जुगल हंसराज पुन्हा एकदा शेखर कपूरसोबत ‘मासूम: द नेक्स्ट जनरेशन’ मध्ये एकत्र येणार !

Masoom: The Next Generation : दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या “मासूम: द नेक्स्ट जनरेशन” या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून इंडस्ट्रीत अनेक

Masoom The Next Generation

Masoom: The Next Generation : दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या “मासूम: द नेक्स्ट जनरेशन” या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून इंडस्ट्रीत अनेक चर्चा सुरू आहे. मूळ चित्रपटातील आपल्या भूमिका पुन्हा साकारणार असल्याची पुष्टी ज्येष्ठ कलाकार नसीरुद्दीन शाह आणि शबाना आझमी यांच्याबाबत आधीच झाली होती. आता या कलाकारांच्या यादीत अजून एक नवीन नाव आहे जुगल हंसराज! मूळ चित्रपटात त्यांनी नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांच्या पडद्यावरील मुलाची राहुलची भूमिका साकारली होती.

जुगल यांनी समीक्षकांनी गौरवलेल्या मासूम या चित्रपटातून उर्मिला मातोंडकरसोबत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी राहुल या निरागस मुलाची भूमिका साकारली होती, ज्याच्या एका सर्वसामान्य कुटुंबात येण्यामुळे त्या कुटुंबातील नातेसंबंध आणि आयुष्य कायमचे बदलून जाते. त्यांच्या हृदयस्पर्शी अभिनयाला लहान वयातच मोठी दाद मिळाली आणि त्यांच्या अभिनय प्रवासाची सुरुवात झाली. चित्रपट प्रदर्शित होऊन चार दशकांहून अधिक काळ उलटल्यानंतर, जुगल आता त्यांचे पहिले दिग्दर्शक शेखर कपूर तसेच नसीरुद्दीन शाह आणि शबाना आझमी यांच्यासोबत पुन्हा एकत्र येणार आहेत.

या बद्दल बोलताना शेखर कपूर म्हणाले “घरी परतण्यामध्ये एक विलक्षण सौंदर्य असते ते एखाद्या जागी नव्हे तर अशा कथेकडे परतणे असते जी अनेक दशकांपासून लोकांच्या हृदयात जिवंत आहे. आम्ही मासूम बनवत होतो तेव्हा जुगल अगदी लहान मुलगा होता आणि आज एक सिद्धहस्त अभिनेता म्हणून त्याचे पुन्हा स्वागत करणे ही माझ्यासाठी भावनिक आणि अत्यंत समाधानाची गोष्ट आहे. त्याला पुन्हा नसीर आणि शबानासोबत पाहणे ही आठवण करून देते की काही नाती सिनेमाच्या पलीकडे जातात. या नव्या अध्यायाची सुरुवात करताना, प्रेक्षकांना मासूम ला अजरामर बनवणारी प्रामाणिकता, कोमलता आणि भावनिक सत्यता पुन्हा अनुभवायला मिळावी, अशी माझी आशा आहे.”

मासूम’च्या विश्वात पुन्हा परतण्याबद्दलचा आनंद व्यक्त करताना जुगल हंसराज म्हणाले  शेखर यांनी मला फोन करून नव्या मासूमचा भाग व्हायचं आहे असं सांगितलं, तेव्हा मला खूप आनंद झाला. मासूम हा माझ्या आयुष्याचा, माझ्या ओळखीचा भाग आहे मला आठवतं तेव्हापासून. इतकी वर्षे उलटून गेली तरीही मी अजूनही ‘तो मासूममधला मुलगा’ आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन 40 हून अधिक वर्षे झाली आहेत, पण आजही लोक या चित्रपटावर तितकंच प्रेम करतात. न्यूयॉर्कमध्येही लोक मला थांबवतात आणि हसतमुखाने सांगतात की त्यांची मुलं किंवा नातवंडं आजही ‘लकडी की काठी’ ऐकतात. ते मला त्यांच्या स्वतःच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे भेटतात. ती ओळख प्रेमातून आली आहे. ते प्रेम या चित्रपटाने निर्माण केलं. मासूम हा असा चित्रपट आहे ज्याने हळूहळू लोकांच्या मनात स्थान मिळवलं आणि तिथे कायमचं घर केलं. आणि आजही तसंच करत आहे. या खास चित्रपटाचा, या खास कुटुंबाचा भाग होण्याची संधी मिळाल्याने मी खूप उत्साहित आणि आनंदित आहे. जणू आयुष्याने पूर्ण वर्तुळ पूर्ण केलं आहे”

मासूम: द नेक्स्ट जनरेशन हा दिग्दर्शकाच्या गाजलेल्या चित्रपटाचा आध्यात्मिक सिक्वेल आहे. मूळ चित्रपटाप्रमाणेच हा चित्रपटही बदलती कौटुंबिक नाती, ओळख आणि पिढ्यानपिढ्यांतील संबंध यांचा वेध घेणार आहे. नसीरुद्दीन शाह, शबाना आझमी, जुगल हंसराज, मनोज बाजपेयी, नित्या मेनन, विवान शाह आणि कपूर यांची मुलगी कावेरी कपूर यांच्यासोबत या चित्रपटात विविध पिढ्यांतील उत्कृष्ट कलाकारांचा दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे.

अनीत पड्डा, श्रेया शर्मा, अहान पांडे, लक्ष्य, अभय वर्मा; तरुण बॉलिवूड स्टार्सचे आगामी बिग बजेट प्रोजेक्ट्स

अकॅडमी पुरस्कार विजेते संगीतकार ए. आर. रहमान यांनी या चित्रपटासाठी संगीत देण्यासोबतच सहनिर्मात्याची भूमिकाही स्वीकारली आहे.
मासूम, मिस्टर इंडिया, बँडिट क्वीन आणि एलिझाबेथ यांसारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले पद्मभूषण पुरस्कार विजेते शेखर कपूर मूळ मासूमला कालातीत क्लासिक बनवणाऱ्या भावनिक आणि जिव्हाळ्याच्या कथनशैलीकडे पुन्हा एकदा परतत आहेत.

follow us