Kishor Kadam: ‘बापाबद्दलच्या फिल्म्स… ‘; किशोर कदम यांच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Kishor Kadam: ‘बापाबद्दलच्या फिल्म्स… ‘; किशोर कदम यांच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Kishor Kadam Post: सौमित्र अर्थात किशोर कदम हे मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेते आणि कवी म्हणून ओळखले जातात. (Marathi Movie Baaplyok) आपल्या कवितेच्या माध्यमांतून ते सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर भाष्य करत असल्याचे देखील नेहमी बघायला मिळतात. नुकतीच सौमित्र यांनी ‘बापल्योक’ या मराठी सिनेमाबद्दल त्यांची पोस्ट जोरदार चर्चेत आली आहे.


काय आहे पोस्टमध्ये

आजवर मराठी साहित्या, कवितेत ,कादंबरीत ,कथेमध्ये आणि सिनेमांमध्ये मुलगा आणि आईच्या या नात्याबद्दल ,खूप काही लिहिलं गेलं आहे, सिनेमेही सुद्धा काढले गेलेले आहेत. बाप हा एक असा माणूस असतो जो मनातल्या मनातली आई असतो. मनात रडणारी आई असतो. तो स्वतःचं दुःख दाखवत नाही, तो वरवर जगत राहतो ,तो सांगत सुद्धा नाही.

बापाबद्दलच्या फिल्म्स फार कमी आल्या असतील. ” बापल्योक” हा सिनेमा बाप आणि मुलाच्या नात्याचा समजूतदारीचा प्रवास उजागर करणारा सिनेमा आहे. ” बापल्योक ” फिल्म बघताना हे प्रकर्षाने जाणवतं की मकरंद माने यांच्या सिनेमांमध्ये गावरान माणसं ,गावरान संबंध आणि प्रामुख्याने त्याच्या सिनेमांमध्ये पुन्हा पुन्हा येणारा “लग्न” हा समारंभ. मुळात गावामध्ये लग्नकार्यासाठी एकत्र येणं हा एक असा सोहळा असतो जिथं सगळे मानपान , नातीगोती , देणंघेणं , भूतभविष्य , घरघराणं , या सगळ्या गोष्टी एकत्र येतात, आणि त्या रीती रिवाज सांभाळण्यामध्येच सगळे संबंध बांधलेले असतात आणि त्यांच्यातूनच ती घरं ती माणसं बांधलेली असतात.

आयुष्यात अनेक वर्ष सोबत राहून सुद्धा माणसं एकमेकांना कळत नाहीत. कधी कधी एकमेकांना न कळताच संबंध विझून जातात , संपून जातात , माणसं मरून जातात , तर कधी कधी एखादा प्रसंग , एखादा दिवस एखादी घटना अशी घडते, ज्याच्यातून गाळ खाली बसत जाऊन पाणी स्वच्छ निर्मळ व्हावं तसा माणूस समोरच्याला उलगडत जातो ,दिसत जातो ,कळत जातो. या चित्रपटांमध्ये येणारे ते दोन-तीन दिवस आहेत जे आपल्याला या आकळाच्या प्रवासाला घेऊन जातात. हा सिनेमा पाहतां सबकॉन्शस माईंडमध्ये अचानक ” पोस्ट्म इन ध माउंटन ” नावाचा ढग कधीतरी उडत गेला.
विठ्ठल काळे आणि शशांक शेंडे यांनी अप्रतिम कामं केलेली आहेत. शशांक शेंडेच्या आयुष्यातली ही सर्वोत्तम आणि महत्वाची भूमिका. मकरंद माने हा दिवसेंदिवस दिग्दर्शक म्हणून समृद्ध होत गेलेला दिसतो.

Marathi Movie Baaplyok: सिनेमा पाहून घरी गेल्यावर आपल्या बाबांना घट्ट मिठी माराल… एवढं नक्की…

कोल्हापुरातल्या शाहू या सिंगल स्क्रीनमध्ये हा गावरान सिनेमा बघतांना तिकडल्या प्रेक्षकांच्या ज्या प्रतिक्रिया येत होत्या त्यानं सिंगलस्क्रीन आणि मल्टिप्लेक्स प्रेक्षकातला फरक लक्षात येत असतानाच दादा कोंडके , व्ही. शांताराम संख्या जुन्या दिग्गजांची आठवण येत होती. इतक्या छान सिनेमाला नागराज आणि गार्गीनं बळ दिल्या बद्दल त्या दोघांचे आभार. सिनेमा संपल्यावर थिएटर बाहेरल्या मी रस्त्यावर उभा असतांना प्रेक्षकांतून एक जण येऊन म्हणाला ” काय राव .. आमी नागराज मंजुळे या नावा मुळं पिच्च्रर बगायला येतो पन शिनिमात ष्टोरी कुठंय ? ”

मी त्याच्याकडे पाहून नुसताच हसलो. ष्टोरी नसलेला सिनेमा त्यानं शेवट पर्यंत पहिला होता. चांगल्या सिनेमाचं हे तर लक्षण असतं. त्याची गोष्ट पाण्याच्या प्रवाहाच्या पृष्ठभागाखालून खूप खोलवर माशासारखी सळसळत वाहात असते .. तिचं अस्तित्व फक्त जाणवत राहातं.. कुठे आरडाओरडा नाही , मारधाड नाही , मेलोड्रामा नाही , दिलखेचक गाणी नाहीत , धडाम धडाम पार्श्व संगीत नाही. एक साधी सरळ फिल्म जी पाहून बाहेर पडल्यावर आत काहीतरी बदललेलं असतं. अशी त्यांची सौमित्र अर्थात किशोर कदम यांची पोस्ट सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube