विनोदी आणि हृदयस्पर्शी नाटक ‘शंकर-जयकिशन’चा अहिल्यानगरमध्ये प्रयोग; महेश मांजरेकर 29 वर्षांनी रंगमंचावर

मराठी रंगभूमीवर सध्या ज्या नाटकाची सर्वाधिक चर्चा आहे, ते विनोदी आणि हृदयस्पर्शी नाटक ‘शंकर-जयकिशन’ आता अहिल्यानगरच्या रसिकांच्या भेटीला.

  • Written By: Published:
Untitled Design   2026 01 12T145500.660

‘Shankar-Jaikishan’ experiment in Ahilyanagar; Mahesh Manjrekar on stage after 29 years : मराठी रंगभूमीवर सध्या ज्या नाटकाची सर्वाधिक चर्चा आहे, ते विनोदी आणि हृदयस्पर्शी नाटक ‘शंकर-जयकिशन’ आता अहिल्यानगरच्या रसिकांच्या भेटीला येत आहे. रविवार, दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी रात्री 9:30वाजता यशवंतराव चव्हाण सहकार सभागृह, अहिल्यानगर येथे या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. या नाटकाची तिकीट विक्री सहकार सभागृह येथे चालू आहे.

वडील-मुलीचं गुंतागुंतीचं नातं, वर्षानुवर्षे दडलेली कटुता आणि अचानक जीवनात आलेल्या एका अनपेक्षित व्यक्तीमुळे बदलणारं समीकरण, असा या नाटकाचा अनोखा प्रवास आहे. कथानकात वडील आणि मुलीच्या नात्यात जेव्हा कोणी तिसरा येतो, तेव्हा काय घडतं? त्याच्या येण्यामागचं नेमकं कारण काय? की त्याच्या आयुष्यात काही गूढ रहस्य दडलंय? या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना या नाटकातून मिळणार आहेत.

या नाटकाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार, भरत जाधव आणि महेश मांजरेकर, पहिल्यांदाच रंगभूमीवर एकत्र काम करत आहेत. विशेष म्हणजे, महेश मांजरेकर तब्बल 29 वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन करत आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी हा सुवर्णयोग ठरेल. या नाटकाचे लेखन विराजस कुलकर्णी यांनी केले असून, दिग्दर्शन सुरज पारसनीस यांनी केले आहे. क्षितिज पटवर्धन यांच्या गीतांनी नटलेल्या या नाटकात भरत जाधव आणि महेश मांजरेकर यांच्यासोबत लोकप्रिय अभिनेत्री शिवानी रांगोळे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये ‘अबकी बार 100 पार’ हा नारा यशस्वी ठरेल, आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केला विश्वास

या प्रयोगाबद्दल बोलताना महेश मांजरेकर म्हणतात, “29 वर्षांनंतर रंगभूमीवर परत येणं ही माझ्यासाठी अत्यंत भावनिक गोष्ट आहे. नाटक हे माझ्यासाठी नेहमीच अग्रस्थानी राहिलं आहे. भरत हा एक प्रामाणिक आणि ऊर्जावान कलाकार आहे, आणि त्याच्यासोबत काम करण्याचा आनंद काही वेगळाच आहे. आमची अनुभवांची देवाणघेवाण रंगमंचावर एक वेगळाच रंग उमटवेल.” तर अभिनेते भरत जाधव म्हणतात, “महेशजी आणि माझी अनेक वर्षांची मैत्री आहे. आम्ही चित्रपटात एकत्र काम केले आहे, पण रंगमंचावर एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रेक्षकांप्रमाणेच आम्ही सुद्धा या क्षणासाठी तितकेच उत्सुक आहोत. आमची ही केमिस्ट्री रंगभूमीवर नक्कीच जादू निर्माण करेल.”

दिग्दर्शक सुरज पारसनीस यांच्या मते, “हे नाटक फक्त हसवणारं नाही तर नात्यांमधल्या अदृश्य धाग्यांना भिडणारं आहे. मैत्री आणि पित्याच्या नात्याची एक वेगळी बाजू यातून समोर येईल.” विनोद, भावना आणि नात्यांचे सुंदर मिश्रण असलेले ‘भरत जाधव एण्टरटेन्मेंट’ निर्मित हे नाटक पाहण्याची संधी अहिल्यानगरकरांनी दवडू नये.

 

शंकर-जयकिशन
तारीख: 18 जानेवारी 2026 (रविवार)
वेळ: रात्री 9:30 वाजता
स्थळ: यशवंतराव चव्हाण सहकार सभागृह, अहिल्यानगर
तिकीट मिळण्याचे ठिकाण: यशवंतराव चव्हाण सहकार सभागृह, अहिल्यानगर (सायं. 5 ते 8)
तिकीट दर: 1000, 700, 500

follow us