IFFI 2026: ‘रामायण’पासून ‘धुरंधर’पर्यंत… गोव्यात रंगणार आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव; काय आहे यंदाचं खास आकर्षण?

IFFI 2026; गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबरदरम्यान 57 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI 2026) रंगणार आहे.

IFFI 2026 Goa International Film Festival

IFFI 2026 Goa International Film Festival: गोव्यात पुन्हा एकदा जागतिक चित्रपटांचा महोत्सव रंगणार आहे. 57 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI 2026) 20 ते 28 नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात जगभरातील 86 देशांतील 150 हून अधिक चित्रपट दाखवले जाणार आहेत. विशेष म्हणजे, यंदा 137 देशांमधून 1,900 हून अधिक चित्रपटांच्या प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या महोत्सवात आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मोठी मेजवानी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

रिंकू राजगुरूच्या नजरेतून दिसणार स्त्रीच्या संघर्षाची नवी कहाणी! झी स्टुडिओजच्या ‘जिजाई’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित!

‘स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स’ यंदाची संकल्पना

यंदाच्या महोत्सवाची ‘स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स’ म्हणजेच ‘सीमा नसलेल्या कथा’ अशी संकल्पना आहे. भाषा, देश आणि संस्कृती वेगवेगळी असली तरी चित्रपटांच्या माध्यमातून माणसांच्या भावना एकमेकांपर्यंत पोहोचतात, हा या संकल्पनेमागचा विचार आहे, असे महोत्सवाचे संचालक आशुतोष गोवारीकर यांनी सांगितले.

 

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत महोत्सवाची माहिती देणारी पत्रकार परिषद पार पडली. यावेळी महोत्सवाच्या तयारीचा आणि कार्यक्रमांचा आढावा सादर करण्यात आला. चित्रपट प्रदर्शनाची ठिकाणे, वाहतूक आणि प्रेक्षकांसाठीच्या सुविधांची तयारी पूर्ण करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.

कोणता चित्रपट महोत्सवाची सुरुवात करणार?

पोलंडचे दिग्दर्शक पावेल पावलीकोव्स्की यांच्या ‘फादरलँड’ या चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात होणार आहे. युद्धानंतरच्या जर्मनीतील परिस्थिती आणि नोबेल पुरस्कार विजेते थॉमस मान यांच्या प्रवासाची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

तर अलिना शेरबान दिग्दर्शित ‘आय मॅटर’ हा मध्य-महोत्सवी चित्रपट म्हणून दाखवला जाणार आहे. अँथनी चेन दिग्दर्शित ‘वी आर ऑल स्ट्रेंजर्स’ या चित्रपटाने महोत्सवाचा समारोप होईल.

स्पेनला सन्मान, रशिया भागीदार देश

यंदाच्या महोत्सवात स्पेनला ‘सन्माननीय देश’ म्हणून स्थान देण्यात आले आहे. स्पेनचे चार चित्रपट महोत्सवात दाखवले जाणार आहेत. तर रशियाला ‘भागीदार देश’ म्हणून निवडण्यात आले असून, रशियन चित्रपटसृष्टीतील चार चित्रपट प्रदर्शित केले जातील.

‘भारतातून जगभर’: ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर 1,000 कोटींची ऐतिहासिक कमाई; निर्मात्यांकडून तीन नवे पोस्टर्स प्रदर्शित

याशिवाय यंदा दोन नवीन विभाग सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये अ‍ॅनिमेशन चित्रपट आणि चित्रपट निर्मितीची कला व तंत्र समजून देणाऱ्या ‘फिल्म्स अबाऊट फिल्म्स’ या विभागाचा समावेश आहे.

‘इंडियन पॅनोरमा’मध्ये 76 चित्रपट

भारतीय चित्रपटांसाठी असलेल्या ‘इंडियन पॅनोरमा’ विभागात 18 भाषांमधील 76 चित्रपट दाखवले जाणार आहेत. हिंदी चित्रपट ‘धुरंधर’ आणि लडाखी भाषेतील ‘बिकमिंग’ या चित्रपटांनी या विभागाची सुरुवात होईल.

याशिवाय ब्रिक्स देशांमधील चित्रपटांसाठी विशेष विभाग असणार आहे. या विभागाची सुरुवात भारताच्या ‘रामायण’ चित्रपटाने होणार आहे. ब्रिक्समधील सर्व 11 सदस्य देशांचे चित्रपट यामध्ये दाखवले जातील.

नवोदित आणि महिला चित्रपट निर्मात्यांनाही संधी

यंदाच्या महोत्सवात 52 महिला चित्रपट निर्मात्या आणि 62 नवोदित चित्रपट निर्माते सहभागी होणार आहेत. नवीन कलाकार आणि दिग्दर्शकांना जागतिक स्तरावर आपली कला दाखवण्याची संधी मिळणार आहे.

‘चिकीझिंग’ स्वप्नाळू चिक्याची भावविश्वाला स्पर्श करणारी गोष्ट, 19 नोव्हेंबरला चित्रपटगृहांत रंगणार बालपणाचा उत्सव

तसेच ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो’ या उपक्रमात 100 तरुण प्रतिभावंत सहभागी होतील. त्यांच्यासाठी कार्यशाळा, मार्गदर्शन सत्रे आणि 48 तासांत चित्रपट तयार करण्याचे आव्हान आयोजित करण्यात येणार आहे.

गोव्यातील चार ठिकाणी चित्रपटांचे प्रदर्शन

हा महोत्सव 9 दिवस चालणार असून, गोव्यातील 4 ठिकाणच्या 13 चित्रपटगृहांमध्ये चित्रपट दाखवले जातील. पणजी, पर्वरी, मडगाव आणि फोंडा येथे चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. या चित्रपटगृहांमध्ये 4,000 हून अधिक प्रेक्षकांची आसनक्षमता आहे.

याशिवाय ज्येष्ठ चित्रपट निर्माते, अभिनेते आणि संगीतकारांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. त्यामुळे यंदाचा इफ्फी महोत्सव भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा संगम ठरणार आहे.

 

 

follow us