फतवा Review : जातीय भेदभावातील वास्तव अधोरेखित करणारी प्रेम कहाणी

फतवा Review : जातीय भेदभावातील वास्तव अधोरेखित करणारी प्रेम कहाणी

मुंबई : एखादी गोष्ट नामंजूर असेल की त्या विरोधात फतवा काढून निषेध नोंदवला जातो. ‘फतवा’ हेच शिर्षक असलेला मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. एक हटके प्रेम कहाणी या चित्रपटात पाहायला मिळतेय. निया आणि रवी यांच्या प्रेमाची ही अनोखी गोष्ट आहे.

प्रतिक गौतम आणि श्रद्धा कदम ही जोडी या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर समोर आलीय. मुख्य म्हणजे प्रतिक गौतमनेच या चित्रपटाच्या लेखन – दिग्दर्शनाची जबाबदारी देखील पार पाडलीय.
रवी हा एका छोट्याश्या गावात हलाखीचं जीवन जगणाऱ्या गरीब कुटुंबातील हुशार आणि मेहनती मुलगा आहे. तर दुसरीकडे निया ही गावातील उच्च जातीच्या राजकारण्याची मुलगी आहे. ज्या गावात जातीभेत खोलात रुजलाय त्या गावात या दोन वेगळ्या जातीच्या रवी आणि निया यांच्यात प्रेम होतं.

कॉलेजात शिक्षण घेत असताना निया रवीच्या प्रेमात आकंठ बुडालीय. तर दुसरीकडे रवीलाही निया आवडते मात्र जातीभेद असल्यामुळे रवी त्याचं प्रेम व्यक्त करत नाही. मात्र नियाचं रवीवर असलेलं जिवापाड प्रेम पाहुन तो त्याचं प्रेमही व्यक्त करतो. दोघांच्या आयुष्यात आलेले हे प्रेमाचे क्षण फार काळ टिकत नाही. त्यांच्यात जातीभेदामुळे निर्माण झालेला दुरावा आणि त्यातून चित्रपटाच्या कथेला मिळालेलं वेगळं वळण समोर येतं.

प्रतिकने या चित्रपटात अभिनयासह दिग्दर्शनाची धुराही सांभाळली आहे. दोन्ही बाजूंमधील समतोल राखण्याचा प्रयत्न त्याने केलाय. पटकथेतील त्रुटींमुळे मात्र गोंधळ निर्माण होतो. पटकथेतील सलगता हरवलेली जाणवते. या चित्रपटात उत्तम कलाकारांची फळी पाहायला मिळते. प्रतिकने रवी या पात्रातील सहजता शेवटपर्यंत कायम ठेवलीय. क्लायमॅक्स सीनमधील त्याचं काम विशेष लक्ष वेधतय. अभिनेत्री श्रद्धा भगत ही नियाच्या भूमिकेत झळकतेय. पहिल्याच चित्रपटात अभिनयाची तयारी कमी पडल्याचं जाणवतय. तिच्या भूमिकेला अनेक सीन्समध्ये सादरीकरणात वाव होता.

अभिनेत्री छाया कदम यांनी साकारलेली आईसाहेब मात्र भाव खाऊन जातात. आईसाहेबांच्या पात्रातील नकारात्मकता, छळ-कपटी स्वभाव आणि त्यातील बारकावे त्यांनी उत्तम सादर केले आहेत. ही भूमिका त्यांनी चोख बजावली आहे. रवीच्या वडिलांच्या भूमिकेतील सदू गरीबीमुळे ग्रासलेत, तरी आपल्या कुटुंबाला समजून घेणाऱ्या वडिलांचं पात्र त्यांनी उत्तम निभावलय.

अभिनेते नागेश भोसले यांनी अण्णासाहेब या पात्रातील विविध पैलू सहजततेने सादर करत त्या पात्राला छान अधोरेखित केलय. तर पूनम कांबळे, अमोल चौधरी, संजय खापरे, निलेश वैरागर, निखिल निकाळजे, निकिता संजय या कलाकारांचंही काम चांगलं झालय. चित्रपटाची तांत्रिक बाजू मजबुत असल्याचं जाणवतं. दिलशाद व्ही. ए. यांच्या छायांकनाचं विशेष कौतुक. चित्रपटाच्या कथेला न्याय देत प्रयोगशील छायांकन त्यांनी केलय.

चित्रपटातील अनेक सीन त्यांनी छायांकनातून खुलवलेत. तर फैजल महाडिक, इमरान महाडिक यांचं संकलनही चांगलय. बाबा चव्हाण, संजीव–दर्शन, प्रतीक गौतम,प्रवीण पगारे,सिद्धार्थ पवार, आराफत मेहमूद यांचं संगीतही लक्षवेधी आहे. हा चित्रपट कुठे कमी पडलाय ? तर चित्रपटाची पटकथा आणि त्यांचं सादरीकरण खटकतय. चित्रपटातील संवादही प्रभावी वाटत नाहीत. चित्रपटाच्या मुळ विषयापर्यंतची सलगता कमजोर वाटते. समाजातील जातीय भेदभावातील वास्तव अधोरेखित करत हा चित्रपट हटके कथा आणि ट्विस्ट घेऊन येतो.

रेटिंग – 2.5 स्टार्स
प्रेरणा जंगम, चित्रपट समिक्षक

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज