मराठी ‘गोंधळ’ची ऑस्करवारी; 99व्या अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका

Gondhal Oscar Entry : गोंधळ’च्या या निवडीमुळं तब्बल 11 वर्षांनंतर मराठी चित्रपटाला भारताचं ऑस्करमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 18T164450.358

Gondhal Oscar Entry : मराठी चित्रपट ‘गोंधळ’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी झेप घेतली आहे. 99व्या अकादमी पुरस्कारांसाठी ‘गोंधळ’ची भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड करण्यात आली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने 33 चित्रपटांमधून ‘गोंधळ’ची निवड केली. ग्रामीण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन संतोष डावखर यांनी केलं आहे.

‘गोंधळ’च्या या निवडीमुळं तब्बल 11 वर्षांनंतर मराठी चित्रपटाला भारताचं ऑस्करमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. यापूर्वी 2015 मध्ये ‘कोर्ट’ हा मराठी चित्रपट भारताची अधिकृत प्रवेशिका ठरला होता. त्यामुळे ‘गोंधळ’ची निवड हा मराठी चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

महाराष्ट्राच्या पारंपरिक गोंधळ लोकपरंपरेभोवती चित्रपटाचं कथानक आकार घेतं. परंपरा, वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि मानवी भावविश्व यांच्यातील संघर्षाचं चित्रण चित्रपटातून करण्यात आलं आहे. किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर यांच्यासह कलाकारांनी यात भूमिका साकारल्या आहेत.

FIPRESCI-India च्या टॉप-10 भारतीय चित्रपटांमध्ये ‘गोंधळ’ आणि ‘साबर बोंड’; मराठी सिनेमाचा राष्ट्रीय स्तरावर पुन्हा डंका

प्रदर्शनापूर्वीच ‘गोंधळ’ने चित्रपट महोत्सवांमध्ये आपली छाप उमटवली होती. 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात संतोष डावखर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ‘सिल्व्हर पीकॉक’ पुरस्कार मिळाला. याशिवाय पुणे, बंगळुरू आणि इतर चित्रपट महोत्सवांमध्येही चित्रपटाला सन्मान मिळाले आहेत.

भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाल्यानंतर आता ‘गोंधळ’च्या ऑस्कर अभियानाला सुरुवात होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपटाची प्रभावी मांडणी करण्यासाठी नियोजन करण्यात येत असून, भारताचं प्रतिनिधित्व जागतिक व्यासपीठावर सक्षमपणे करण्याचा प्रयत्न टीमकडून केला जाणार आहे. चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक आणि निर्माता संतोष डावखर यांनी या निवडीबद्दल फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया आणि निवड समितीचे आभार मानले आहेत.

‘गोंधळ’च्या माध्यमातून महाराष्ट्राची लोकपरंपरा आणि ग्रामीण संस्कृती जागतिक प्रेक्षकांसमोर पोहोचण्याची संधी मिळाली आहे. 99वे अकादमी पुरस्कार 14 मार्च 2027 रोजी होणार असून, ‘गोंधळ’ भारताचं प्रतिनिधित्व सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मच्या शर्यतीत करणार आहे.

follow us