कथा अन् मांडणीची फाळणी – ‘बोजवारा ‘अहं बटवारा 1947

Batwara 1947 : फाळणी म्हणजे केवळ देशाची सीमा आखली जाण्याची गोष्ट नव्हे; ती लाखो माणसांच्या आयुष्यावर उमटलेली जखम आहे.

Batwara 1947

Batwara 1947 Reviews: दोन महिन्यांपूर्वी, इम्तियाज अली यांच्या Main Vaapas Aaunga या चित्रपटाने भारत-पाकिस्तान फाळणीच्या भयावहतेकडे अतिशय हळुवार आणि संवेदनशील नजरेने पाहिले होते. आता राजकुमार संतोषींचा Batwara 1947 याच विषयाला एका वेगळ्या दृष्टिकोनातून मांडण्याचा प्रयत्न करतो. वेगवेगळ्या धर्मांचे लोक एकमेकांच्या श्रद्धेला धोका न पोहोचवता एकत्र राहू शकतात. दुसऱ्याला त्याच्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार देणे म्हणजे स्वतःच्या धर्माला कमी लेखणे नव्हे. दुर्दैवाने, हा विचार पडद्यावर तितक्या प्रभावीपणे उतरवण्यात चित्रपट अपयशी ठरतो.

फाळणी म्हणजे केवळ देशाची सीमा आखली जाण्याची गोष्ट नव्हे; ती लाखो माणसांच्या आयुष्यावर उमटलेली जखम आहे. घरं तुटली, कुटुंबं दुभंगली, माणसं एका रात्रीत निर्वासित झाली आणि धर्माच्या नावावर माणुसकीचीच परीक्षा घेतली गेली. अशा विषयावर सिनेमा करणं म्हणजे केवळ इतिहास सांगणं नाही, तर त्या इतिहासामागच्या वेदनेला पडद्यावर पुन्हा जिवंत करणं. राजकुमार संतोषींचा ‘Batwara 1947’ हीच मोठी जबाबदारी स्वीकारतो; मात्र हा प्रयत्न अपेक्षित भावनिक उंची गाठताना वारंवार अडखळतो.

सनी देओलचा चेहरा पडद्यावर दिसला की प्रेक्षकांच्या मनात ‘गदर’चा तारा सिंग नकळत उभा राहतो. देश, माती, अन्याय आणि शत्रूविरुद्ध उभं राहणारा तो आक्रमक नायक ही सनी देओलची पडद्यावरील ओळख बनली आहे. त्यामुळे Batwara 1947 मध्ये तो फाळणीच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम व्यक्तीची भूमिका साकारतो, हीच कल्पना सुरुवातीला उत्सुकता निर्माण करते.

पण प्रश्न असा आहे… सनी देओलचा तोच आक्रमक नायक इथे माणुसकीचा आवाज बनतो का? उत्तर आहे…काही अंशी … अगदीच मर्यादित स्वरूपात “हो…” पण पूर्णपणे नाही… हे देखील तितकेच खरं आहे

फाळणीच्या जखमेपासून एका घरापर्यंतची गोष्ट

चित्रपटाची सुरुवात स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर होते. देश स्वतंत्र झाल्याचा आनंद साजरा होत असतानाच फाळणीची भीषण वास्तवता सिकंदर मिर्झाच्या आयुष्यात प्रवेश करते. सनी देओलने साकारलेला मिर्झा हा प्रामाणिक, साधा आणि कुटुंबवत्सल माणूस आहे. फाळणीच्या हिंसाचारामुळे त्याला आपलं घर सोडून पाकिस्तानात जावं लागतं. सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे त्याचा मुलगा मागे राहतो. इथे चित्रपट एका महत्त्वाच्या मुद्द्याला स्पर्श करतो…देशाची सीमा कागदावर आखली जाते; पण त्या सीमारेषेवर माणसांच्या भावना, नाती आणि आठवणींचे तुकडे पडतात. पाकिस्तानात पोहोचल्यानंतरही मिर्झासाठी संघर्ष संपत नाही. निर्वासित छावणीतून स्वतःचं घर मिळवण्याची धडपड सुरू होते. आणि याच संघर्षात त्याची भेट हबीबशी होते. अली फजलने साकारलेला हबीब हा शायर आहे. त्याच्या मदतीने मिर्झाला एक घर मिळतं. पण त्या घरात आधीपासून एक हिंदू वृद्ध महिला राहत असते—शबाना आझमींच्या वाट्याला आलेली ही व्यक्तिरेखा. आणि इथून सुरू होतो चित्रपटाचा सर्वात महत्त्वाचा प्रवास.

एक घर… आणि त्यात सामावलेला संपूर्ण भारत
मिर्झाच्या कुटुंबाला सुरुवातीला या वृद्ध हिंदू महिलेला घरातून बाहेर काढायचं असतं. तिची पूजा, तिची श्रद्धा आणि तिचं अस्तित्व त्यांना सुरुवातीला खटकतं. पण हळूहळू परिस्थिती बदलते. ज्याला कालपर्यंत ‘परकी’ समजलं जात होतं, तीच व्यक्ती कुटुंबाचा भाग बनते. इथे ‘घर’ ही केवळ लोकेशन राहत नाही; ते संपूर्ण भारताचं रूपक बनतं. एकाच घरात दोन धर्म राहू शकतात का? एकाचा दिवा आणि दुसऱ्याची नमाज एकाच छताखाली असू शकते का? एकमेकांच्या श्रद्धेचा आदर केला तर आपली श्रद्धा कमी होते का? Batwara 1947 या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतो. आणि खरं सांगायचं तर, पटकथेच्या पातळीवर हा विचार विलक्षण सुंदर आहे.

सनी देओल : ‘तारा सिंग’च्या सावलीतून बाहेर येणं कठीण
सनी देओलचा अभिनय या चित्रपटासाठी एकाच वेळी ताकद आणि मर्यादा ठरतो. त्याचा आवाज, देहबोली आणि संवादफेक आजही प्रभावी आहे. पडद्यावर तो उभा राहिला की एक प्रकारचं वजन निर्माण होतं. पण अडचण अशी की प्रेक्षकांच्या मनातून तारा सिंग सहज निघत नाही. ही व्यक्तिरेखा अधिक संयत अभिनयाची मागणी करत होती. मात्र चित्रपट पुन्हा पुन्हा सनी देओलच्या स्टारडमकडे वळतो.
एकटा नायक. समोर गुंडांची टोळी. दमदार संवाद आणि मग सनी देओलचा आक्रमक अवतार. म्हणजे कथा माणुसकीची असताना सादरीकरण पुन्हा एकदा ‘सनी देओल सिनेमॅटिक युनिव्हर्स’मध्ये जातं.

खलनायक की बॉलिवूडचा नेहमीचा खलनायक?
अभिमन्यू सिंगचा खलनायक प्रभाव निर्माण करण्याऐवजी अनेकदा कॅरिकेचर वाटतो. फाळणीच्या काळातील हिंसा, द्वेष आणि धार्मिक कट्टरता ही स्वतःमध्येच इतकी भयावह होती की त्यासाठी अतिरेकी खलनायकाची गरज नव्हती. पण चित्रपटातील खलनायक आणि त्याचे साथीदार काही वेळा इतके टिपिकल वाटतात की फाळणीचा इतिहास मागे पडतो आणि बॉलिवूडचा पारंपरिक ‘व्हिलन विरुद्ध हिरो’ फॉर्म्युला पुढे येतो. यामुळे कथानकाची गंभीरता काहीशी कमी होते.

अली फजल, प्रीती झिंटा आणि शबाना आझमी

अली फजलने हबीबच्या व्यक्तिरेखेला शायराचा अंदाज दिला आहे. मात्र त्याची व्यक्तिरेखा अनेकदा कथानकाला पुढे नेण्यासाठी वापरलेलं साधन वाटते. प्रीती झिंटाच्या व्यक्तिरेखेकडे भावनिक शक्यता मोठी आहे. मुलाच्या अनुपस्थितीची वेदना तिच्या व्यक्तिरेखेच्या केंद्रस्थानी आहे. पण त्या वेदनेची तीव्रता अभिनयातून पुरेशी पोहोचत नाही. आणि शबाना आझमी…इतक्या ताकदीच्या अभिनेत्रीला एका सतत दुःखी, वृद्ध महिलेच्या चौकटीत पाहणं काहीसं निराशाजनक ठरतं. त्यांच्या व्यक्तिरेखेची कथा ही चित्रपटाची भावनिक आत्मा बनू शकली असती. पण पटकथा आणि दिग्दर्शन त्या क्षमतेपर्यंत पोहोचत नाही.

