जॅकी श्रॉफ आणि शरद केळकर यांचा ‘काली खेती’मध्ये भयावह शक्तीशी सामना; ग्रामीण हॉरर चित्रपटाला मिळणार रहस्यमय आणि थरारक रूप!
Kaali Kheti Teaser: जॅकी श्रॉफ आणि शरद केळकर यांच्या दमदार उपस्थितीमुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
Jackie Shroff And Sharad Kelkar Kaali Kheti Teaser: हरीस इम्तियाज खान (Haris Imtiaz Khan) यांच्या चित्रपटाच्या टीझरमध्ये एका अशा गावाची झलक पाहायला मिळते, जे एका भयावह शक्तीच्या सावटाखाली जगत आहे. जॅकी श्रॉफ आणि शरद केळकर यांच्या दमदार उपस्थितीमुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
ज्या जमिनीवर माणसाचे जीवन अवलंबून असते, तीच जमीन जेव्हा भीतीचे कारण बनते, तेव्हा काय घडू शकते? हा प्रश्न उपस्थित करणारा जॅकी श्रॉफ आणि शरद केळकर यांच्या आगामी ‘काली खेती’ या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरमधून एका अशा जगाची ओळख करून दिली जाते, जिथे शेती ही केवळ उपजीविकेचे साधन किंवा जीवनशैली नसून संपूर्ण गावाला पछाडणारी एक भयावह शक्ती असल्याचे दिसते.
नेहमीच्या हॉरर चित्रपटांपेक्षा वेगळे कथानक असलेला हा चित्रपट लोककथा आणि गूढतेचा अनोखा संगम घेऊन येणार असल्याचे टीझरवरून जाणवते. चित्रपटाचा टीझर एका अशा गावाभोवती फिरतो, जे एका अनामिक आणि भयावह शक्तीच्या सावटाखाली जगत आहे. या चित्रपटात शेती जणू काही स्वतंत्र अस्तित्व असलेली आणि गावातील लोकांवर आपली पकड निर्माण करणारी प्राचीन शक्ती असल्याचे भासते. ग्रामीण भारताशी घट्ट जोडलेल्या शेतीसारख्या परिचित विषयाला भयावह रूप देण्यात आले आहे. या कथानकातील अलौकिक शक्तीबद्दल निर्मात्यांनी अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. त्यामुळे चित्रपटातील गूढता अधिकच वाढली आहे.
टीझरमध्ये जॅकी श्रॉफ विशेष प्रभावी दिसत आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील भारदस्तपणा आणि दमदार उपस्थिती लक्ष वेधून घेते. तर शरद केळकर यांची स्क्रीन प्रेझेन्सही तितकीच प्रभावी असून त्यांच्या भूमिकेमुळे चित्रपटातील रहस्य अधिक गडद होताना दिसते. दोन्ही कलाकारांनी आपल्या व्यक्तिरेखांबद्दल फारशी माहिती उघड केलेली नसली, तरी चित्रपटाच्या या गूढ विश्वात त्यांच्या भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे स्पष्ट होते.
Saawan Aaya Hai : आयुष्यमान खुराना अन् शर्वरीच्या’सावन आया है’मधून पावसाळी प्रेमाची जादू…
या चित्रपटाचे सर्वात वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्याची पार्श्वभूमी. हिंदी चित्रपटसृष्टीतील हॉरर चित्रपटांमध्ये आतापर्यंत प्रामुख्याने पारंपरिक भुताखेतांच्या कथा पाहायला मिळाल्या आहेत. मात्र ग्रामीण भारतातील लोककथा, श्रद्धा आणि समजुती यांमध्ये भयपटासाठी अनेक वेगळ्या शक्यता दडलेल्या आहेत. ‘काली खेती’ या चित्रपटातून शेतीला भयकथेच्या केंद्रस्थानी आणण्यात आले आहे. जमीन, तिचा इतिहास आणि पिढ्यान् पिढ्या जपलेली गुपिते यांमधून निर्माण होणाऱ्या भीतीचा अनुभव हा चित्रपट देणार असल्याचे दिसते. स्थानिक श्रद्धा आणि त्यामागे दडलेले एखादे भयानक सत्य यांच्यातील सीमारेषा या चित्रपटात धूसर होताना दिसणार आहे.
हरीस इम्तियाज खान यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले असून सना खान यांनी निर्मिती केली आहे. चित्रपटात जॅकी श्रॉफ आणि शरद केळकर यांच्यासोबत नेहा सर्गम, वीरेंद्र सक्सेना आणि शाजी चौधरी हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. ब्लॅककॅनव्हास स्टुडिओच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘काली खेती’ हा चित्रपट 20 नोव्हेंबर 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाच्या टीझरमध्ये अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवण्यात आले आहेत. मात्र ज्या जमिनीवर गावकऱ्यांचे संपूर्ण आयुष्य अवलंबून आहे, तीच जमीन त्यांच्या भीतीचे कारण बनते, ही संकल्पना चित्रपटाला एक वेगळे आणि रंजक स्वरूप देते. जॅकी श्रॉफ आणि शरद केळकर यांच्या दमदार उपस्थितीमुळे या रहस्यमय जगात डोकावण्याची प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढणार आहे. या गावात जमीन केवळ पिके उगवत नाही, तर भीतीचेही बीज पेरते आणि त्या भीतीपासून सुटका होणे कदाचित अशक्य आहे.