‘घबाडकुंड’ : शोध मनाचा अन् धनाचा…

Ghabadkund -लेखक संजय नवगिरे आणि अक्षय धरमपाल यांनी उभं केलेलं कथाविश्व नक्कीच उत्सुकता निर्माण करतं.

Ghabadkund

Ghabadkund Movie Review : मराठी चित्रपटसृष्टीत भयपटांचा इतिहास फार मोठा नसला, तरी गेल्या काही वर्षांत या प्रकारात वेगळे प्रयोग करण्याचं धाडस काही दिग्दर्शकांनी दाखवलं आहे. त्या मालिकेत आता दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील यांचा ‘घबाडकुंड’ (Ghabadkund) हा चित्रपट महत्त्वाचा ठरतो. ‘अल्याड पल्याड’नंतर त्याच विश्वाचा विस्तार करत मराठीत पहिलं हॉरर सिनेमॅटिक युनिव्हर्स उभं करण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. ही कल्पना नक्कीच स्वागतार्ह आहे. मात्र केवळ महत्त्वाकांक्षी कल्पना पुरेशी नसते; तिच्या पाठीशी तितकीच सशक्त पटकथा, मांडणीची वीण ही तितकीच घट्ट आणि बहुपेढी असणं आवश्यक आहे. त्यातून उभा राहणारा थरार त्याचा परिणाम साकल्याने उभा राहणं गरजेचं असतं. नेमकं इथेच ‘घबाडकुंड’ काहीसं उणं पडतं…


लोककथा, लोभ अन् गूढता

एका दुर्गम गावातील शापित विहीर… त्या विहिरीत दडलेलं अफाट धन… आणि त्या धनाचं रक्षण करणारी एक गूढ स्त्री. या लोककथेभोवती ‘घबाडकुंड’ची कथा आकार घेते. गावात अशी दंतकथा आहे की, त्या विहिरीतून एका स्त्रीची हाक ऐकू आली आणि कोणी तिला प्रतिसाद दिला, तर तो पुन्हा कधीच परत येत नाही. मात्र हा आवाज प्रत्येकालाच ऐकू येत नाही. योगायोगाने शेतकरी दिल्या (संदीप पाठक) या विहिरीपर्यंत पोहोचतो आणि त्याला ती रहस्यमय हाक ऐकू येते. दुसरीकडे अनेक वर्षांपासून त्या विहिरीतील धन मिळवण्याच्या प्रयत्नात असलेली काही लोभी माणसं दिल्याला त्या कुंडात उतरवण्याचा डाव आखतात.
यानंतर सुरू होतो धनाच्या हव्यासाचा, अंधश्रद्धेचा आणि अलौकिक शक्तींचा भयावह प्रवास.


कल्पना दमदार… पण पटकथा अन् मांडणी विस्कळीत

लेखक संजय नवगिरे आणि अक्षय धरमपाल यांनी उभं केलेलं कथाविश्व नक्कीच उत्सुकता निर्माण करतं. चित्रपटाची सुरुवात प्रेक्षकांना गूढ वातावरणात सहजपणे घेऊन जाते. प्रत्येक प्रसंगामागे काहीतरी रहस्य दडलं असल्याची भावना कायम राहते. परंतु ही उत्सुकता पुढे टिकवून ठेवण्यात पटकथा अपयशी ठरते. पहिल्या अर्ध्यात कथा संथ गतीने पुढे सरकते, तर उत्तरार्धात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घाईघाईने उलगडल्या जातात. परिणामी पात्रांची मानसिकता, त्यांच्या निर्णयामागचं कारण आणि कथेतल्या अनेक प्रश्नांची उत्तरं अपुरीच राहतात. चित्रपट भय निर्माण करण्याचा प्रयत्न करतो; पण अनेक प्रसंगांत भीतीपेक्षा पुढे काय होणार याची केवळ उत्सुकताच अधिक जाणवते.

‘अल्याड पल्याड’च्या विश्वाचा विस्तार
‘घबाडकुंड’ची एक जमेची बाजू म्हणजे *’अल्याड पल्याड’*मधील ‘दिल्या’ या पात्राची पुनरागमन. त्यामुळे दोन चित्रपटांमध्ये एक नैसर्गिक दुवा तयार होतो. मराठीत सिनेमॅटिक युनिव्हर्सची संकल्पना रुजवण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र युनिव्हर्स तयार करण्याच्या नादात स्वतंत्र चित्रपट म्हणून आवश्यक असलेली भावनिक आणि नाट्यमय ताकद काहीशी कमी पडते.

अभिनय हा चित्रपटाचा मजबूत आधार

संदीप पाठक यांनी दिल्याच्या भूमिकेला पुन्हा एकदा सहजतेची किनार दिली आहे. भीती, संभ्रम आणि असहाय्यता त्यांनी प्रभावीपणे व्यक्त केलीय. देवदत्त नागे यांची पडद्यावरील उपस्थिती प्रभावी आहे. त्यांच्या व्यक्तिरेखेत गूढतेची छटा जाणवते; मात्र लेखनाने त्यांना पुरेशी साथ दिलेली नाही.

शशांक शेंडे, स्मिता पायगुडे अंजुटे, प्राजक्ता हनमघर आणि कुशल बद्रिके यांनी आपल्या भूमिका प्रामाणिकपणे साकारल्या आहेत. विशेषतः कुशल बद्रिके गंभीर वातावरणात हलकाफुलका विरंगुळा देतो. विहिरीच्या आत उभारलेला विशाल सेट, गुहेसारखी रचना, जुन्या मूर्ती, वेली, अंधार आणि धुक्याचं वातावरण हे सर्व चित्रपटाला वेगळा माहोल निर्माण करतात. चित्रपटात इतक्या मोठ्या प्रमाणावर उभारलेलं हे दृश्यविश्व निश्चितच उल्लेखनीय म्हणावं लागेल.

योगेश कोळी यांचं छायांकन वातावरणनिर्मितीत मोठी भूमिका बजावतं. प्रकाश आणि सावल्यांचा खेळ अधिक प्रभावी होऊ शकला असता…
ध्वनीसंकलन आणि पार्श्वसंगीत चित्रपटाला आवश्यक असलेला थरार निर्माण करतात.. ही जमेची बाजू आहे. अनेक दृश्यांमध्ये ध्वनी हा कॅमेऱ्यापेक्षाही अधिक परिणामकारक ठरतो.


व्हीएफएक्सचा कृत्रिमपणा खटकतो

चित्रपटाचा सर्वात कमकुवत भाग म्हणजे काही ठिकाणी वापरण्यात आलेले व्हीएफएक्स आणि कॉम्प्युटर ग्राफिक्स इमेजेस. ज्या प्रसंगांमध्ये प्रेक्षकांनी सर्वाधिक दचकायला हवं होतं, तिथे दृश्यपरिणाम कृत्रिम वाटतात. त्यामुळे भयाचा अपेक्षित परिणाम कमी होतो आणि चित्रपटाने उभं केलेलं रहस्यमय विश्व पूर्ण ताकदीने खुलत नाही…’घबाडकुंड’ हा परिपूर्ण भयपट नाही. पण तो मराठी चित्रपटसृष्टीला एका नव्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे.

लोककथा, मानवी लोभ, अंधश्रद्धा आणि अलौकिक शक्ती यांचा संगम घडवताना दिग्दर्शकाची महत्त्वाकांक्षा स्पष्ट दिसते. मात्र पटकथा अधिक सशक्त आणि तर्कशुद्ध असती, तर हा चित्रपट मराठीतील सर्वोत्तम भयपटांपैकी एक ठरला असता. तरीही वेगळा प्रयत्न म्हणून या प्रयत्नांच्या पाठीशी उभ राहण्यासाठी एकदा हा सिनेमा पाहायला हवा.

या चित्रपटाला मी देतो तीन स्टार.
अमित भंडारी, चित्रपट समीक्षक

का पाहावा ? विषयातील वैविध्य, वातावरणनिर्मिती, प्रभावी पार्श्वसंगीत ‘घबाडकुंड’

का टाळावा ? पटकथेतील त्रुटी, व्हीएफएक्समधील कृत्रिमपणा

थोडक्यात काय?
मराठीत हॉरर सिनेमॅटिक युनिव्हर्सची दमदार सुरुवात करण्याचा प्रयत्न…पण पटकथा आणि मांडणीचं घबाड हरवलेलं कुंड.

प्रस्तुती -आयकॉन दी स्टाईल’
निर्माते -डॉ. रसिक कदम
दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटील
लेखन – संजय नवगिरे,अक्षय धरमपाल
छायांकन – योगेश कोळी
संकलन- सौमित्र धाराशिवकर , तितिक्षा बागुल
बॅकग्राउंड म्युझिक – अभिनय जगताप
कलाकार :-
संदिप पाठक
देवदत्त नागे
शशांक शेंडे
स्मिता पायगुडे अंजुटे
कुशल बद्रिके
प्राजक्ता हनमघर
प्रविण डाळींबकर

रेटिंग : ★★★☆☆ (3/5)

follow us