Kon Honar Crorepati चा भव्य शुभारंभ; माधुरी दीक्षित-सोनाली बेंद्रे पहिल्यांदाच एकाच मंचावर एकत्र झळकणार
Kon Honar Crorepati : बॉलिवूडमधील दोन लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेत्री, पहिल्यांदाच एकत्र आलेली ही जोडी मनमोकळ्या गप्पा, जुन्या आठवणी
Kon Honar Crorepati : बॉलिवूडमधील दोन लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेत्री, पहिल्यांदाच एकत्र आलेली ही जोडी मनमोकळ्या गप्पा, जुन्या आठवणी आणि काही अनपेक्षित खुलाशांनी रंगणार आहे. सोनी मराठीवरील ‘कोण होणार करोडपती’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या नव्या पर्वाची सुरुवात येत्या सोमवार, १२ ऑक्टोबरपासून होणार आहे. यंदा माधुरी दीक्षित सूत्रसंचालकाच्या भूमिकेत असून, कार्यक्रमाच्या भव्य शुभारंभाच्या विशेष भागात सोनाली बेंद्रे हॉटसीटवर विराजमान होणार आहे. ‘आता खेळ बदलणार’ या घोषवाक्याला साजेसा हा विशेष भाग मराठी मनोरंजनविश्वात नव्या पर्वाची नांदी ठरणार आहे.
आपापल्या चित्रपट कारकिर्दीत अनेक यशस्वी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या माधुरी दीक्षित आणि सोनाली बेंद्रे यांनी आजवर एकाही चित्रपटात एकत्र काम केलेले नाही. त्यामुळे सोनी मराठीच्या मंचावर पहिल्यांदाच एकत्र दिसणाऱ्या या दोन लोकप्रिय अभिनेत्रींची जोडी प्रेक्षकांसाठी खास पर्वणी ठरणार आहे. प्रेक्षकांना बॉलिवूडच्या जुन्या आठवणी, खुसखुशीत गप्पा आणि ‘कोण होणार करोडपती’च्या खेळातील उत्कंठा यांचा सुंदर मिलाफ या भागात पाहायला मिळणार आहे. यानिमित्तानं या दोन लाडक्या अभिनेत्रींच्या व्यक्तिमत्त्वाचं आणि त्यांच्या आयुष्यातील काही खास पैलूंचं दर्शन प्रेक्षकांना घडेल.
प्राण्यांप्रती असलेल्या प्रेमामुळे सोनाली बेंद्रे या विशेष भागात हॅपी पेट फाउंडेशन या संस्थेला पाठिंबा देण्यासाठी खेळत असून या भागात ती प्राणी कल्याणासाठी करत असलेल्या कामाबद्दल तसेच तिच्या ‘हॅपी पॉडकास्ट’ या उपक्रमाबद्दलही मनमोकळेपणानं बोलणार आहे. माधुरी आणि सोनाली यांच्यात घर सांभाळण्याच्या जबाबदाऱ्यांवरही रंगतदार चर्चा घडताना दिसेल. याच गप्पांमध्ये सोनालीनं आपल्या सासूबाईंबद्दल एक खास गोष्ट सांगितली. तिच्या सासूबाई तिला स्वयंपाकघरात कधीच काम करू देत नाहीत, असा गोड खुलासाही तिने या वेळी केला आणि घरातील कामांचे योग्य नियोजन, जबाबदाऱ्यांची विभागणी आणि एकमेकांना सहकार्य करणे या गोष्टींमुळे घर सुरळीत चालण्यास मदत होते, यावर दोघींचे एकमत झालं.
या कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त करताना माधुरी दीक्षित म्हणाली, “सोनाली आणि मी आजवर एकाही चित्रपटात एकत्र काम केलेले नाही. पण अजूनही उशीर झालेला नाही! आज अखेर आपण ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर एकत्र आलो आहोत. हा खरोखरच खूप आनंदाचा क्षण आहे आणि या नव्या प्रवासाची सुरुवात तुझ्यासोबत होत असल्याचा मला खूप आनंद आहे. तुझ्यासोबत एकाच मंचावर येणे माझ्यासाठी खूप खास आहे. माझ्यासाठी हा एक सोहळाच आहे.”
माधुरी दीक्षितचे सूत्रसंचालक म्हणून स्वागत करताना सोनाली बेंद्रे म्हणाली,“‘कोण होणार करोडपती’ला आता महिला सूत्रसंचालक लाभली आहे आणि माधुरीपेक्षा यासाठी उत्तम पर्याय कोण असू शकतो? मी नेहमीच माधुरी दीक्षितची चाहती राहिले आहे; पण आता या निमित्ताने मला तिला आणखी जवळून जाणून घेण्याची संधी मिळते आहे. तिचा धाकटा मुलगा आणि माझा मुलगा एकाच शाळेत शिकतात, त्यामुळे आमच्या भेटी होत असतात. मात्र, एकाच मंचावर येण्याचा योग आजवर आला नव्हता.
या मंचावरील आपला अनुभव सांगताना सोनाली म्हणते, “माधुरी सूत्रसंचालक म्हणून उत्तम काम करेल, याचं मला अजिबात आश्चर्य वाटत नाही. कारण ती अतिशय प्रेमळ आणि आपुलकीनं वागणारी व्यक्ती आहे. तिच्यातील हा प्रेमळपणा मी अनुभवला असल्यामुळे ती एक उत्तम सूत्रसंचालक ठरेल, याची मला खात्री होती. ती एक अप्रतिम अभिनेत्री आहे, यात काहीच शंका नाही. तिच्या नृत्याची मी नेहमीच चाहती राहिले आहे आणि इथे या मंचावर तिचे नृत्य पाहण्याची संधीही मला मिळाली. तो माझ्यासाठी खूपच सुंदर अनुभव होता. त्यामुळे आमच्यापैकी कोणाला काही सांगायचे असेल, तर कृपया आम्हा दोघींसाठी काहीतरी लिहा. मला ते नक्कीच आवडेल!”
भारतीय वंशाच्या नावी पिल्लई यांना शांततेसाठी नोबेल पुरस्कार-
पहिल्यांदाच एकत्र आलेली माधुरी आणि सोनाली यांची जोडी, त्यांच्या आयुष्यातील खास किस्से, मनमोकळ्या गप्पा आणि एका महत्त्वपूर्ण सामाजिक कार्याला दिलेला पाठिंबा यांमुळे ‘कोण होणार करोडपती’चा हा भव्य शुभारंभाचा हा भाग प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची खास मेजवानी ठरणार आहे. ‘कोण होणार करोडपती’चा भव्य शुभारंभ पाहायला विसरू नका! सोमवार, १२ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता फक्त सोनी मराठी आणि सोनी लिववर.