Ghabadkund : रुपेरी पडद्यावरच्या यशानंतर ‘घबाडकुंड’ आता अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर!
Ghabadkund : मराठी प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि बॉक्स ऑफिसवरील यशामुळे चर्चेत आलेला निर्माते व आयकॉन डी स्टाईलचे संस्थापक
Ghabadkund : मराठी प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि बॉक्स ऑफिसवरील यशामुळे चर्चेत आलेला निर्माते व आयकॉन डी स्टाईलचे संस्थापक डॉ. रसिक कदम दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील यांचा ‘घबाडकुंड’ हा बहुचर्चित मराठी चित्रपट आता अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला हा रहस्यमय, थरारक आणि भव्य सिनेमॅटिक अनुभव आता महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून देशभरातील तसेच जगभरातील प्रेक्षकांना घरबसल्या अनुभवता येणार आहे.
‘द फर्स्ट मराठी युनिव्हर्स’ या महत्त्वाकांक्षी संकल्पनेचा पहिला अध्याय असलेल्या ‘घबाडकुंड’ने मराठी सिनेमाला सस्पेन्स, हॉरर, अॅक्शन, ट्रेझर हंट आणि व्हीएफएक्स यांचा अनोखा मिलाफ असलेला भव्य सिनेमॅटिक अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाबद्दल निर्माते व आयकॉन डी स्टाईलचे संस्थापक डॉ. रसिक कदम म्हणाले, ‘घबाडकुंड’ हा आमच्यासाठी केवळ एक चित्रपट नव्हता तो एका मोठ्या विश्वाची सुरुवात होती. थिएटरमध्ये प्रेक्षकांनी दिलेले प्रेम आणि प्रतिसाद आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि प्रेरणादायी ठरला. आता अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या माध्यमातून हा चित्रपट महाराष्ट्राच्या पलीकडे देशभरातील आणि जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे, याचा आम्हाला विशेष आनंद आहे. ‘घबाडकुंड’चा हा प्रवास इथे संपत नाही, तर एका मोठ्या मराठी सिनेमॅटिक युनिव्हर्सची खरी सुरुवात इथून होत आहे.’
चित्रपटाचे दिग्दर्शक प्रीतम पाटील यांनी सांगितले, ‘घबाडकुंड’ करताना मराठी प्रेक्षकांसाठी एक वेगळ्या धाटणीचा, मोठ्या पडद्यावर अनुभवता येईल असा थरारक सिनेमा निर्माण करण्याचे आमचे स्वप्न होते. थिएटरमध्ये प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद आमच्यासाठी खूप खास होता. आता ओटीटीच्या माध्यमातून हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असल्याने त्या प्रवासाला आणखी मोठी व्याप्ती मिळत आहे. ‘घबाडकुंड’च्या कथेत दडलेली रहस्ये आणि या विश्वाची कल्पना अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी, हीच आमची इच्छा आहे. पुढील अध्यायांसाठीही प्रेक्षकांनी अशीच साथ द्यावी, अशी अपेक्षा आहे.”
ओटीटी प्रदर्शनामुळे ‘घबाडकुंड’ महाराष्ट्राबाहेरील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील मराठी आणि भारतीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. मराठी चित्रपटांच्या कथा आणि प्रयोगशील सिनेमॅटिक विश्वाला जागतिक प्रेक्षकवर्ग मिळवून देण्याच्या दृष्टीने हे प्रदर्शन महत्त्वाचे मानले जात आहे. चित्रपटात शशांक शेंडे, संदीप पाठक, देवदत्त नागे, कुशल बद्रिके, प्राजक्ता हनमघर, स्मिता पायगुडे-अंजुटे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर, योगेश प्रकाश तनपुरे, साहिल अनलदेवर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘घबाडकुंड’ ही केवळ एका चित्रपटाची कथा नसून ‘द फर्स्ट मराठी युनिव्हर्स’ या महत्त्वाकांक्षी सिनेमॅटिक विश्वाची सुरुवात आहे. या विश्वाच्या पुढील अध्यायांमध्ये नवीन पात्रे, नवी रहस्ये, अनपेक्षित ट्विस्ट आणि आणखी व्यापक पातळीवर उलगडणाऱ्या कथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.