराग ठाकूर यांनी आर माधवन याचे अभिनंदन केले आहे. अलीकडेच आर माधवनच्या ‘रॉकेटरी: द नंबी इफेक्ट’ला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

फिल्म अॅंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी माधवन याची निवड झाल्यानंतर अनुराग ठाकूर यांनी ट्विट करत आर माधवन यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, ‘एफटीआयआय आणि गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आर माधवन यांचे हार्दिक अभिनंदन. मला खात्री आहे की तुमचा अफाट अनुभव आणि भक्कम कामाची नीतिमत्ता या संस्थेला समृ्ध्द करेल, सकारात्मक बदल घडवून आणेल आणि तिला अधिक उंचीवर नेईल. माझ्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत.’

अनुराग ठाकूर यांच्या ट्विटनंतर अभिनेता आर. माधवन यांनीही त्यांचे आभार मानले. माधवन यांनी लिहिलं की, मी या सन्मानाबद्दल मनःपूर्वक आभार मानतो. मी सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन, असं ट्विट माधवन यांनी केलं.

आर. माधवन यांच्यापूर्वी चित्रपट निर्माता शेखर कपूर हे या पदावर होते. मात्र त्यांचा कार्यकाळ ३ मार्च २०२३ रोजी संपला. त्यानंतर सहा महिन्यांनी एफटीआयआयला अध्यक्ष मिळाला आहे. पण लोकसभा निवडणुकीमुळं आर. माधवन यांनी केवळ ९ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.

यापूर्वी आर माधवन यांनी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आयोजित केलेल्या डिनरला हजेरी लावली होती. त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. तेव्हा आर माधवन यांनी डिनरचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते आणि दोन्ही नेत्यांचे कौतुक केलं होतं. फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

माधवन दोन दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत
आर. माधव हे 2001 मध्ये ‘रेहना तेरे दिल में’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. माधवन यांनी रंग दे बसंती, 3 इडियट्स, तनु वेड्स मनू आणि तनु वेड्स मनु रिटर्न्स यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यांच्या अभिनयाचे प्रत्येक वेळी कौतुक झालं आहे. आर. माधवनच्या रॉकेट्री: द नंबी इफेक्ट या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हा चित्रपट इस्रोचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्या जीवन संघर्षावर आधारित आहे.

FTII चे अध्यक्षपद आणि वाद
अभिनेता गजेंद्र चौहान यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती एफटीआयआयचं अध्यक्षपद चर्चेत होतं. चौहान यांचा कार्यकाळ संपल्यानंतर अभिनेते अनुपम खेर यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, ऑक्टोबर 2018 मध्ये खेर यांनी पदावरून अचानक राजीनामा दिल्यानंतर, सीआयडी मालिका दिग्दर्शक आणि FTII पदाधिकारी ब्रिजेंद्र पाल सिंग (बीपी सिंग) यांची डिसेंबर 2018 मध्ये अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. सिंग यांच्या कार्यकाळात, FTII ने विविध ठिकाणी छोटे अभ्यासक्रम सुरू केल्यामुळे खाजगीकरणाच्या चर्चेने जोर धरला होता. फी वाढ आणि शॉर्ट कोर्सेससाठी हजारो रुपये आकारल्याबद्दल टीका होत होती. सिंग यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर संचालक शेखर कपूर यांनी एफटीआयआयचे अध्यक्षपद स्वीकारले होते.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube