चेक बाऊन्स प्रकरणात अभिनेता राजपाल यादवला मोठा धक्का; तिहार तुरुंगात शरण जाणार
न्यायालयाच्या आदेशानंतर यादव यांनी आजच तिहार तुरुंगात शरण जाणार असल्याचे जाहीर केले. प्रकरणाची सुनावणी आज न्यायालयात झाली.
Big shock for actor Rajpal Yadav : दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव यांचा चेक बाऊन्स प्रकरणात तुरुंगवास टाळण्यासाठी केलेला अखेरचा प्रयत्न फेटाळून लावला. न्यायालयाच्या आदेशानंतर यादव यांनी आजच तिहार तुरुंगात शरण जाणार असल्याचे जाहीर केले. या प्रकरणाची सुनावणी आज न्यायालयात झाली असून राजपाल यादव स्वतः उपस्थित होते. त्यांच्यावतीने ज्येष्ठ वकील अभिजीत यांनी युक्तिवाद करत सांगितले की, आजच 25 लाखांची रक्कम अदा केली जाईल तसेच उर्वरित रकमेच्या परतफेडीसाठी दोन्ही पक्षांमध्ये तात्पुरता परतफेडीचा आराखडा ठरलेला आहे.
मात्र न्यायमूर्ती स्वरणा कांता शर्मा यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, यादव यांनी कालच (बुधवारी) शरण जायला हवे होते. त्यामुळे ते तुरुंगात शरण गेल्यानंतरच त्यांची कोणतीही अर्जविनंती ऐकून घेतली जाईल. यानंतर यादव यांचे वकील अभिजीत यांनी न्यायालयाला कळवले की, राजपाल यादव आजच तिहार तुरुंगात शरण जातील. न्यायालयाने स्पष्ट केले की, शरण गेल्यानंतरच ते पुढील अर्ज दाखल करू शकतात. आपल्या आदेशात न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, जे लोक कायद्याचा आदर करत नाहीत, त्यांनी कायद्याकडून कोणतीही सवलत अपेक्षित ठेवू नये. कायदा हा त्याचे पालन करणाऱ्यांना बक्षीस देतो, अवहेलना करणाऱ्यांना नाही.
न्यायमूर्ती शर्मा म्हणाल्या, ‘कायद्याच्या आदेशांकडे सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या व्यक्तीस वारंवार सवलत देणे म्हणजे समाजाला असा संदेश देणे ठरेल की, न्यायालयाचे आदेश पुन्हा पुन्हा धुडकावून लावले तरी शिक्षा होत नाही. न्यायालय असा संदेश जाऊ देऊ शकत नाही.’ न्यायालयाने हेही स्पष्ट केले की, कोणत्याही व्यक्तीस केवळ तिच्या पार्श्वभूमीमुळे किंवा ती एखाद्या विशिष्ट उद्योगाशी संबंधित असल्यामुळे विशेष वागणूक दिली जाऊ शकत नाही.
अजितदादांच्या मनात काय होते, हे मी 9 फेब्रुवारी नंतर बोलेन; रोहित पवारांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
याआधी 2 फेब्रुवारी रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने यादव यांना दोन दिवसांत तुरुंग अधिकाऱ्यांसमोर शरण जाण्याचे आदेश दिले होते, कारण त्यांनी तक्रारदाराला देय असलेली रक्कम अदा केलेली नव्हती. मात्र 4 फेब्रुवारी रोजी यादव यांनी मुदतवाढीची विनंती केली होती, जी न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाने स्पष्ट केले होते की, यादव यांनी न्यायालयाला दिलेल्या कोणत्याही आश्वासनांचे पालन न केल्यामुळेच शरण जाण्याचा आदेश देण्यात आला.
मे 2024 मध्ये सत्र न्यायालयाने राजपाल यादव यांना चेक बाऊन्स प्रकरणात दोषी ठरवून सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. मात्र नंतर उच्च न्यायालयाने, यादव हे उत्पादन कंपनीसोबत वाद सामोपचाराने मिटवतील या त्यांच्या वकिलांच्या आश्वासनावर शिक्षा तात्पुरती स्थगित केली होती. मात्र यादव हे आश्वासन पूर्ण करण्यात अपयशी ठरले. 2 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने यादव यांचे ‘डिमांड ड्राफ्टमध्ये चुकून त्रुटी झाल्यामुळे पैसे भरता आले नाहीत’ हे स्पष्टीकरणही फेटाळले, कारण ती चूक दुरुस्त करण्यासाठी त्यांनी कोणतीही पावले उचलली नव्हती.
यादव यांनी याआधी 2.5 कोटींची रक्कम दोन हप्त्यांत भरण्याची विनंती केली होती. 40 लाख 16 डिसेंबर 2025 पर्यंत आणि उर्वरित 2.1 कोटी 15 जानेवारीपर्यंत. मात्र आजतागायत त्यांनी दिलेल्या कोणत्याही आश्वासनानुसार पैसे भरलेले नसल्याचे न्यायालयाने नोंदवले. न्यायालयाने यादव यांच्या वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की, त्यांनी सतत पैसे भरण्याचे व समझोता करण्याचे आश्वासन देत वारंवार तहकूब मागितली. या प्रकरणात तक्रारदार Murli Projects Private Limited यांच्यावतीने अॅडव्होकेट अवनीत सिंग सिक्का यांनी बाजू मांडली.