काही संवाद ‘आजच्या काळातून’ थेट फाळणीच्या काळात आलेले वाटतात. प्रीती झिंटाच्या व्यक्तिरेखेची मुलगी देशाची फाळणी का झाली, असा प्रश्न विचारते. त्यावर येणारा संवाद…“आपल्या पप्पांना विचार, कारण हे सगळे निर्णय पुरुष आमच्याशी न विचारता घेतात.” हा संवाद आजच्या काळातील चर्चेचा भाग म्हणून योग्य वाटू शकतो. मात्र फाळणीच्या ऐतिहासिक संदर्भात तो काहीसा कृत्रिम वाटतो. अशा ठिकाणी पटकथा काळाच्या वातावरणातून बाहेर येते. सेट्सही सांगतात की, हा ‘काळ’ त्याने जगलेला नाही. फाळणीवरील सिनेमासाठी केवळ जुन्या कपड्यांचे कॉश्च्युम्स आणि सेट लावणे पुरेसे नसते.

त्या काळाचा गंध जाणवायला हवा…. किमान वास तरी…
छावणीतील गर्दी, निर्वासितांचे चेहरे, घर सोडण्याची असहायता, रस्त्यावरची भीती, नव्या देशात पोहोचल्यावरची अनिश्चितता…हे सगळं वातावरणातून जाणवायला हवं. Batwara 1947 मध्ये काही ठिकाणी सेट्स खूपच बनावटीचे दिसतात. त्यामुळे कथा ऐतिहासिक असली तरी जग मात्र कृत्रिम वाटतं आणि फाळणीसारख्या विषयासाठी ही मोठी उणीव आहे. प्रेक्षकाला आठवतं की, आपण 1947 मध्ये नाही, तर 2026 मधून लिहिलेला संवाद ऐकत आहोत.

लेखन उत्तम… पण सिनेमा कुठे हरवतो?
या चित्रपटाची सर्वात मोठी शोकांतिका कदाचित हीच आहे. ‘Batwara 1947’ ही कल्पना म्हणून चांगली फिल्म आहे. कथेचा आधार मजबूत आहे. मध्यवर्ती रूपक सुंदर आहे. संवादांमध्ये विचार आहेत. हिंदू-मुस्लिम सहजीवनाचा संदेश स्पष्ट आहे. धर्माच्या नावावर हिंसाचाराला विरोध आहे. माणुसकीला केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न आहे. मात्र सिनेमा हा केवळ विचारांचा संग्रह नसतो. तो भावना निर्माण करतो. प्रेक्षकाला पात्रांच्या वेदनेत घेऊन जातो. त्यांच्या आनंदात सहभागी करतो. त्यांच्या संघर्षाची धडधड स्वतःच्या छातीत जाणवू देतो.Batwara 1947 इथेच कमी पडतो. तो आपल्याला सतत सांगत राहतो की ‘ही गोष्ट भावनिक आहे’. पण आपल्याला ती भावनिक वाटत नाही.फाळणीवर सिनेमा बनवताना दोन टोकांपासून सावध राहावं लागतं… इतिहासाला केवळ राजकीय विधान बनवण्यापासून आणि त्याला केवळ मेलोड्रामा बनवण्यापासून.

Batwara 1947 या दोन्हींच्यामध्ये उभा राहण्याचा प्रयत्न करतो. त्याचा हेतू प्रामाणिक आहे आणि त्याचा संदेश आजच्या काळात निश्चितच महत्त्वाचा आहे. पण चांगला संदेश म्हणजे आपोआप चांगला सिनेमा होत नाही. सनी देओलचा ‘ढाई किलो का हाथ’ आजही पडदा हलवू शकतो; पण फाळणीची खरी ताकद मुठीत नसते…ती माणसाच्या तुटलेल्या हृदयात असते. आणि Batwara 1947 त्या हृदयापर्यंत पोहोचण्याआधीच थांबतो…
रेटिंग : ⭐⭐/5
अमित भंडारी, चित्रपट समीक्षक

का पाहावा ? सनी देओल आणि राजकुमार संतोषी यांच्या कॉम्बिनेश साठी

का टाळावा – उत्तम कथेतील आशय हरवतो… कथेपेक्षा नायकाला मोठं केलं जातं म्हणून

थोडक्यात काय -सनी देओलचा ‘ढाई किलो का हाथ’ फाळणीची वेदना पेलू शकत नाही… आशय मोठा, पण पडद्यावर परिणाम फिका

follow us