“बंडखोर”पणा दाखवण्याचा हेकेखोरपणा…महेश मांजरेकरांचा सिनेमा का फिका पडतो?
Bandkhor
Bandkhor Movie Review : ज्या दिग्दर्शकाने आई, अस्तित्व, देह, मातीच्या चुली, काकस्पर्श असे हे एकाहून एक नायिका प्रधान सिनेमे दिल्यानंतर महेश मांजरेकरांच्या (Mahesh Manjrekar) बंडखोर या सिनेमाकडून निश्चितच अपेक्षा त्यांनीच उंचावून ठेवले आहेत. आजपर्यंतच्या त्यांच्या प्रत्येक सिनेमातील स्त्री व्यक्तिरेखा तिचा स्वतःचा आब, डौल मान राखून व्यक्त होताना दिसली… त्यामुळे त्यांच्या बंडखोरकडून निश्चितच वेगळ्या अपेक्षा होत्या… त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत…ही वस्तुस्थिती आहे. संकल्पना उत्तम… त्यामधील काही व्यक्तिरेखा परिस्थितीला उत्तर देण्यासाठी ज्या पद्धतीने वागतात त्यादेखील निश्चित कौतुकास्पद आहे पण गोळा बेरीज करता सिनेमाचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न केला तर हाती मात्र काही लागत नाही ही वस्तुस्थिती आहे. गौरी देशपांडे, सानिया, मेघना पेठे कविता महाजन यांची पात्र यांनी आत्तापर्यंत लिखाणापासून साहित्य कृतींपर्यंत रुजवलेला बंडखोरपणा अपेक्षित धरून तुम्ही सिनेमाला गेलात तर हाती काही लागणार नाही हे देखील तेवढेच खरं आहे.
सततचा त्रागा, चिडचिड आणि तार सप्तकात बोलून सिगरेट पीत असताना समोरच्यावर सतत डाफरत राहणं म्हणजे आपण बंडखोर आहोत हे गृहीतक प्रियदर्शनी इंदलकरने मांडण्याचा केलेला प्रयत्न अगदीच फसवा आहे. तिच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण सिनेमा पाहतो आणि मग एकेक पात्र आपल्यासमोर येत जातात… पण जे घडतं ते अधिक सघन होत जाईल, ही आशा मात्र फोल ठरते. नात्यांचा गुंता आणि गुंत्यातील नाती हा या सिनेमाचा केंद्रबिंदू आहे… नवऱ्याने ठेवलेल्या बाईला त्याच्या मृत्यूनंतर सावत्र मुलगा त्रास देतो म्हणून आपल्या घरी आणणारी स्त्री, आजोबांच्या अंत्ययात्रेनंतर स्मशानात जाण्यासाठी झगडणारी, आपली स्क्रिप्ट बदलली म्हणून बॉसवर उचकणारी आणि पुरुषसत्ताक कर्मठ वातावरणात वाढली तरीही बहिणीला सिगरेट पिताना पाहून दोन झुरके मारण्यासाठी आसूसलेली स्त्री ही बंडखोरीची प्रतीक आहेत.
‘बंडखोर’च्या लेखनाची एक महत्त्वाची जमेची बाजू म्हणजे त्यात स्त्री व्यक्तिरेखांना केवळ परिस्थितीची बळी म्हणून उभं केलं गेलेलं नाही. उषा, मीरा आणि सीमा या तिन्ही व्यक्तिरेखांच्या स्वभावात, त्यांच्या निर्णयांमध्ये आणि जगण्याच्या पद्धतीत एक ठामपणा आहे. त्यांना स्वतःच्या आयुष्याची दिशा स्वतः ठरवायची आहे. मात्र, या व्यक्तिरेखांचा संघर्ष दाखवताना चित्रपट काही ठिकाणी फार सरळ रेषेत जातो. त्यामुळे त्यांच्या वाट्याला येणाऱ्या प्रसंगांमध्ये अपेक्षित असलेली गुंतागुंत किंवा अंतर्गत संघर्षाची तीव्रता काहीशी कमी होते.
यातली प्रत्येक स्त्रीचा कणा हा ताठ असायलाच हवा, असा आग्रह लेखक-दिग्दर्शकाने धरलेला नाही, हे मात्र महत्त्वाचं. उषा आणि मीरा यांचा बंडखोर स्वभाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सहज भाग आहे. पण प्रत्येक स्त्रीचा बंड करण्याचा मार्ग सारखा नसतो. कधी निर्णय घेण्यासाठी धैर्य लागतं, तर कधी योग्य क्षणाची वाट पाहावी लागते. उषा मुळातच बंडखोर आहे पण ती तिची बंडखोरी इतरांवर लादताना दिसत नाही हे करणं जितकी तारेवरची कसरत आहे तितकच मीराचा असाह्यपणा आणि त्यानंतर तिने वडिलांविरोधात निर्णय घेतल्यावर उष्णतेची पाठ राखण करणे किंवा उषाने मिळाला आईच्या रहस्य बद्दल सांगितल्यानंतर तिच्याकडे मीराचा बदललेला दृष्टिकोन हा ट्रॅकही सिनेमातील वेगळेपण अधोरेखित करतो. किंवा एका घटनेनंतर मीराने आपल्या बॉयफ्रेंडला दिलेला ठाम नकार या निर्णयाबाबत उषाचा असलेला पवित्रा हा देखील तितकाच महत्त्वाचा ठरतो. कारण पिढींमध्ये अंतर असतं तरी विचाराने पुढारलेल्या असण्यातील हा सूक्ष्म फरक तितक्याच प्रभावीपणे अधोरेखित केलेला आहे.
सतत कोणीतरी आपल्याला वाचवत राहणं हा सशक्तीकरणाचा मार्ग नाही. उलट, आपल्याला काय हवं आहे, कोणता निर्णय घ्यायचा आहे आणि त्या निर्णयाचे परिणाम स्वीकारण्याची तयारी आहे का, याचं भान स्वतःमध्ये निर्माण होणं अधिक महत्त्वाचं. या अर्थाने ‘बंडखोर’ स्त्री-पुरुष असा सरळ भेद करण्यापेक्षा व्यक्ती म्हणून स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी घेण्याचा मुद्दा मांडतो. या सूक्ष्मतेमुळे चित्रपटातील काही प्रसंग अपेक्षेपेक्षा अधिक परिणामकारक ठरतात. मात्र, याच ठिकाणी चित्रपटाच्या लेखनाची एक मर्यादाही जाणवते. स्त्रियांच्या बाजूने भूमिका मांडताना पुरुष व्यक्तिरेखांची विभागणी बऱ्याचदा ‘चांगला’ आणि ‘वाईट’ अशा दोन टोकांवर होते. त्यामुळे संघर्षाला आवश्यक असलेली धूसर किनार कमी होते. प्रत्येक पुरुष चुकीचा आणि प्रत्येक स्त्री बरोबर, अशी मांडणी प्रत्यक्ष आयुष्यातील नात्यांच्या गुंतागुंतीला फारशी जागा देत नाही. परिणामी, चित्रपटाचा दृष्टिकोन काही ठिकाणी एकांगी वाटतो.
इरावती कर्णिक यांच्या लेखनाबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्याकडून अपेक्षा थोड्या अधिक आहेत. एकांकिका असो किंवा इतर लेखन, त्यांच्या स्त्री व्यक्तिरेखांच्या जगण्यातला अंतर्गत ताण, त्यांच्या संवादांमधून व्यक्त होणारा न बोललेला अर्थ आणि साध्या वाक्यांच्या आड दडलेला अंडरकरंट ही त्यांच्या लेखनाची नेहमी जाणवणारी वैशिष्ट्यं राहिली आहेत. त्यांच्या व्यक्तिरेखा केवळ एखादा विचार मांडण्यासाठी बोलत नाहीत; त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या मनात सुरू असलेला संघर्षही जाणवत राहतो.
‘बंडखोर’मध्ये इरावती कर्णिक आणि सिद्धार्थ साळवी यांनी लिहिलेले संवाद मात्र मुद्देसूद आणि सहज आहेत. ते फार शब्दबंबाळ होत नाहीत, प्रेक्षकाला शिकवण्याच्या भूमिकेत जात नाहीत, ही निश्चितच जमेची बाजू. पण तरीही इरावती कर्णिक यांच्या पूर्वीच्या लेखनात जाणवणारी ती धार, संवादांच्या पलीकडे जाऊन व्यक्तिरेखेच्या मनोविश्वाला स्पर्श करणारा तो सूक्ष्म अंडरकरंट यावेळी तितक्या ठळकपणे जाणवत नाही. विषयाची तीव्रता आणि व्यक्तिरेखांची क्षमता पाहता लेखन आणखी खोलवर जाऊ शकलं असतं, अशी अपेक्षा निर्माण होते.
‘बंडखोर’चा विषय नवा नाही; स्त्रीच्या अस्तित्वावर असलेले सामाजिक आणि कौटुंबिक निर्बंध यापूर्वीही अनेक कलाकृतींनी मांडले आहेत. या चित्रपटाचं वेगळेपण त्या विषयाकडे पाहण्याच्या काही सूक्ष्म दृष्टिकोनात आहे. मात्र, जिथे ही बंडखोरी अधिक धारदार, अस्वस्थ करणारी आणि अंतर्मुख करणारी होण्याची शक्यता होती, तिथे काही प्रसंग अतिशय फ्लॅट अनुभव देतात आणि त्यामध्ये अपेक्षित परिणाम साधला जात नाही. त्यामुळे ‘बंडखोर’चा विचार महत्त्वाचा असूनही त्याची सिनेमॅटिक धार काही ठिकाणी बोथट झाल्यासारखी वाटते.
या सिनेमात हितेश मोडकचे तुझे हर शाम पढा जाता है… हे गाणं हे सगळ्यात मोठं शक्ती स्थान आहे. ही ज्या पद्धतीने चित्रित केला आहे आणि ज्या पद्धतीने गायले गेले आहे… ही फारच मोठी जमेची बाजू आहे. छाया कदमने बॅटिंग केली आहे. मृणाल कुलकर्णी यांच्या वाट्याला मोजकीच काही वाक्ये आहेत… अन् शेवटी तिची कथा सांगायची राहून गेली असं सांगून पुन्हा आख्यान मांडलं आहे. त्यांनी घेतलेला मदर इंडिया पवित्रा मात्र ही उणीव भरून काढतो… हे देखिल तितकेच महत्त्वाचे. पुढील दोन बटा रंगवल्याने तितिक्षा तावडे प्रियदर्शनीची आई अजिबात वाटत नाही… पण तिच्या वाट्याला आलेली भूमिका तिने वठण्याचा केलेला प्रयत्न उत्तम असला तरी पात्र रचनेमुळे ते जड जाते… ही बाब नाकारता येणार नाही… प्रियदर्शनी आजपर्यंत तुलनेने मिळालेली सगळ्यात मोठी भूमिका पण त्याचं सोनं करता आलं नाही की देखील तितकीच खंत आहे.
पूजा कातुर्डे, नित्यश्री ज्ञानलक्ष्मी आणि अगदी छोटेखानी भूमिकेतील रावी किशोर या अभिनेत्रीने त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिका आणि मोजके सीन्स वठवण्याचा प्रयत्न केला आहे. मंगेश देसाईंनी साकारलेला पुरुषी अहंकारी मामा त्याचा रंग भरतो… मात्र त्याच्या व्यतिरिकेचा आलेख बदलत असतानाचे काही सिक्वेन्सस मात्र त्याच्या चढत्या आलेखाला शह देणारे ठरतात… अभिनेता म्हणून आपल्यासमोर येणारे महेश मांजरेकर मात्र त्यांची भूमिका चूक पटवतात व्यक्तिरिक्त असणारा मुक्त समंजस आणि प्रगल्भपणा हा त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येतो.
ही गोष्ट मांडण्याचा केलेला मांजरेकरांचा प्रयत्न उल्लेखनीय असला तरी, मांडणीत आणि कथानकात बरेच कच्चे दुवे राहिले आहेत…
मात्र स्त्रीने स्वत:चे स्वत:साठी निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. समाज त्याला बंडखोरीचं लेबल देणारच, पण त्यांनी स्वत:साठी जगणं गरजेचे आहे हे सांगण्याचा दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा प्रयत्न इथे उल्लेखनीय ठरतो. कथानकाच्या मांडणीत आणि सादरीकरणात बरेच कच्चे दुबे राहिलेले आहेत ते अधिक प्रभावीपणे सांधता आले असते, तर सिनेमा वेगळ्या उंचीवर जाऊ शकला असता, हे नाकारता येणार नाही…
का पाहावा ?
वेगळा विषय मांडण्याचा केलेला प्रयत्न
का टाळावा ?
कथा पटकथा मांडणी आणि सादरीकरणात अनेक त्रुटी आणि कच्चे आहेत
थोडक्यात काय ?
बंडखोरपणा दाखवण्याचा हेकेखोरपणा…
⭐⭐1/2✨
अमित भंडारी, चित्रपट समीक्षक