समीक्षकांची पसंती आणि प्रेक्षकांचे अलोट प्रेम; ‘बोक्या सातबंडे 2.0’ सेलिब्रिटी कलाकारांसह रंगभूमीवर परततोय!
Bokya Satbande 2.0-या नाटकाचे लेखन डॉ. निलेश माने यांनी केले आहे. दिग्दर्शन विक्रम पाटील आणि दिप्ती जोशी यांनी केले आहे.
Bokya Satbande 2.0 : मराठी रंगभूमीवरील दर्जेदार आणि लोकप्रिय बालनाट्य म्हणून ओळख निर्माण केलेले ‘बोक्या सातबंडे’ (
Bokya Satbande 2.0) आता नव्या उर्जेसह आणि नव्या स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेल्या चार वर्षांत ९० हून अधिक यशस्वी प्रयोग करत या नाटकाने केवळ प्रेक्षकांचे प्रेमच मिळवले नाही, तर नामवंत समीक्षकांचीही भरभरून दाद मिळवली आहे. या सकारात्मक प्रतिसादामुळे हे नाटक घराघरांत पोहोचले असून सर्व वयोगटातील प्रेक्षकांमध्ये त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांना दर्जेदार आणि मनोरंजक अनुभव देण्याचा प्रयत्न या नव्या सत्रातून केला जाणार आहे. या नाटकाचा वारसा ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या पात्रावर आधारित आहे. महाराष्ट्रासह बेंगळुरू आणि मध्य प्रदेशातही या नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत ९० हून अधिक प्रयोग यशस्वीरीत्या पार पडले आहेत. मिलाप थिएटर टुगेदर निर्मित या नाटकाचे उन्हाळी सुट्टीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात मर्यादित प्रयोग सादर केले जाणार आहेत.
या नाटकाचे लेखन डॉ. निलेश माने यांनी केले आहे. दिग्दर्शन विक्रम पाटील आणि दिप्ती जोशी यांनी केले आहे. नाटकाला संगीत निनाद म्हैसाळकर यांनी दिले असून नेपथ्याची जबाबदारी संदेश बेंद्रे यांनी सांभाळली आहे. प्रकाश योजना राहूल जोगळेकर यांनी केली आहे. वेशभूषा महेश शेरला यांनी साकारली आहे. तसेच नृत्य दिग्दर्शन संतोष भांगरे यांनी केले आहे.
बोक्या सातबंडे 2.0 (Session 4) या नाटकात आरूष बेडेकर, यश शिंदे, सिद्धा आंधळे, आकाश मांजरे, प्रफुल्ल कर्णे, सागर पवार आणि शिवांश जोशी हे कलाकार भूमिका साकारत आहेत. विशेष म्हणजे, या नव्या सत्रात प्रेक्षकांसाठी एक खास ‘सरप्राईज सेलिब्रिटी पॅकेज’ देखील असणार आहे. या सेलिब्रिटी कलाकारांची नावे सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आली असून, योग्य वेळी त्यांचा भव्य खुलासा करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे.
मुलांपासून ते आजी
-आजोबांपर्यंत सर्वांना आपलंसं करणाऱ्या ‘बोक्या’च्या या नव्या प्रवासात सहभागी होण्यासाठी रसिक प्रेक्षक उत्सुक आहेत. समीक्षकांनी गौरवलेले हे नाटक आता नव्या कलाकारांसह पाहणे ही सुट्टीतील एक खास मेजवानी ठरणार आहे.