राम भक्त हनुमान साँग: अनुपम खेर यांचं नवं भक्तिगीत चर्चेत; मनाला भिडणारं गाणं रिलीज!
Anupam Kher Ram Bhakt Hanuman Song: मॅक्स स्टुडिओजने आपले नवे हिंदी ओरिजिनल गाणे ‘राम भक्त हनुमान’ प्रदर्शित केले आहे.
Anupam Kher Ram Bhakt Hanuman Song: श्रद्धा, संगीत आणि कथा सांगण्याची अनोखी शैली यांचा सुरेख मेळ साधत वरुण गुप्ता यांच्या मॅक्स स्टुडिओजने आपले नवे हिंदी ओरिजिनल गाणे ‘राम भक्त हनुमान’ प्रदर्शित केले आहे. या खास गाण्यात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) दिसत आहेत. देव प्रत्येक ठिकाणी असतो, फक्त त्याला पाहण्याची दृष्टी आपल्याकडे असायला हवी, या सुंदर विश्वासावर हे गाणे आधारित आहे.
पाच फुटाचा बच्चन आता घरबसल्या पाहता येणार! ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखल झाला चित्रपट
‘राम भक्त हनुमान’ हे गाणे चांगुलपणा, करुणा आणि निस्वार्थ सेवेचा संदेश देते. भगवान हनुमान यांची शक्ती आणि भक्ती केवळ मंदिरांपुरती मर्यादित नसून, आपल्या रोजच्या आयुष्यातील छोट्या-छोट्या चांगल्या कामांमधूनही दिसून येते, हे या गाण्यातून सांगण्यात आले आहे.
अनुपम खेर यांच्या उपस्थितीमुळे या गाण्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. इतरांमधील चांगुलपणा ओळखणे आणि गरजूंच्या मदतीला धावून जाणे, हेदेखील ईश्वराची खरी भक्ती असल्याचे या गाण्यातून दाखवण्यात आले आहे. म्हणजेच, देवाला शोधण्यासाठी नेहमी मंदिरात जाण्याची गरज नाही, तर कधी कधी एखाद्याला मदत करण्यातही ईश्वराचे दर्शन घडते.
अलीकडेच अनुपम खेर यांनी त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलताना सांगितले होते की, त्यांच्या आगामी कथा चांगुलपणा, श्रद्धा आणि सत्य यांसारख्या सुंदर मूल्यांवर आधारित आहेत. ‘राम भक्त हनुमान’ हे गाणे त्याच विचारांचे एक खास उदाहरण आहे.
या गाण्याबद्दल बोलताना अनुपम खेर म्हणाले, “जेव्हा वरुणने मला चांगुलपणात देवाला शोधण्याची संकल्पना सांगितली, तेव्हा ती गोष्ट थेट माझ्या मनाला भिडली. तनयचा मनापासून गायलेला शांत आणि सुरेल आवाज, अप्रतिम संगीत आणि सुंदर शब्दांनी गाण्यात योग्य भावना निर्माण केल्या आहेत.
हे गाणे पूर्ण प्रामाणिकपणे आणि मनापासून तयार करण्यात आले आहे. या गाण्याने मला ज्या प्रकारे स्पर्श केला, त्याचप्रमाणे ते प्रेक्षकांच्या मनालाही भिडेल, अशी आशा आहे.”
वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास, अनुपम खेर सध्या ‘रामायण’ या चित्रपटात जटायूची भूमिका साकारत असल्याने चर्चेत आहेत. याशिवाय राजश्री प्रॉडक्शन्सच्या ‘ये प्रेम मोल लिया’ या चित्रपटातील त्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेमुळेही ते चर्चेत आहेत.
या गाण्याला तनय मिमानी यांनी आवाज दिला आहे. तसेच गाण्याचे संगीत तयार करण्यासोबतच त्यांनीच याचे बोलही लिहिले आहेत. वरुण गुप्ता यांनी या प्रोजेक्टची निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. श्रद्धा आणि चांगुलपणाला समर्पित असलेली ही एक सुंदर संगीतमय आदरांजली आहे.
श्रद्धा कपूर साकारणार तमाशा कलाविश्वातील अनोखी भूमिका; लक्ष्मण उतेकरांचा ‘ईठा’ चर्चेत!
‘राम भक्त हनुमान’ हे गाणे आता यूट्यूबवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. तसेच या गाण्याचे ऑडिओ सर्व प्रमुख म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरही प्रदर्शित करण्यात आले आहे.